कोरोना लस : भारतात बनतायेत 'या' 9 लशी, पण लसीकरण कधीपासून?

फोटो स्रोत, EPA/ABIR SULTAN
कोरोना व्हायरसवरची लस जानेवारीमध्ये लोकांना द्यायला सुरुवात होऊ शकते, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी (21 डिसेंबर) केली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात सध्या 9 लशी क्लिनिकल ट्रायल्सच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. एक नजर टाकू या या लशींवर आणि पाहूया की त्या कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतात?
1. कोव्हिशील्ड
ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लशीचं अॅस्ट्राझेनेका मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटसुद्धा याच लशीचं उत्पादन करत आहे. काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लस निर्मितीचा आढावा घेतला होता.
याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सध्या सुरू आहेत, आणि याचं लसीकरण तातडीने सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागण्यात आली आहे.

फोटो स्रोत, DDNEWS.GOV.IN
2. कोव्हॅक्सिन
हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनी या लशीची निर्मिती करत आहे. एका मेलेल्या व्हायरसपासून तयार होणाऱ्या या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्सचा तिसरा टप्पा ICMRच्याच सहकार्याने सुरू आहे. याही लशीच्या इमरजन्सी वापराची परवानगी केंद्र सरकारकडे मागण्यात आली आहे.
3. ZyCov-D
कॅडिला हेल्थकेअरची ही लस DNA प्लॅटफॉर्मवर बनवली जात आहे. यासाठी झायडस कॅडिला या फार्मा कंपनीने बायोटेक्नॉलॉजी विभागाची मदत घेतली आहे. याच्याही क्लिनिकल ट्रायल्सचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे.
4. स्पुटनिक-V
रशियाने जगात सर्वांत आधी कोरोनावरची लस तयार झाल्याचा दावा केला होता. तिथल्या गॅमेली नॅशनल सेंटरने ही लस विकसित केली आहे, तर हैदराबादची डॉ. रेड्डीज लॅब या लशीची भारतात निर्मिती करत आहे. ही लस सध्या क्लिनिकल ट्रायल्सच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

फोटो स्रोत, REUTERS/FRANCIS MASCARENHAS/FILE PHOTO
5. NVX-CoV2373
कोरोना व्हायरसच्या प्रोटीनपासून बनलेल्या भागातून ही लस विकसित करण्यात आली. नोव्हावॅक्स या फार्मा कंपनीसोबत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने यासाठी भागीदारी केली आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा विचार सध्या सुरू आहे.
6. प्रोटीन अँटीजेनवर आधारित लस
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MITने विकसित केलेली ही लस प्रोटीन अँटिजेनवर आधारित आहे. हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनी याची निर्मिती करत आहे. याचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सध्या सुरू झाल्या आहेत.
7. HGCO 19
अमेरिकेतील HDT या फार्मा कंपनीने mRNAवर आधारित ही लस विकसित केली आहे. पुण्याच्या जिनोव्हा कंपनीत त्याचं उत्पादन सुरू आहे. याच्या प्राण्यांवरील चाचण्या संपल्या असून, लवकरच याच्या मानवी चाचण्या सुरू होणार आहे.

फोटो स्रोत, EPA/MAXIM SHIPENKOV
8. भारत बायोटेकची लस
अमेरिकेतील थॉमस जेफरसन विद्यापीठासोबतच्या भागीदारीत हैदराबादमधल्या भारत बायोटेक कंपनीत या लशीची निर्मिती सुरू आहे. मृत रॅबिज व्हेट्करवर आधारित ही लस प्री-क्लिनिकल ट्रायल्सच्या पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे.
9. ऑरोव्हॅक्सिन्स
भारतातील ऑरोबिन्दो फार्मा ही कंपनी आपल्या अमेरिकेतील ऑरो व्हॅक्सिन्स या उपकंपनीद्वारे एक लस विकसित करते आहे. ही लस सध्या प्रीडेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























