कोरोना लसः पहिल्या दिवशी भारतात जवळपास दोन लाख लोकांचं लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कालपासून (16 जानेवारी 2021) कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील निवडक लसीकरण केंद्रांशी संवाद साधत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं. तसंच, राज्यनिहाय मुख्यमंत्र्यांनीही आपापल्या राज्यात उद्घाटन केलं.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी एक लाख 91 हजारहून अधिक लोकांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी 3,351 सत्र पार पडले. यात कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड या दोन लशींचा वापर करण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.
भारतातील कोरोनावरील लसीकरण मोहीम जगातील 'जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम' मानली जातेय.

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, "लस टोचल्यानंतर कुणाही व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आवश्यकता भासली नाही." असं असलं तरी दिल्लीत मात्र कोरोनाची लस टोचल्यानंतर काही लोकांमध्ये अॅलर्जीची लक्षणं नोंदवली गेली.
प्रसारमाध्यमांमधील माहितीनुसार, दिल्लीत ज्यांना अॅलर्जीची लक्षणं दिसून आली, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र त्या दुरुस्त करण्यात आल्यात.
केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सर्वात आधी सफाई कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स याना कोरोना लस दिली जात आहे. या सगळ्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता काम केलं आहे.
महाराष्ट्रात 50 टक्के कर्मचाऱ्यांनी का लस घेतली नाही?
महाराष्ट्र सरकारने लसीकरण मोहीम उत्साहात सुरू झाल्याचा दावा केला. पण राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे आकडे वेगळचं चित्र दाखवतात.
सरकारच्या आकडेवारीनुसार, राज्यात 64 टक्के आणि मुंबईत फक्त 50 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी लस घेतली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात 18,338 आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी लस घेतली, तर मुंबईत 1926 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी कोरोनाविरोधी लस घेतली.
मुंबई महानगर पालिकेने 16 जानवारीला 4000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं टार्गेट ठेवलं होतं. पण प्रत्यक्षात फक्त 1926 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली.
याचं कारण काय? हे आम्ही पालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, लसीकरण कमी झाल्याची चार प्रमुख कारणं असू शकतात.
- लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना खूप उशीरा मेसेज गेले
- लसीकरण खूप उशीरा सुरू झालं
- शनिवार सुट्टी असल्याने आरोग्य कर्मचारी बाहेर पडले नसतील
- कामाच्या वेळेतच लस घेऊ अशा विचाराने आले नसतील
भारताचे प्रयत्न संपूर्ण मानवतेसाठी उपयोगी पडतील - मोदी
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केल्यानंतर देशवासियांशी संवाद साधला. ते म्हणाले, "सगळेजण कोरोनाच्या लशीबद्दल विचारत होते. आता लस उपलब्ध झालीय. या क्षणी देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो."
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- कोरोनाविरोधातील आपली लढाई आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची होती
- भारतात बनलेल्या लशी संपूर्ण जगात विश्वसनीय आहेत
- दुसऱ्या टप्प्यात आपल्याला कोरोनाची लस 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे
- कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे
- इतिहासात अशा प्रकारची सर्वात मोठी लसीकरण मोहीम कधीच झालं नाहीय
- लस घेतल्यानंतरही सावध राहणं आवश्यक आहे, मास्क लावणं, अंतर पाळणं गरजेचं आहे
- कोरोना काळात टाळ्या-थाळ्या वाजवून, दिवे लावून देशाचा आत्मविश्वास वाढवला
- भारताने 24 तास सतर्क राहून प्रत्येक घटनाक्रमावर लक्ष ठेवलं आणि वेळेत उपाययोजना केल्या
- 30 जानेवारी 2020 रोजी पहिला रुग्ण सापडला, आठवड्याभरात उच्चस्तरीय समिती बनवली होती
- भारताने देशवासियांसह इतर देशातील नागरिकांनाही मदत केली
- भारताने बनवलेल्या लशीकडे इतर देश आशेनं पाहतायेत
- जगातील अनेक देशांना भारताच्या अनुभवाचा लाभ होईल
- भारताचे प्रयत्न संपूर्ण मानवतेसाठी उपयोगी पडतील
- प्रत्येक जीवाला वाचवण्यासाठी योगदान देण्याची संधी भारताला मिळाली
- 'दवाई भी, कडाई भी' ही नवी आपली घोषणा असायला हवी
- शास्त्रज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानतो
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























