नितीन गडकरी : राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणाची तयारी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. बँका, रेल्वेनंतर आता राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणाची तयारी - नितीन गडकरी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) येत्या पाच वर्षांत महामार्गांच्या खासगीकरणाशी संबंधित योजनेवर काम करत आहे. या माध्यमातून सुमारे 1 लाख कोटी रुपये उभारण्याची तयारी केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
उद्योजकांनी या बाबतीत पुढे येऊन गुंतवणूक करून त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन यावेळी गडकरी यांनी केलं.
राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
CII च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. बाजारात मालमत्ता विक्री किंवा लीज ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. यातून सरकारला पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य काढण्यास मदत मिळेल. उद्योग आणि सरकार यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. देशातील पायाभूत सुविधांच्या कामांना या माध्यमातून चालना मिळेल, असं गडकरी म्हणाले.
सार्वजनिक अनुदानित राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना बाजारपेठेत खासगीकरण करण्यासाठी अधिकार NHAI ला देण्यात आले आहेत. तिथं ही योजना राबवण्यात येऊ शकते. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
2. एकट्या मुंबईतून 100 कोटींची वसुली, मग महाराष्ट्रातून किती?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं पत्र आणि त्यानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
एकट्या मुंबईतून जर 100 कोटींची वसुली करण्यात येते, तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती वसुली होत असेल, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Pti
सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि नवनीत राणा नुकतेच आमनेसामने आले होते. सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार राणा यांनी केलेली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गुरुवारी (25 मार्च) लोकसभेत बोलताना नवनीत राणा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरू आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं, यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही, असा आरोपही राणा यांनी यावेळी केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. फास्ट बॉलिंग, गुगली करणार, लूज बॉलवर शॉटही मारणार - देवेंद्र फडणवीस
"क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील मारणार आहे," असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

फोटो स्रोत, Twitter
कालिदास कोळंबकर यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान फडणवीस बोलत होते. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फडणवीसांनी क्रिकेटच्या भाषेत प्रतिक्रिया दिली.
"एका क्रिकेट सामन्याच्या सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते," असं फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं, अशी मागणी संजय राऊत करत असतात. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "UPAचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असावं लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो," ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
4. अरबी समुद्रातील 3 बोटीतून 4 हजार900 कोटींचं ड्रग्ज, AK 47 रायफल्स जप्त
अरबी समुद्रात तटरक्षक दलाने संशयित नौकेला घेराव घालून जवळपास 4900 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, एके 47 रायफल आणि 1 हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तटरक्षक दलाकडून या संशयित नौकेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वरील मुद्देमाल हस्तगत झाला आहे.
तटरक्षक दलाची एक नौका समुद्रात गस्त घालत असताना त्यांना या नौकेचा संशय आला होता. त्यावेळी एका विमानाने टेहाळणी करून याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यानंतर ही कारवाई केली आहे. ही बातमी लोकमतने दिली.
5. MHADA कडून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला 100 फ्लॅट
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारणाने (MHADA) आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली. या निर्णयामुळे कर्करोगावर देशभरातून टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळ परिसरात म्हाडाचे 100 फ्लॅट्स आहेत. सध्यातरी 100 फ्लॅट देण्यात आले असून ही संख्या 200 पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे.
देशभरातून मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, मुंबईत राहण्याची सोय परवडत नसल्यामुळे त्यांची अडचण होते. त्यामुळे या निर्णयाचा चांगला परिणाम दिसून येईल. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























