मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा.
1. मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी
मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करून आंदोलकांना रोखलं जात आहे. सोमवारी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.
या प्रवेशबंदीमुळे मुंबईच्या वेशीवर वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा आंदोलन लहान स्वरुपात व्हावं यासाठी खबरदारी म्हणून ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईकरांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. 'टीव्ही९ मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी या रॅलीला सुरुवात होईल.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. आरक्षणविषयक पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. मुंबईत आजपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू होतंय.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. तसा अर्जही राज्य सरकारने न्यायालयात दाखल केला होता. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी घेतली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. सरकारची ही मागणी मान्य करून पाच सदस्यीय घटनापीठासमोर मराठा आरक्षणविषयक सुनावणी सुरु आहे. पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.
2. अर्धा देश उपाशी असताना नव्या संसदेची गरज आहे का?- कमल हसन
"कोरोना काळात अर्धी जनता उपाशी आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या परिस्थितीत जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करुन नवे संसद भवन का बांधले जात आहे?" असा प्रश्न प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
"ग्रेट वॉल ऑफ चायना' बांधली जात असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील राज्यकर्त्यांनी ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे, असे सांगितलं होतं. तुम्ही कुणाचं संरक्षण करण्यासाठी नवं संसद भवन बांधत आहात? माननीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं", असं हसन यांनी म्हटलं आहे.
कमल हसन यांच्या तामिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराला कमल हसन यांनी मदुराईमधून सुरुवात केली आहे. या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं ते आगामी काही दिवसांमध्ये तामिळनाडूतील प्रमुख जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
3. संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- कोश्यारी
संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं, असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"राजा बदलले असतील, राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडेही झाले असतील. मात्र. देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत आहे. संतांच्या या कार्यामुळेच आपला देश वाचलाय. संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं, असं राज्यपालांनी म्हटलंय.
संत नामदेव, गुरू गोविंद सिंग यासह देशातील प्रत्येक संतांनी दिलेली शिकवण सर्वांनी अंमलात आणावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
4. जीन्स पँटचं चुकीचं झालं, आम्ही विचार करतोय-अजित पवार
"सरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाहीत. घरी असले टी शर्ट घातलं तर ठीक आहे. जीन्स पँटचं चुकीचं झालं. बघू आम्ही त्याच्यावर विचार करतोय", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोडचे नियम जारी केले आहेत. यानुसार कार्यालयात काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांना आता या नियमांचं पालन करावं लागणार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स पँट घालू नये, असंही नियमांत म्हटलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.
5. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटलं तर वावगं वाटत नाही पण शूद्रांना शूद्र म्हटलं तर वाटतं- प्रज्ञासिंह ठाकूर
"आपल्या धर्मात समाज व्यवस्थेसाठी चार वर्ग निश्चित करण्यात आले आहेत. क्षत्रियांना क्षत्रिय म्हटल्यास वाईट वाटत नाही. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास वाईट वाटत नाही. वैश्य समाजाला वैश्य म्हटलं तर वाईट वाटत नाही पण शूद्रांना शूद्र म्हटलं तर लगेच वाईट वाटतं. कारण समजत नाही", असं भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
वादग्रस्त विधानांमुळे त्याआधीही चर्चेत राहिल्या आहेत. अशा स्वरुपाच्या वक्तव्यांसंदर्भात प्रज्ञासिंह ठाकूर यांना दोनदा माफी मागावी लागली होती. सीहोरमध्ये आयोजित क्षत्रिय संमेलनात चातुवर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करत त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रज्ञा सिंग ठाकूर मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातल्या आरोपी आहेत. या स्फोटात 10 जण ठार झाले होते तर 82 जण जखमी झाले होते. याप्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























