कोरोना : दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच रुग्ण वाढले - किशोरी पेडणेकर #5मोठ्याबातम्या

किशोरी पेडणेकर

फोटो स्रोत, Twitter/Kishori Pednekar

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) कोरोना : दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच रुग्ण वाढले - किशोरी पेडणेकर

दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असा दावा शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

"मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल," अशी भीतीही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

ट्रेन सुरू करण्यासही पेडणेकर यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या, "ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तूर्तास रेल्वे सुरु करू नये."

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केलीय.

"दारुची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट राज्य सरकारने केव्हाच उघडली आहेत. पण रुग्ण मात्र चार दिवसांपूर्वी उघडलेल्या मंदिरामुळे वाढले, हे महापौरांचे तर्कट आहे. हा तर्क नाही शिवसेनेचा खरा चेहरा आहे", असं भातखळकरांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय.

2) महाविकास आघाडी सरकार पलटूराम - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार म्हणजे पलटूराम सरकार असल्याची टीका भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संदीप जोशींच्या प्रचारासाठी आयोजित पदवीधर मेळाव्यात देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. यावेळी फडणवीसांनी वीज बिलांच्या मुद्द्यावरून ऊर्जामंत्र्यांवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis

"ऊर्जामंत्र्यांनी स्वतः घोषणा करत बिलं कमी करू असे जाहीर केले होते. नुसते ऊर्जामंत्री बोलले नव्हे तर तर तिन्ही पक्षाचे नेते कॅबिनेटनंतर मीडियासमोर आले होते आणि घोषणा करत फोटो काढले होते. टीव्हीवर झळकले होते, आता मात्र सर्व पलटले," अशी टीका फडणवीसांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही फडणवीसांनी निशाणा साधला. "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका वर्षात विदर्भात आले नाही. हे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणासाठी काम करणारे सरकार नाही. मुख्यमंत्री एका भागासाठी काम करतात, उपमुख्यमंत्री त्यांच्या भागासाठी काम करतात. मात्र महाराष्ट्रासाठी कोण काम करेल?" असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

3) वीजबील माफीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला - प्रकाश आंबेडकर

कोरोना काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज बिलांपैकी 50 टक्के बिल माफ करता येऊ शकते, असा प्रस्ताव महावितरणने महाराष्ट्र सरकारला सादर केला आहे. मात्र, एका मंत्र्यानं हा प्रस्ताव दाबून ठेवला आहे, असा गंभीर दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, FACEBOOK/PRAKASH AMBEDKAR

"कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, उद्योग ठप्प झाले. त्यामुळे सर्वसामान्यांना वीज बिलात माफी मिळावी, याबाबत ऊर्जामंत्रीही सकारात्मक होते. महावितरणने तसा प्रस्तावही पाठवला. पण एका बड्या मंत्र्यानं तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून दाबून ठेवला," असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

राज्य मुख्यमंत्री चालवतात की एक मंत्री चालवतो, याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असं आव्हानही प्रकाश आंबेडकरांनी दिले.

कोरोना
लाईन

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी वीज बिल न भरण्याचं आवाहन जनतेला केलं. वीज कापली गेल्यास वंचितकडून जोडून दिली जाईल, असंही ते म्हणाले.

4) मराठा स्त्रीला मुख्यमंत्री करण्याची भूमिका असल्यास समर्थन - आशिष शेलार

कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. दैनिक सकाळनं ही बातमी दिली आहे.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शरद पवार आणि आशिष शेलार उपस्थित होते. त्यावेळी पवारांसमोरच शेलार यांनी हे वक्तव्य केलं.

आशिष शेलार

फोटो स्रोत, Twitter/Aashish Shelar

"जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं," असं आशिष शेलार म्हणाले.

शेलार हे बोलत असताना शरद पवारही उपस्थित असल्यानं या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसतेय.

5) हैदराबादमध्ये निवडणुकीत पवन कल्याण करणार भाजपचा प्रचार

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण हे हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार आहेत. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुका पुढील महिन्यात आहेत. भाजपचे तेलंगणमधील नेते आणि जन सेना पक्षाचे नेते यांच्यात चर्चा झाली आणि हा निर्णय झाला. या बैठकीला स्वत: पवन कल्याण हेही हजर होते.

पवन कल्याण

फोटो स्रोत, Twitter/Bandi Sanjay Kumar

फोटो कॅप्शन, पवन कल्याण आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष

पवन कल्याण यांचा पक्षही हैदराबाद महापालिकेची निवडणूक लढणार असून, 150 पैकी 60 जागांवर जन सेनेचे उमेदवार उभे केले जणार आहेत. मतांमध्ये विभाजन व्हायला नको म्हणून भाजप-जन सेनेनं ही भूमिका घेतली आहे.

हैदराबादमध्ये भाजपचा महापौर व्हावा, अशी आशाही पवन कल्याण यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)