IndvsEng: टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

फोटो स्रोत, Daniel Kalisz - CA
सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने अहमदाबाद इथे सुरू असलेलया चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडवर एक डाव आणि 25 रन्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ही मालिका 3-1 अशी जिंकली.
या विजयासह टीम इंडियाने चार सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयासह भारतीय संघाने जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पटकावलं. भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे.
या मालिका विजयासह भारतीय संघाने आयसीसी टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ 520 गुणांसह अव्वल राहिला. चॅम्पियनशिप अंतर्गत भारतीय संघाने 12 टेस्ट जिंकल्या तर चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 18 जूनपासून लॉर्ड्स इथे चॅम्पियनशिप फायनर रंगणार आहे.
रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फिरकीच्या बळावर भारताने अहमदाबाद इथल्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दुसरा डाव 135 रन्समध्ये गुंडाळत एक डाव आणि 25 रन्सने दणदणीत विजय मिळवला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलर्सच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 205 रन्समध्येच आटोपला.
शतकी खेळी तसंच अफलातून विकेटकीपिंगसाठी ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने संधी मिळालेल्या अक्षर पटेलने संधीचं सोनं करत तीन टेस्टमध्ये 27 विकेट्स घेतल्या. अक्षरने या मालिकेत डावात पाच विकेट्स घेण्याची करामत चारवेळा केली.
32 विकेट्स आणि 189 रन्स अशा अष्टपैलू कामगिरीसाठी रवीचंद्रन अश्विनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक साकारण्याची संधी थोडक्यात हुकली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टनने 96 रन्सची खेळी केली.
दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर आलेल्या सुंदरने ऋषभ पंतला साथ देत सातव्या विकेटसाठी 113 रन्सची भागीदारी केली. ऋषभ बाद झाल्यानतंर सुंदरने सूत्रं हाती घेतली.

फोटो स्रोत, Surjeet Yadav
सुंदरने अक्षर पटेलच्या साथीने आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारली. वॉशिंग्टन 96 वर असताना अक्षर पटेल रनआऊट झाला. इशांत शर्माला बेन स्टोक्सने एलबीडब्ल्यू केलं तर मोहम्मद सिराज त्रिफळाचीत झाला.
भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येत शतक साकारण्याची किमया रवीचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, कपिल देव, वृद्धिमान साहा, अजय रात्रा, अनिल कुंबळे, अजित आगरकर, हार्दिक पंड्या, सय्यद किरमाणी, इरफान पठाण यांनी केली आहे.
भारतीय संघाचा डाव 365 रन्समध्येच आटोपला. ऋषभ पंतने 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 रन्सची खेळी केली. वॉशिंग्टनने 10 चौकार आणि एका षटकारासह 96 रन्सची खेळी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























