'तेव्हा मूग गिळून गप्प का,' मनसेचा संजय राऊतांना टोला #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook
1. तेव्हा मूग गिळून गप्प का - मनसेचा राऊतांना टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता त्यांनी हा टोला हाणला आहे. 'महाराष्ट्र टाईम्सने'ने ही बातमी दिली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हळूहळू देशभरात पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनंही बंदला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे.
2. गुजरातमध्ये भारत बंद होणार नाही - रुपाणी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमध्ये भारत बंद होणार नसल्याचं स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक भारत बंद आंदोलन करत आहेत. नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. पण विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे.
काँग्रेसनेच 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात एपीएमसी अॅक्ट रद्द करणार असल्याचं सांगितलं होतं. एमएसपी हटवू असंही त्यांनी म्हटलं होतं, याकडेही रुपाणी यांनी लक्ष वेधलं आहे.
3.आम्ही येणार म्हणणारे सत्तेकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत - बाळासाहेब थोरात
"आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे," असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरून त्यांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली.

फोटो स्रोत, Twitter
कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
तसंच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षं चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
4. पालघर हत्याकांडप्रकरणी 47 जणांना जामीन
पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ४७ आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दोन साधूंची हत्या पालघरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणातल्या ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर ४७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणातल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, ANI
पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झुंडीने केलेल्या मारहाणीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 200 लोकांना अटक केली होती. त्यापैकी आजवर 105 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
5. अर्णब गोस्वामींच्या अडणचीत वाढ
रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द आणि तपास सीबीआयला सोपवण्याच्या अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भात कोणालाही अटक करू नये आणि प्रकरण सीबीआयला हस्तांतरित करण्यात यावं असं तुम्हाला वाटतं आहे. यापेक्षा तुम्ही याचिका मागे घ्या, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
याचिकेत करण्यात आलेली मागणी महत्वाकांक्षी प्रवृत्तीचं असल्याचंही न्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केलं. नवभारत टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























