संजय राऊत : 'शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांचा सल्ला घेतल्यास गैर काय?'

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात गैर काय? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. शरद पवार हेच सरकार चालवतात, अशी टीका कायम होत राहते. या टीकेला संजय राऊत यांनी पुण्यात उत्तर दिले.

तसंच, "पवारांचा सल्ला घेतो याचा अर्थ ते सरकार चालवतात असा होत नाही, तसं नाही केलं तर आमच्यासारखे करंटे आम्हीच," असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चेचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी राऊत यांनी अनेक मुद्द्यांवरुन भाजपावर टीका केली.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "हे सरकार होणारच होतं. हे सरकार महिनाभरात कोसळेल यासाठी पैजा लागल्या होत्या. परंतु आज एक वर्ष पूर्ण होतंय."

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

"हे सरकार पडणार नाही. हे सरकार पडेल असं दिल्लीतील कुणी म्हणत नाहीत, राज्यातील लोकही बोलायचे थांबले. पण हे सरकार पुढील 4 वर्षे टिकेल," असं सांगतानाच राऊत पुढे म्हणाले, "मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे."

यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरील नेतृत्त्वाचीही स्तुती केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई सक्षमपणे निभावली. इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी काय केलं, हे आपल्याला माहीत आहे. उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात उत्तम नेतृत्त्व केलं म्हणून मोठी हानी टळली."

दरम्यान, संजय राऊत यांच्यानंतर पुण्यातच चंद्रकांत पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांच्या विधानांवर पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपवर टीका करणं ही संजय राऊत यांच काम आहे. त्यांची पोझिशन ही त्याच्यामुळेच आहे. परंतु त्यांच्यावर इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही."

"पवार महाराष्ट्र चालवतात हे राऊत यांनी मान्य केलं. त्यांनी पवारांचा सल्ला घ्यावा किंवा पार्थ पवार यांचा घ्यावा. आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. राज ठाकरे हे जेव्हा राज्यपालांकडे गेले तेव्हा राज्यपालांनी त्यांना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला. पवार राज्य चालवतात हे सत्य आहे, त्यावर राऊत यांनी मोहोर उमटवली," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत यांनी सरकार पाडण्याबाबतचं विधान केलं, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. "सरकार पडण्याचं आम्ही स्वप्न पाहत नाही. आम्ही समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत पुढे चाललो आहोत. पाच वर्ष सरकार चालणार असेल तर चांगलंच आहे. परंतु सरकार केवळ पाच वर्षे चालून उपयोग नाही तर ते उत्तम चालणं गरजेचं आहे." असं पाटील यावेळी म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)