नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार का उफाळला आहे?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्यानंतर तिथे हिंसाचार उसळला. यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला.
त्यासंदर्भात बोलताना बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "काही समूह धार्मिक तेढ पसरवत आहेत. सरकारी संपत्ती तसंच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत."
हा हिंसाचार ताबडतोब रोखायला हवा, अन्यथा सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याविरोधात ब्राह्मणबरिया या ठिकाणी निषेध आणि संघर्षाचं वातावरण पाहायला मिळालं. आतापर्यंतच्या संघर्षात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
गृहमंत्री म्हणाले, "गेल्या तीन दिवसांपासून धार्मिक समूह तेढ वाढवण्याचं काम करत आहेत. सरकारी संपत्तीचंही त्यांनी नुकसान केलं आहे."

जिल्हापरिषद, थाना भवन, सरकारी भूमी कार्यालय, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, राजकीय नेत्यांची घरं अशा ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी नुकसान केलं आहे.
आंदोलकांनी अशा पद्धतीने वागू नये, असं आवाहन आम्ही केलं. "लोकांचा जीव आणि सरकारी संपत्तीचं रक्षण करण्यासाठी सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील," असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
कट्टरपंथी इस्लामी संघटना हिफाजत-ए-इस्लामने पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याविरोधात निषेध व्यक्त केला. रविवारी संघटनेने संप पुकारला.
संप पुकारल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि संघर्ष पाहायला मिळाला. सर्वाधिक हिंसक घटना ब्राह्मणबरिया या भागात पाहायला मिळाली.
गृहमंत्र्यांनी सांगितलं की, काही लोक अनाथ मुलांना रस्त्यावर आणत आहेत. त्यांना त्रास देत आहेत.

फोटो स्रोत, MASUK HRIDOY
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे सगळं बांगलादेशविरोधात सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी हे थांबवलं नाही तर कायदेशीर कारवाई करावी लागेल.
तीन दिवस सुरक्षा यंत्रणांनी संयम बाळगला. या सगळ्या प्रकाराचा फटका बसलेल्यांना यापुढे कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान संपादरम्यान उफाळलेल्या हिंसक घटनांची जबाबदारी हिफाजत-ए-इस्लाम संघटनेने स्वीकारली नाही.
सरकारच्या लोकांनी तसंच पोलिसांनी आंदोलकांवर हल्ला केल्याचं हिफाजतने पत्रकात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MUNIR UZ ZAMAN/GETTY
संघटनेचे महासचिव नसीरुद्दीन मुनीर यांनी बीबीसीला सांगितलं की, "सरकारी वास्तूंवरील हल्ल्यासाठी आम्हाला दोषी ठरवणं योग्य नाही.
"शुक्रवारी नमाजानंतर विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली. जेव्हा आंदोलक पोलीस स्टेशन परिसरातून जात होते तेव्हा काही मदरशाचा भाग नसलेले लोक मिसळले. या उपद्रवी लोकांनी पोलीस स्टेशनवर वीटांचा मारा केला. पोलिसांकडून प्रत्युत्तर म्हणून गोळीबार करण्यात आला.
"आमच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनच्या आत कोणताही हल्ला केलेला नाही. मी शंभर टक्के याची हमी देऊ शकतो.
सरकारने याआधी हिफाजत-ए-इस्लाम संघटनेच्या मागण्या मान्य केल्या आहेत. पुस्तकांमध्ये बदल करणं आणि बांगलादेशत मूर्ती हटवणं यांचा समावेश आहे.
आंदोलनकर्त्यांनी एका ट्रेनवरही हल्ला केला. ज्यामध्ये काही लोक जखमी झाले. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हिफाजत-ए-इस्लामच्या शेकडो समर्थकांनी रविवारी पूर्व बांगलादेशमधील हिंदूंच्या मंदिरांवर आणि ट्रेनवर हल्ला केला.
घटनेनंतर ब्राह्मणबरियाला जाणाऱ्या येणाऱ्या ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आली.
बांगलादेशात सर्वाधिक हिंसा ब्राह्मणबरिया आणि चितगावमधील हाटहजारी इथे झाली.
शनिवारी ब्राह्मणबरियात पोलीस आणि सुरक्षायंत्रणांच्या संघर्षात पाच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला.
रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक पत्रकारांच्या या दाव्याची बीबीसीने स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
बांगलादेश स्थापनेच्या 50व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ढाक्यात पोहोचले. काही इस्लामी संघटनांनी त्यांचा या दौऱ्याचा निषेध केला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























