मराठा आरक्षण : इच्छा असेल तरच EWS आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही - विजय वडेट्टीवार

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. इच्छा असेल तरच EWS आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही - विजय वडेट्टीवार
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नुकतंच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षण देऊ केलं होतं. या आरक्षणावरून वादविवाद सुरू असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या आरक्षणाचं समर्थन केलं आहे.
"EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही. इच्छा असेल तरच EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा, याची कोणावरही जबरदस्ती नाही, EWS आरक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच देण्यात आलं आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.
त्याशिवाय मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचा पुनरुच्चार विजय वडेट्टीवार यांनी केला. ही बातमी लोकमतने दिली आहे.
2. अमेझॉन विरुद्ध मनसे वाद चिघळला
अमेझॉनवर मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. हा वाद आता प्रचंड विकोपाला गेला आहे. या मागणीवरून मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (25 डिसेंबर) अमेझॉनच्या कार्यालयाची आणि वेअरहाऊसची तोडफोड केली.

यानंतर अमेझॉनने मराठी भाषेचा समावेश अॅप आणि वेबसाईटमध्ये करण्याचं मान्य केल्याचं मनसे नेत्यांना सांगितलं. पण आता अमेझॉनने राज ठाकरे यांची माफीही मागावी, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
सुरुवातीला मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी मनसेने केल्यानंतर अमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे यांना नोटीसही पाठवली. यावरून हा वाद चिघळल्याचं दिसून येत आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
3. 'वर्षभरासाठी प्रयोग म्हणून कृषी कायदे लागू करू द्या'
कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन गेला महिनाभर सुरूच आहे. हे कायदे मागेच घ्यावेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या कायद्यांसंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.
"कृषी कायद्यांना एका वर्षांसाठी लागू करु द्या. जर हे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले नाहीत तर आम्ही त्यामध्ये नक्कीच संशोधन करण्यासाठी तयार आहोत," असं राजनाथ सिंह म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
"मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं नसेल, असं मोदी सरकार करणार नाही. सध्या एका वर्षासाठी हे नवे कृषी कायदे लागू होऊ द्या. याकडे एक प्रयोग म्हणून पाहा. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो. चर्चेमधून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे," असंही राजनाथ सिंह म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
4. मोदी सरकारने भविष्याविषयी बोलावं - राऊत
भारतात आधीच्या सरकारच्या काळात काय झालं, याविषयी बोलण्यात अर्थ नाही, त्यांनी काम केलं नाही त्यामुळे तुम्ही सत्तेत आहात. म्हणून काल काय झालं, आज काय झालं हे सोडून मोदी सरकारने भविष्याविषयी बोलावं, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (26 डिसेंबर) केलेल्या भाषणात केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी मोदी तसंच भाजपवर टीका केली.

फोटो स्रोत, Ani
अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंह आणि लालबहादूर शास्त्री यासारख्या नेत्यांनी देशाचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजवरच्या विकासाचे श्रेय एका राजकीय पक्षाला देऊन चालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी केलेल्या भाषणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी नरेंद्र मोदी भाषणबाजी करत आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. या दोन्ही बातम्या टीव्ही 9 मराठीने दिल्या आहेत.
5. पदवीच्या प्रवेशासाठी 2021-22 पासून एकच परीक्षा
बारावीनंतर पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी देशभरात एकच परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा देण्याची कसरत करावी लागते.
ही कटकट मिटवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याची माहिती उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी दिली आहे. या परीक्षेत अप्टीट्यूड टेस्टही घेतली जाईल. 2021-22 या शैक्षणित वर्षात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























