मुंबई लोकलचा निर्णय लवकरच - उद्धव ठाकरे

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज ( 25 जानेवारी 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्या पासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे.

आजच्या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, CMO

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

नवीन अ‍ॅप तयार करणार?

लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी एक 'अ‍ॅप्लिकेशन' तयार करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती.

त्यांनी म्हटलं होतं, "लोकल ट्रेनची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार एक नवीन अ‍ॅप तयार करण्याचा विचार करतय. ज्यामध्ये जे लोक ट्रेनने प्रवास करत आहेत ते अ‍ॅपद्वारे तिकीटं काढून प्रवास करतील त्यातून किती प्रवासी एकावेळी प्रवास करतात हे कळू शकेल. त्या त्या वेळी मर्यादित प्रवाश्यांनाच ट्रेनने प्रवास करता येईल."

पण सध्या सरकारचा हा पर्याय मागे पडलेला दिसत आहे.

ऑफिसच्या वेळा बदलणार?

मुंबईच्या लोकल ट्रेन्सची गर्दी कमी करण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलण्याचा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोरोनाच्या काळात यावर कामही सुरू केलं गेलं.

राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "मुंबईतली काही ऑफिस सकाळी लवकर उघडली जातील. तर काही ऑफिस दुपारनंतर आणि संध्याकाळी उघडली जातील. लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी या पर्यायाचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यावर आम्ही करत आहोत".

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)