मुंबई लोकल ट्रेन जानेवारीत सर्वांसाठी सुरू होऊ शकते - विजय वडेट्टिवार

फोटो स्रोत, PAL PILLAI/Getty images
मुंबईतल्या लोकल ट्रेन्स जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी जाहीर केलं आहे.
विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
"मुंबई लोकल जानेवारीमध्ये सर्वांसाठी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कशापद्धतीने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित असावा यासंदर्भातील सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा आमचा विचार आहे," असं विजय वडेट्टिवार यांनी म्हटलंय.
आता मुंबई आणि परिसारातली कोरोनाची स्थिती निवळली आहे. त्यामुळे आम्ही आता 15 दिवसांमध्ये आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेऊ असंही वडेट्टिवार यांनी सांगितलं आहे.
शिवाय विनामास्क ट्रेनमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गर्दी टाळण्यासाठी अॅप
रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अॅप तयार केलं जातंय, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याआधीच दिली होती. या अॅपमधून तिकीटं बुक करता येतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.
मुंबई लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा, राज्याचं केंद्राला पत्र
"मुंबईच्या लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी सुरू कराव्यात या विनंतीचं पत्र आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवलं आहे. लोकल कशा पद्धतीनं चालवण्यात याव्यात याबाबतही आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे. अजून त्याचं त्यावर काही उत्तर आलेलं नाही," असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑक्टोबरमध्ये बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.
राज्य सरकारच्या पत्रानुसार असे असू शकतात नियम
- तिकीट आणि पास असणाऱ्यांसाठी सकाळी पहिल्या लोकलपासून सकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा.
- सकाळी 8.30 ते 10.30 या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलचा वापर करता येईल.
- सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा.
- संध्याकाळी 5 वाजल्यापासून 7.30 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवासी प्रवास करू शकणार.
- रात्री 8 वाजल्यानंतर पुन्हा सर्वसामान्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार.
ट्रेनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती
लोकल ट्रेनवर फक्त मुंबई आणि उपनगरातील लोकच अवलंबून नाहीत, तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हायात राहणारे अनेकजण रोज कामासाठी लोकलनेच प्रवास करतात.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिडची साथ येण्याआधी मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून जवळपास 78 लाख लोक दिवसाला प्रवास करत असत. अनेकदा सतराशे ते अठराशे प्रवासी क्षमता असलेल्या ट्रेनमध्ये चार हजारांहून अधिक प्रवासी असतात.
त्यामुळे पूर्ण क्षमतेने लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्या, तर तिथे कोव्हिडचा प्रसारही वेगाने होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फिजिकल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळणार?
फिजिकल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे, पण आपल्याकडची लोकसंख्या पाहता अनेक गोष्टी शक्य नाहीत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं. त्यासाठी लोकल ट्रेनमधला प्रवास कसा असेल याविषयी काही नियम ठरवावे लागतील असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं.
"अनेक गोष्टी शक्य नव्हत्या, पण त्या परिस्थितीनं शक्य झाल्या. साथीच्या आधीच्या अनेक गोष्टी टाळाव्या लागतील. गर्दी कमी करावीच लागेल, अनावश्यक प्रवास टाळावा लागेल, प्रत्येकाला स्क्रीन करावंच लागेल. मास स्क्रिनिंगसाठी काही तंत्रज्ञान वापरावंच लागेल."
त्यानुसार प्रवासात मास्क घालणं, आजारी व्यक्तींनी प्रवास टाळणं, तपासणी करूनच प्रवाशांना स्टेशनात प्रवेश देणं, गर्दी टाळण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलणं अशी पावलं उचलली जाऊ शकतात.
अधिकाधिक लोकांची तपासणी लवकर व्हावी यासाठी मास स्कॅनरसारख्या तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सरकारचा विचार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























