मुंबई महापालिका निवडणूक : राज ठाकरेंच्या मनसेशी युती करायला भाजप का तयार नाही?

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, भाजप, मनसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजप आता मनसेची साथ घेणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परंतु भाजपने आता स्वबळावर निवडणुका लढवण्याचं पक्कं केलं आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे."

मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येणार का? याबाबत फडणवीसांना प्रश्न विचारलं असता त्यांनी हे सांगितलं.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, भाजप, मनसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

शिवसेनेनं भाजपची साथ सोडणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेणं, इथेच मनसे स्वत:साठी नवी राजकीय संधी शोधते आहे. ती संधी साधण्यासाठीच आता मनसे हिंदुत्वाकडे झुकेल आणि भाजपचा राज्यातला नवा पार्टनर होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

व्हीडिओ कॅप्शन, राज ठाकरेंच्या मनसेशी मुंबई महानगरपालिकेत युती करायला देवेंद्र फडणवीस का नाही तयार?

"आमच्यासोबत काही छोटे मित्र पक्ष आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे," असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

मनसेनं मात्र फडणवीसांच्या या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

"मनसेची स्थापना महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी झाली आहे. निवडणुकीत युती करायची की नाही हा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. ते योग्य निर्णय घेतील. युतीसंदर्भात कोणाशी चर्चा सुरू असल्याचं मला तरी कल्पना नाही. ज्यावेळी ती वेळ येईल त्यावेळी बघू. मराठी माणसाच्या हितासाठी जे करावं लागेल ते करत आलोय, करत राहू," असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

"त्यांच्याकडे काय विचार सुरू आहे हे मला ठाऊक नाही. आमची मराठीची व्याख्याही व्यापक आहे. ती व्याख्या कोणाला समजत नसेल तर पुन्हा एकदा समजावून दिली जाईल. भाजपसोबत जायचं की नाही, त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर काय करायचं हे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील. सध्या तरी अशा स्वरुपाची कोणतीही चर्चा झालेली नाही," असं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

छुपी युती होणार?

महापालिका निवडणुकीत जर शिवसेना सेक्युलर भूमिका घेत असेल आणि मनसेनं भाजपसोबत जायचं ठरवलं तर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांना वाटतं.

ते सांगतात, "मुंबई, ठाणे हा मनसेचा बालेकिल्ला आहे. तिथे स्वबळावर लढणं मनसेला गरजेचं आहे. जागावाटपात कमी जागा मिळतात, कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेशी मनसेचा सामना होऊ शकतो. अशावेळी भाजपबरोबरची युती अडचणीची होऊ शकते. निवडणुकीत मराठीचा मुद्दा राहणार. भाजपच्या मागणीनुसार मराठीचा मुद्दा पातळ करणं मनसेसाठी त्रासाचं होईल."

राज ठाकरे

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

"भाजपला एकटं पाडण्याचं राजकारण यशस्वी झालंय. मनसे भाजपसोबत थेट जाण्यापेक्षा छुपी तडजोड करू शकतं. आपापल्या पद्धतीने महाविकास आघाडीवर टीका करायची. शिवसेनेवर टीका करायची. परस्परांवर टीका करायची. उमेदवार उभे करताना, भाजपचा उमेदवार मजबूत आहेत तिथे उमेदवार द्यायचा नाही आणि मनसे मजबूत आहे तिथे भाजप मोठा उमेदवार उभा करणार नाही असं होऊ शकतं," असं प्रधान यांनी सांगितलं.

"काही लढायांमध्ये शिवसेना-मनसे मुकाबला आहे, लढाईत भाजप नाहीयेच असं भासवलं जाईल. उघडपणे एकत्र येण्याऐवजी दोघेबी पूरक राजकारण करू शकतात. आक्रमक मराठीचा मुद्दा भाजपला परवडणारा नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या भाजपबरोबर एकत्र येत होती. शिवसेनेने मराठीसंदर्भात टोकाची भूमिका घेतली नाही. ती मनसेने घेतली. तीच त्यांची ओळख आहे. भाजपबरोबर जाऊन ही भूमिका मवाळ केल्यास मतदार नाराज होऊ शकतात", असं प्रधान यांना वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)