पिंकीचं लग्न, धर्म परिवर्तन, पतीला अटक आणि 'गर्भपात'

पिंकी, आंतरधर्मीय लग्न, नवीन कायदा, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, GAJANFAR ALI

फोटो कॅप्शन, पिंकी
    • Author, गजफर अली, मुरादाबादहून, बीबीसीसाठी
    • Role, दिलनवाझ पाशा, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

लग्नासाठी धर्म परिवर्तन करायला भाग पाडणं हा गुन्हा असल्याचं उत्तर प्रदेश राज्याने पारित केलेला नवा कायदा सांगतो. या कायद्याअंतर्गत मुरादाबादमध्ये करण्यात आलेली कारवाई चर्चेत आहे. कायद्याचा दुरुपयोग म्हणून या कारवाईकडे पाहिलं जात आहे.

पिंकी नावाच्या मुलीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. तिला पतीपासून वेगळं करून नारी आश्रय केंद्रात ठेवण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशात आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी पारित करण्यात आलेल्या वादग्रस्त कायद्याअंतर्गत पतीपासून विलग करून महिला केंद्रात रवानगी होणारी पिंकी पहिली मुलगी आहे.

या केंद्रात शोषण झाल्याचं पिंकीचं म्हणणं आहे. पिंकीच्या म्हणण्यानुसार तिला एक इंजेक्शन देण्यात आलं ज्यामुळे तिचा गर्भपात झाला.

मुरादाबाद पोलिसांनी पिंकीचा गर्भपात झाल्याच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही. मुरादाबादचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, "मर्जीनुसार लग्न करून सासरी गेल्याचं पिंकीने न्यायालयाला सांगितलं होतं. याच आधारे तिला सासरकडच्या लोकांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे".

नारी निकेतन केंद्रात असताना पिंकीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावर उपचार करण्यात आले.

गर्भपाताच्या मुद्यावर मुरादाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, मंगळवारी डॉक्टरांनी पोलिसांनी सांगितलं की पिंकीच्या पोटातील गर्भ सुरक्षित आहे. यासंदर्भात कोणतीही नवीन माहिती मिळालेली नाही.

पिंकी, आंतरधर्मीय लग्न, नवीन कायदा, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, GAJANFAR ALI

फोटो कॅप्शन, पिंकीला सासरी पाठवण्यात आलं आहे.

पिंकीच्या पतीला नव्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच त्याची सुटका होऊ शकते.

22वर्षीय पिंकीच्या म्हणण्यानुसार, "सात आठवड्यांपासून मी गरोदर आहे. 5 डिसेंबरला मला नारी निकेतन केंद्रात पाठवण्यात आलं होतं. तिथे माझा छळ करण्यात आला.

"तीन दिवसांपूर्वी माझ्या पोटात दुखू लागलं. तब्येत बिघडल्याने मला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं. माझ्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. मंगळवारी न्यायालयात सुनावणी होती. मला तिथे जायचं होतं. माझी तब्येत पुन्हा बिघडल्याने मला पुन्हा इंजेक्शन देण्यात आलं. माझा गर्भपात झाला आहे".

पिंकीला नेमकं कोणतं इंजेक्शन देण्यात आलं यासंदर्भात माहिती मिळालेली नाही तसंच पिंकीच्या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. ही इंजेक्शनं गर्भपाताचं कारण ठरू शकतात हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पिंकीने सांगितलं की, "पहिल्या अल्ट्रासाऊंडमध्ये माझ्या पोटातील गर्भ व्यवस्थित होता. इंजेक्शन दिल्यानंतर माझा गर्भपात झाला".

स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर, पिंकीला सासरी पाठवण्यात आलं आहे.

मुरादाबादचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्यानुसार, "बिजनौरच्या बालादेवी यांनी 5 डिसेंबरला कांठ ठाणे क्षेत्रात नव्या कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला. लग्नासाठी मुलीचा धर्म बदलायला लावल्याचा आरोप त्यांनी दोन जणांवर केला. एफआयआर दाखल केल्यानंतर त्या दोन जणांना अटक करण्यात आली".

पिंकी, आंतरधर्मीय लग्न, नवीन कायदा, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, GAJANFAR ALI

फोटो कॅप्शन, पिंकीच्या केससंदर्भात पोलिसांनी माहिती दिली.

मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तिला नारी निकेतन केंद्रात पाठवण्यात आलं होतं. मुलीने न्यायालयाला सांगितलं की तिने मर्जीने धर्म बदलला आहे आणि लग्न केलं आहे. मुलीने सासरी जाण्याची इच्छाही व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानंतर तिला सासरी पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचं वय 22 आहे आणि सज्ञान आहे. मुलीने पोलिसांसमक्षही सासरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी अटकेत आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. भारतीय दंड संहिता 164 अंतर्गत युवतीने दिलेल्या जवाबाची छाननी करण्यात येईल. पुराव्यानिशी निर्णय होईल.

पिंकीने जुलै महिन्यात रशीद नावाच्या मुलाशी लग्न केलं. नव्या कायद्याअंतर्गत पती-पत्नीला एकमेकांपासून वेगळं केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकाही होते आहे.

व्हीडिओ कॅप्शन, लव्ह - जिहाद असं काही असतं का? हिंदू - मुस्लीम लग्नात लव्ह जिहाद कुठून आलं?

काही दिवसांपूर्वी मुलीच्या सासू नसीम जहां यांनीही सूनेच्या गर्भपाताचा मुद्दा उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले होतं. मुलीला दोनदा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिच्या पोटातील गर्भ सुरक्षित आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

सोमवारी मुरादाबाद जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विमला पाठक यांनी पत्रकारांना सांगितलं की, "सकाळी मुलीला आणण्यात आलं तेव्हा तिची प्रकृती व्यवस्थित होती. दुसऱ्यांदा तिला आणण्यात आलं तेव्हा रक्ताचे डाग होते".

मुलीच्या पोटातील गर्भाविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, "पोटातील गर्भ कोणत्या स्थितीत आहे हे आता सांगता येणार नाही. रुग्णालयात तिला रक्तस्राव झालेला नाही. नारी निकेतन केंद्रात असताना रक्तस्राव झाल्याचं मुलीने सांगितलं आहे. यासंदर्भात आम्ही चौकशी करू. आमच्याकडे आता पूर्ण अहवाल आलेला नाही.

अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भ दिसतो आहे मात्र तो सुरक्षित स्थितीत आहे की नाही हे आता सांगता येणार नाही".

कधी झालं लग्न? पोलीस स्टेशनमध्ये काय झालं?

पिंकीने दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलैला डेहराडूनला रशीदशी तिचं लग्न झालं. 5 डिसेंबरला ते लग्नाची नोंदणी करायला आले होते.

सोशल मीडियावरच्या एका व्हायरल व्हीडिओत पिंकीवर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचं दिसत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, हिंदुत्ववादी कार्यकर्ते न्यायालयाच्या परिसरात पोहोचले आणि त्यांनी दांपत्याला पकडून पोलीस स्टेशनला नेलं.

नंतर पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रशीद आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

उत्तर प्रदेश सरकारने 29 नोव्हेंबरला अवैध धर्मांतर निषेध कायदा पारित केला. याअंतर्गत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना लग्न करण्याच्या दोन महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य आहे.

या कायद्यानुसार, अवैध पद्धतीने धर्म परिवर्तन करायला भाग पाडल्याबद्दल दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे आणि हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)