कोरोना: लॉकडाऊन करायला भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा-मुख्यमंत्री #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Twitter
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. लॉकडाऊन करायला भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा - उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात कोरोनाची वाढ वेगाने होणाऱ्या 10 शहरांपैकी 8 शहरे महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय आरोग्य यंत्रणेने राज्य सरकारला ही बाब नुकतीच निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (13 मार्च) हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करताना कडक निर्बंधांचा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
"लॉकडाऊन लागू करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका," असं मुख्यमंत्री म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. शिवसेनेचा अमरावतीत चक्क MIMला पाठिंबा
अमरावती येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावार टीका केली आहे.
अमरावती महापालिकेची स्थायी समिती निवडणूक नुकतीच घेण्यात आली. यामध्ये भाजपचे शिरीष रासने यांनी अध्यक्षपदी विजय मिळवला.

फोटो स्रोत, Twitter
पण त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत भाजपचे शिरीष रासने यांना 9 मते मिळाली तर MIMचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना 6 मते मिळाली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी काँग्रेस ,शिवसेना, एमआयएम आणि बीएसपी यांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मात्र ऐनवेळी बसपाचे गटनेते गैरहजर राहिल्याने विरोधकांचं संख्याबळ कमी पडलं. अखेर विजय भाजपने मिळवला असला तरी येथे शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
3. MPSC च्या 413 उमेदवारांना नियुक्तीपत्र द्या, अन्यथा मुंबईत आंदोलन
MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 413 उमेदवारांना राज्य सरकारने तत्काळ नियुक्ती पत्र द्यावं, अन्यथा मुंबईत याबाबत उग्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा भाजप नेते आणि विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, facebook
या परीक्षा गेल्या वर्षी जून महिन्यात झाल्या होत्या. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना अजून नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही. त्यासाठी कोरोनाचं कारण दाखवलं जात आहे. पण नियुक्तीपत्र दिल्यास कोणते नियम मोडतील, हे सरकारने स्पष्ट करावं, असा प्रश्न पडळकर यांनी केला.
महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढत आहे. काही उमेदवार नियुक्तीपत्रं मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार होते. पण कोरोनाचं कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आला, असा आरोप पडळकर यांनी केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. ममता बॅनर्जींवर हल्ल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, निरीक्षकांचा हवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदिग्राम येथे प्रचारासाठी गेल्या असताना जखमी झाल्या होत्या. त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला होता.

फोटो स्रोत, Ani
पण या हल्ल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
विवेक दुबे आणि अजय नायक यांना या प्रकरणाचा अहवाल देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने दिली होती.
ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली, त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. त्यांच्या पायाला गाडीचा दरवाजा लागला. पण हा दरवाजा कसा लागला, याची माहिती नाही. याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने दुबे आणि नायक या दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. ही बातमी लोकमतने दिली आहे.
5. अदानींची संपत्ती 12 लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली? - राहुल गांधी
उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती वाढल्याबाबतच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
2020 या वर्षात तुमची संपत्ती किती वाढली? शून्य. पण अदानींची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली, हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विट करूनच याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. गौतम अदानी यांनी संपत्तीच्या वाढीच्या बाबतीत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आणि एलॉन मस्क यांनाही मागे टाकलं आहे, असं यामध्ये म्हटलं आहे. ही बातमी सामनाने दिली आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)























