'हिंदुत्वावर संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांनी आज प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा घेतलेला हा आढावा.
1. हिंदुत्वावर संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?- प्रसाद लाड
शिवसेनेचं हिंदुत्व आजही अबाधित आहे, अशी आशा आहे. पण आज आपल्या हिंदुत्वावर संकट ओढावलेले दिसत असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. राज्य सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा करावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणे आहे. या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटलेला असतानाही आपणांकडून काही ठोस पावलं उचलली जाऊ नये हे दुर्दैवी आहे.
आजच्या घडीला देशात लव्ह जिहादच्या घटना वाढत असताना, अनेक राज्यांनी याप्रकरणी धर्मस्वातंत्र्य कायदा लागू केला आहे. मध्यप्रदेश सरकारने देखील अशा आंतरधर्मीय विवाहसंबंधी कायदा लागू करण्याचे घोषित केले आहे. या नवीन कायद्याअंतर्गत दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्यात येईल. याआधीच उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब सरकारने देखील अशाप्रकारचा कायदा आणणार असल्याची घोषणा केली होती.
2. अध्यक्षांविना राष्ट्रीय पक्ष कसा चालू शकतो-सिब्बल
"राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वी आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच त्या पदावर गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असू नये असंही ते म्हणाले होते. या गोष्टीला दीड वर्ष उलटल्यानंतरही मी हे विचारू इच्छितो की कोणताही राष्ट्रीय पक्ष अध्यक्षांविना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी काम कसा करू शकतो? असा सवाल खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मी पक्षांतर्गत चर्चेतही या विषयावर बोललो होतो. आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिलं होतं. परंतु आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. दीड वर्षांनंतरही आमच्या पक्षाला अध्यक्ष नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्या?
"जर पक्ष निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करत नसेल तर माझ्या भावनाही दुखावल्या जातात. मीदेखील एक काँग्रेस कार्यकर्ता आहे. मी लाखो कार्यकर्त्यांचा आवाज उचलत आहे. मी गांधी कुटुंबीयांवर कोणतीही टीका करत नाही. मी पक्षाची लोकशाही व्यवस्था वाढवण्याबद्दल बोलत आहे", असं खासदार कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'शी ते बोलत होते.
3.पदवीधरांच्या बेकारीला भाजपच जबाबदार-जयंत पाटील
"संपूर्ण देशात भाजप सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. कारखानदारांनी तरुणांना कामावरून कमी करून उत्पादन निम्म्यावर आणलं. त्याला मोदी सरकारची धोरणं कारणीभूत आहेत.
पदवीधरांच्या बेकारीलाही भाजपच जबाबदार असून, त्यांच्याविरोधात देशात आणि राज्यात नाराजीचा सूर आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणावरही विसंबून न राहता मतदारापर्यंत पोहोचून जास्तीतजास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावा", असं वक्तव्य जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा इथं केलं. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला आहे. राज्याची उत्पन्नाची साधने वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काम सुरू आहे असं पाटील यांनी पुढे सांगितलं.
4. महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून चमचे-अमोल मिटकरी
"महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध रहावे", अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. "तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ" असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
यंदा कार्तिकीच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. आषाढीच्या वेळीही वारीचे स्वरुप हे मर्यादित होते.
आता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र देवस्थानात करण्यात येणारे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीचे आखून दिलेले नियम आहेत त्यानुसार होणार आहेत.
5. नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं
गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येमुळे लक्ष देत नसल्याने स्थानिकांनी नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना समोर आली आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
हे प्रकरण वाराणसी वॉर्ड क्रमांक 79 अंबियापूर बाजार क्षेत्रातील आहे. येथील नगरसेवकाचे नाव तुपैल अंसारी असं आहे. या वॉर्डशी संबधित जवळील भागात बऱ्याच काळापासून गटारातीली पाणी रस्त्यावर येत आहे. इतकंच नाही तर जागोजागी पिण्याचे पाईपलाइन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही.
दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील लहान मुलं आजारी पडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. गेल्या अनेक काळापासून या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत अनेक वेळा नगरसेवकांनाही सांगण्यात आलं. मात्र त्यांनी यावर कोणताही उपययोजना केली नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
अनेकदा या समस्येबाबत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मात्र त्यांनी यावर उपाययोजना केली नाही. यामध्ये माझी काहीच चूक नाही असं तुफैल यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























