‘धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना बंगल्यात डांबलं’, महिलेची पोलिसात तक्रार

फोटो स्रोत, facebook
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंडे यांच्याशी परस्पर सहमतीने संबंधांत असलेल्या महिलेने त्यांच्यावर मुलांना बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.
या महिलेनं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याबाबत तक्रार दाखल केली आहे.
धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, न्यायालयाचा आदेश सर्वांवर बंधनकारक असेल. या प्रकरणी निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर या महिलेच्या बहिणीने बलात्काराचा आरोप लावला होता.
धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.
मुंडे यांच्यावरील आरोप
मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात तक्रादार महिलेने मुंडे यांच्यावर काही आरोप केले आहेत.
"गेल्या तीन महिन्यांपासून माझे पती धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांना जबरदस्तीने त्यांच्या बंगल्यावर बंद करून ठेवलं आहे. मला त्यांना भेटण्यासाठी दिलं जात नाही. फोनवर बोलण्यास मिळत नाही. 24 जानेवारीला मी चित्रकूट बंगल्यावर गेले असता. मुंडे यांनी 30-40 पोलिसांना बोलावलं. मुंडे यांना विधानसभेतून बरखास्त केलं जावं. भविष्यात त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करावा," असं या महिलेने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Dhananjay Munde/facebook
"चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. मुंडे यांचं चारित्र्य चांगलं नाही. माझ्या मुलांना माझ्याविरोधात भडकावलं जात आहे. त्यामुळे माझ्या मुलांना धोका आहे. त्यांना काही झालं तर जबाबदार धनंजय मुंडे असतील. मला माझ्या मुलांना भेटण्यास दिलं नाही तर, २० फेब्रुवारीपासून मी उपोषणाला बसेन," असं त्या पुढे म्हणाल्या आहेत.
धनंजय मुंडे यांचा खुलासा
या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. मुंडे यांनी तक्रारीच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटलंय,
"आज माझ्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आली आहे. या विवादात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आमच्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोघांच्या सहमतीने उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश श्रीमती ताहिलरमानी यांची नियुक्ती केली आहे.
या मिडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होणार आहे.
मिडिएशनची प्रक्रिया सुरू असताना मुंलांच्या ताब्यावरून तक्रार करणं या हेतूबद्दल शंका उपस्थित होते."
मुंडे यांची हकालपट्टी करा - भाजप
मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार पोलिसात झाल्यानंतर भाजपला आयता मुद्दा मिळाला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे.
"आधी लग्नाची पत्नी, त्यानंतर दुसरी पत्नी, तिची धाकटी बहिण या तीन महिलांची पत्नीच्या नावाने शोषण करणाऱ्या समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोप हकालपट्टी झाली पाहिजे," असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























