मान्या सिंह : रिक्षा चालक वडिलांची लेक बनली 'मिस इंडिया' रनर अप

मानसा वाराणसी

फोटो स्रोत, Manasi Varanasi

    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, मुंबईहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

तेलंगणाच्या हैदराबादची मानसा वाराणसीने फेमिना 'मिस इंडिया 2020'चा किताब पटकावला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत मिस इंडिया 2020 स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यात 23 वर्षांची मानसा वाराणसी यंदाची मिस इंडिया ठरली.

उत्तर प्रदेशची मान्या सिंह आणि हरियाणाची मनिका शियोकांड पहिल्या आणि दुसऱ्या रनर अप ठरल्या. या तिन्ही विजेत्यांच्या नावातलं पहिलं अक्षर 'म' आहे, हे विशेष.

नावातल्या पहिल्या अक्षराप्रमाणेच या तिघींमध्ये एकसारखी अनेक वैशिष्ट्यं आहेत आणि या तिघींसाठीही 'मिस इंडिया' बनण्यापर्यंतचा मार्ग सोपा नव्हता.

कसा होता मान्या सिंहचा प्रवास?

"तू खुद की खोज पर निकल, तू किसलिए हताश है? तू चल, तेरे वजूद की समय को तलाश है" - या ओळी म्हणत स्वतःची ओळख करून दिली आहे फेमिना मिस इंडिया 2020 ची रनर अप मान्या सिंहने.

उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातली मान्या सिंह कालपर्यंत एक सामान्य मुलगी होती. मात्र, आज प्रत्येकजण तिला ओळखतो. मान्याचे वडील ओमप्रकाश सिंह मुंबई ऑटोरिक्षा चालवतात, तर आई मनोरमा देवी मुंबईतच टेलरिंगचं दुकान चालवतात.

मान्याचं बालपण अत्यंत हालाखीत गेलं. आई-वडिलांनी केलेल्या संघर्षाविषयी सांगताना मान्या म्हणते, "लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. देशात काही राज्यं अशी आहेत जिथल्या लोकांना वाटतं की मुली फार काही करू शकत नाहीत."

मिस इंडिया

फोटो स्रोत, missindiaorg

ती पुढे म्हणते, "असा विचार करणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छिते की, तुम्ही कुठूनही आला असाल, तुमच्याकडे कपडे-पैसे असतील किंवा नसतील; मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठं स्वप्न बघता तेव्हा तुम्ही आकाशालाही गवसणी घालू शकता. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत स्वप्न बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं महत्त्व कळणार नाही."

'आयुष्याचं ते वळण जेव्हा वाटलं आता सगळं संपलं'

मान्या सिंहने लहानपणापासूनच पैशांची चणचण बघितली आहे. अनेक रात्री तिने उपाशीपोटी घालवल्या आहेत. पैसे वाचवण्यासाठी कितीतरी किलोमीटरची पायपीट केली आहे.

मान्याजवळ जे कपडे होते ते तिने स्वतः शिवलेले होते. इतकंच नाही तर कॉलेज फी भरण्यासाठी तिच्या आई-वडिलांना दागिनेही गहाण ठेवावे लागले होते. शिक्षणासोबतच तिने कॉल सेंटरवरही काम केलं.

त्या दिवसांविषयी मान्या सांगते, "प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं. मलाही असं वाटलं होतं."

मान्या सिंह के पिता

फोटो स्रोत, Manya Singh

फोटो कॅप्शन, मान्या सिंहचे वडील

ती म्हणते, "मला कायमच असं वाटत आलं आहे की, स्त्रीमध्ये एक वेगळीच शक्ती असते. मुलगा असता तर त्याने सांभाळून घेतलं असतं, असं आई-वडिलांना वाटू नये, असाच मी विचार करते. त्यामुळेच मी मोठ्या मुलीची भूमिका निभावली. मी मुलगा बनू शकत नाही. मात्र, मुलगा नाही, ही खंत कधी आई-वडिलांना वाटू नये, यासाठी प्रयत्न केले. मी 20 टक्के मेहनत केली असेल तर त्यांनी 80 टक्के केली आहे. त्यांनी केलेले त्याग हीच माझी प्रेरणा आहे."

सौंदर्य स्पर्धा श्रीमंतांसाठी असतात, ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांना या स्पर्धांमध्ये भाग घेणं कठीण असतं, असा एक सर्वसामान्य समज आहे. अशावेळी या स्पर्धेचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं मान्यासाठी किती कठीण होतं?

या प्रश्नावर मान्या म्हणते, "जेव्हा आपल्याकडे बॅकअप असतो, तेव्हा एखादी गोष्ट जमली नाही तर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे, असा विचार आपण करतो. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असाच विचार मी कायम केला. पडले तर उठणार आणि पुन्हा पडले तर पुन्हा उठून उभी राहणार, असाच विचार मी करत आले आहे."

मिस इंडिया

फोटो स्रोत, Missindiaorg

तिनं सांगितलं, "अपयश माझा सोबती आहे. माझ्या तोंडावर अनेकांनी दरवाजे बंद केले. तू 'मिस इंडिया'सारखी दिसत नाहीस, तू कधीच 'मिस इंडिया'पर्यंत पोहोचू शकणार नाही, असं लोक म्हणायचे. या सगळ्यांमधून मी एक शिकले - लोक काय म्हणतात, हे गरजेचं नाही. मला काय हवं आणि त्यासाठी मी योग्य आहे की नाही, हे स्वतःला कळणं, हे माझ्यासाठी गरजेचं आहे. यासाठी मलाच मेहनत करावी लागणार आहे, लोकांना नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे."

'सगळं स्वतःलाच करायचं होतं'

मान्या सिंहला 'मिस इंडिया'चा किताब जिंकू शकली नसली तरी ती लोकांपर्यंत पोहेचली आहे.

'मिस इंडिया 2020' मानसा वाराणसी हिची कहाणीही वेगळी आहे. मानसा म्हणते, "2020 हे वर्ष कुणासाठीच चांगलं नव्हतं."

कोरोना साथीच्या आधी कितीतरी वर्षांपासून ती 'फेमिना मिस इंडिया'साठी तयारी करत होती.

मानसा म्हणते, "मिस इंडियाविषयी विचार करण्याआधी मी कॉम्प्युटर सायन्स इंजीनिअरिंगचा अभ्यास करत होते. त्यानंतर मी फायनान्शियल सॉफ्टवेअर कंपनीत पिक्स अॅनालिस्ट म्हणून काम सुरू केलं. त्याचवेळी मी एक मोठी रजा घेतली आणि संपूर्ण वेळ या स्पर्धेच्या तयारीसाठी दिला."

मान्या सिंह

फोटो स्रोत, Manya Singh

फोटो कॅप्शन, मान्या सिंह

ती म्हणते, "कोव्हिड काळात वाटलं एवढी मेहनत केली, पण यावर्षी स्पर्धाच झाली नाही तर? मात्र, काही दिवसांनंतर कळलं की स्पर्धेसाठी व्हर्च्युअल अप्लिकेशन करता येईल. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. हा पहिलाच अनुभव होता. सगळं व्हर्च्युअल होतं. सगळं स्वतःच करायचं होतं. मेकअपपासून सगळं. आम्ही सगळे मल्टी टास्कर बनलो होतो. मी टॉप 15 मध्ये पोहोचल्यानंतर मला प्रवास करावा लागला. हासुद्धा एक वेगळा अनुभव होता."

'प्रियंका चोप्रा माझी प्रेरणा'

मानसा वाराणसी या विजयाचं श्रेय तिच्या कुटुंबातल्या तीन महिलांना देते.

ती म्हणते, "माझ्या कुटुंबात माझी आई, धाकटी बहीण आणि आजी आहे. आई आणि बहिणीने स्पर्धेसाठी परवानगी दिली. पण आजीला समजावणं जरा अवघड होतं. त्या तिघींकडून परवानगी मिळाल्यानंतर त्या तिघींनीच मला प्रोत्साहन दिलं आणि व्हर्चुअल स्पर्धेसाठी मदतही केली."

ती पुढे म्हणते, "आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. आता मी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. प्रियंका चोप्रा माझी प्रेरणा आहे आणि मलादेखील त्यांच्यासारखीच मेहनत करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)