शेखर मांडेः कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन 15-17 लोकांना संक्रमित करू शकतो
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
यूकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन 'स्ट्रेन' आढळून आला आहे. कोरोनाचं हे बदललेलं रूप अधिक घातक आणि झपाट्याने पसरत असल्याची माहिती मिळतेय.
गेल्या काही दिवसात यूकेहून भारतात परतलेल्या प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. या प्रवाशांना नवीन 'स्ट्रेन'चा संसर्ग झाला आहे का? याचा अभ्यास भारतातील संशोधक करत आहेत.
पण व्हायरस म्युटेट होतो म्हणजे नक्की काय? या बदललेल्या व्हायरसचा लशीवर काही परिणाम होईल का? हा व्हायरस भारतात आला असण्याची शक्यता आहे का?
हे आम्ही केंद्र सरकारची संस्था काउंसिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्चचे (CSIR) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्याकडून जाणून घेतलं.
प्रश्न - जगभरात यूकेत म्युटेट झालेल्या 'स्ट्रेन' ची चर्चा सुरू आहे. भारतातही यूकेहून आलेले प्रवासी पॉझिटिव्ह आढळलेत. हा व्हायरस भारतात आला असल्याची शक्यता आहे?
डॉ. शेखर मांडे - ही शक्यता आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. व्हायरस भारतात आला नसल्याची शक्यता शून्य टक्के आहे असं म्हणू शकत नाही. पण भारतात किती प्रचलित आहे याबद्दल फार माहिती नाही.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - हा नवीन 'स्ट्रेन' 70 टक्के जास्त झपाट्याने पसरतो अशी माहिती मिळतेय? हा घातक आहे?
डॉ. शेखर मांडे - यूकेमध्ये आढळून आलेल्या व्हायरसमध्ये 17 म्युटेशन (बदल) झाले आहेत. हे म्युटेशन सप्टेंबर महिन्यात आढळून आले.
संशोधनात असं आढळून आलं की याची पसरण्याची क्षमता (Transmissibility) वाढली आहे. एक व्यक्ती किती व्यक्तींना व्हायरस देऊ शकतो. याला Transmissibility म्हणतात. या नवीन स्ट्रेनमध्ये पसरण्याची क्षमता 70 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रश्न - मग हा नवीन व्हायरस एक व्यक्तीपासून किती लोकांपर्यंत पसरू शकतो?
डॉ. शेखर मांडे - पूर्वीचा व्हायरस साधारणत: एका व्यक्तीपासून 10 ते 12 व्यक्तींपर्यंत पोहोचायचा. यूकेमधील हा नवीन स्ट्रेन 15 ते 17 लोकांपर्यंत जाऊ शकतो असं आपण म्हणू शकतो.

- वाचा - जगभरात कोरोनाच्या कोणत्या लसीचं काम कुठवर आलं आहे?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-ऑक्सफर्डची लस 70 टक्के परिणामकारक असल्याचा दावा
- वाचा- लाँग कोव्हिड म्हणजे काय? गंभीर संसर्गापेक्षा सौम्य लक्षणं असणाऱ्यांना जास्त त्रास?

प्रश्न - यूकेतून हा व्हायरस भारतात आला का नाही. हे शोधण्यासाठी काय करावं लागेल?
डॉ. शेखर मांडे - यासाठी आपल्याला जिनोम सिक्वेंसिंग करावं लागेल. यूकेहून आलेल्या एकाद्या व्यक्तीला आजार झाला असेल. तर, आपण त्याचे सॅम्पल घेऊन जिनोम सिक्वेंन्स करायचा. एका दिवसात आपल्याला कळेल की यात म्युटेशन आहे का नाही.
प्रश्न - काही लोकं महिन्याभरापूर्वी भारतात आले. एअरपोर्टवर काही पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. या सर्वांचं जिनोम सिक्वेंसिंग करावं लागेल?
डॉ. शेखर मांडे - सप्टेंबरपासून हे यूकेत सुरू झालं. व्हायरस आपल्या शरीरामध्ये 6-10 दिवस रहातो. त्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीमुळे बाहेर जातो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये भारतात आलेल्यांच्या शरीरात व्हायरस नसेल. मात्र, गेल्या सात-दहा दिवसात भारतात आलेल्या व्यक्तीला ताप आला असेल तर, त्याचा सिक्वेंस करणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - मग व्हायरस शोधण्यासाठी जिनोम सर्व्हेलन्स महत्त्वाचं ठरेल?
डॉ. शेखर मांडे - जिनोम सर्व्हेलन्स करणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारने त्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 1-2 दिवसात हे सर्व्हेलन्स सुरू होईल.
प्रश्न - भारतात आत्तापर्यंत आपण 4000 च्या आसपास जिनोम सिक्वेंसिंग केलेत. भारतात काही म्युटेशन आढळून आलेत?
डॉ. शेखर मांडे - भारतातही व्हायरसचे विविध प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहेत. दिल्लीत A3I जास्त आढळून येतो. तर, तामिळनाडूत A2A जास्त आढळून येतो. या दोन्हीत म्युटेशन आहेत. यात चिंता करण्याची गरज नाही.
प्रश्न - व्हायसरसारखा म्युटेट (बदलत) होत असेल. तर, मग याचा लशीवर परिणाम होणार का?
डॉ. शेखर मांडे - सद्यस्थितीत याचा लशीवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. याचं कारण फक्त 17 म्युटेशन आढळून आले आहेत. आपल्याला दिलेली लस व्हायरसला सिम्युलेट केलेली असते. स्पाईक प्रोटीनला शरीरात दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसवर हल्ला करते. म्युटेशन फक्त 17 आणि रोगप्रतिकारक शक्ती एकत्र असल्याने एंटीबॉडीज त्याला बाईंड करतील. त्यामुळे लशीवर फार फरक पडेल असं वाटत नाही.
प्रश्न - पण, येणाऱ्या काळात जास्त म्युटेशन आढळून आले. तर, आपल्याला लस नव्याने तयार करावी लागेल?
डॉ. शेखर मांडे - नव्याने लस तयार करावी लागेल असं वाटत नाही. नवीन स्ट्रेनमध्ये बदल फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला बदल सहज करता येतील. पण त्याची पुन्हा क्लिनिकल ट्रायल करावी लागेल. सद्यस्थितीत लस काम करणार नाही, असं मानणं चुकीचं ठरेल. लस काम करेल असं वाटतंय.
प्रश्न - सामन्यांना प्रश्न पडलाय की, कोरोना होऊन गेला असेल तर नवीन स्ट्रेनमुळे त्रास होण्याची शक्यता आहे का?
डॉ. शेखर मांडे - एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीराला कळतं की व्हायरस कसा दिसतो. रोगप्रतिकारशक्तीने व्हायरस कसा दिसतो हे पाहिलेलं असतं. त्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकार क्षमता तयार झालेली असते. या 17 म्युटेशनमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती याला ओळखणार नाही हे अशक्य आहे. त्यामुळे नवीन म्युटेट झालेल्या व्हायरसचा संसर्ग होईल याची शक्यता फार कमी आहे.
प्रश्न - व्हायरस रूप बदलतो म्हणजे म्युटेट होतो. म्हणजे नक्की काय होतं?
डॉ. शेखर मांडे - प्रत्येक व्हायरसचा एक कोड असतो. प्रत्येक पेशीतील DNA जेव्हा आपली कॉपी करतो. तेव्हा म्युटेशन होण्याची शक्यता असते. डीएनएच्या क्रमाला आपण जिनोम सिक्वेंन्सिंग म्हणतो.
प्रत्येत व्हायरसमध्ये DNA असतो. कोरोना व्हायरसमध्ये RNA आहे. प्रत्येक व्हायरस आपली कॉपी बनवतो. काहीवेळा हा कोड बदलतो आणि त्यांचा सिक्वेंन्स बदलतो.
कोरोना व्हायरसमध्ये 26-27 प्रकारची प्रथिनं आहेत. त्यात एक स्पाईक प्रोटीन आहे. स्पाईक प्रोटीनच्या जीनमध्ये बदल झाला. तर, तो बदल व्हायरसमध्ये होईल. या बदलाला म्युटेशन म्हणतात.
प्रश्न - प्रत्येक म्युटेट झालेला व्हायरस त्रासदायक ठरतो?
डॉ. शेखर मांडे - प्रत्येक व्हायरस म्युटेट होता. पण त्याचा रेट काय आहे हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्हायरसचा म्युटेट होण्याचा रेट वेगळा आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत आहेत. पण, फार जास्त नाहीत. काही व्हायरस एक लाख झाल्यानंतर म्युटेट होतात. तर काही एक कोटी झाल्यानंतर बदलतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























