IPL 2021: मुंबई इंडियन्सची 'विजयी सलामी' होतच नाही का?

रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळरू

फोटो स्रोत, Michael Dodge

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आयपीएल स्पर्धेत, सर्वाधिक जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. मात्र 2012 नंतर मुंबई इंडियन्सला हंगामात सलामीचा सामना जिंकता आलेला नाही.

गेल्या वर्षी सम वर्षी जेतेपद पटकावता येत नसल्याचं शल्य मुंबईने दूर केलं. नव्या हंगामात सलामीची लढत जिंकत कटू इतिहास बाजूला सारण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

मुंबईचा संघ धडपडत सुरुवात करतो. त्यांना लय गवसायला थोडा वेळ लागतो. मात्र एकदा ती मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स बाकी संघांना भारी पडतात असं दरवर्षीचं चित्र असतं.

2020 हंगामात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला नमवलं होतं. सलामीलाच पराभवाचा शिक्का बसूनही मुंबईने गती पकडत हंगामाअखेरीस जेतेपदावर कब्जा केला होता.

2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. तरीही जेतेपद त्यांनीच पटकावलं.

2018 मध्ये चेन्नईने त्यांना पराभूत केली. 2017मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबईने तडाखा दिला.

2016मध्येही सख्खे शेजारी पुण्यानेच मुंबईला विजयी सलामीपासून रोखलं. 2015 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा अश्वमेध पहिल्या सामन्यात रोखला होता.

2014 मध्ये कोलकाताच मुंबईला सलामीच्या लढतीत भारी पडलं होतं. 2013मध्ये बेंगळुरूने मुंबईचा विजयाचा मार्ग रोखला होता.

2012 मध्ये मात्र मुंबईने सलामीच्या लढतीत चेन्नईला हरवत हंगामाची सुरुवात दिमाखात केली होती.

2011मध्ये मुंबईने दिल्लीवर विजय साकारत हंगामाची चांगली सुरुवात केली होती. 2010मध्ये त्यांनी राजस्थानला नमवलं. 2009मध्ये चेन्नईला पराभवाचा धक्का देण्याचं काम मुंबईने केलं होतं. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात 2008मध्ये मुंबईने बेंगळुरूसमोर पराभव पत्करला होता.

विराट कोहली, रोहित शर्मा,

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, विराट कोहली

रोहित शर्माच्या हाती नेतृत्वाची कमान आल्यापासून मुंबई इंडियन्सचा आलेख चढताच राहिला आहे. दुसरीकडे इतकी वर्ष कर्णधारपदी हाती असूनही बेंगळुरूचा संघ जेतेपदापासून दूर आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघाचे आधारस्तंभ आहेत. रनमशीन म्हणून आणि कर्णधार म्हणून कोहलीने स्वत:चा ठसा उमटवला आहे. रोहित शर्माने सलामीवीर आणि अनुभवी खेळाडू म्हणून मोहोर उमटवली आहे.

भारतीय संघाच्या या शिलेदारांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघांमध्ये सलामीचा मुकाबला रंगणार आहे. मुंबईचं पारडं 19-10 असं जड आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाचा गाभा कायम आहे. दुसरीकडे बेंगळुरूकडे विराट आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यासह आता ग्लेन मॅक्सवेल हा धोकादायक बॅट्समन असणार आहे. कायले जेमिसन हा उंचपुरा फास्ट बॉलर बेंगळुरूच्या ताफ्यात आहे.

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नॅथन कोल्टिअर नील, अॅडम मिलने, पीयुष चावला, जेम्स नीशाम, युधवीर चरक, अर्जुन तेंडुलकर, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडुलकर

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अॅडम झंपा, केन रिचर्डसन, शाहबाझ अहमद, जोश फिलीप, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स, ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभूदेसाई, के.एस.भरत

सामन्याची वेळ-रात्री 7.30 पासून

प्रक्षेपण-स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर तसंच डिस्ने हॉटस्टारवर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)