कोरोना व्हायरस: नरेंद्र मोदींने केलेल्या चार दाव्यांचं फॅक्ट चेक

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Ani

    • Author, रिअलिटी चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना व्हायरसविरुद्धची भारताची लढाई ही सुरुच राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात म्हटलं.

या भाषणादरम्यान मोदी यांनी कोरोना व्हायरससंदर्भात केलेल्या चार दाव्यांची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.

दावा क्रमांक - 1

"सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना भारताने वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे ही संख्या मर्यादित राहिली."

निष्कर्ष - भारतातील संसर्गाचं प्रमाण कमी झालं, हे खरं आहे. पण लॉकडाऊनमुळेच असं झालं, हे म्हणता येणार नाही. कमी रुग्ण असताना लॉकडाऊन करणारा भारत हा एकमेव देश नाही.

भारतात सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या आलेखाने परमोच्च बिंदू गाठला होता. त्यामध्ये आता घट झाली आहे. शिवाय मृत्यूंची संख्याही घटली आहे.

लॉकडाऊनचा परिणाम किती झाला, याची माहिती मिळवणं अवघड आहे. कारण, देशांतील चाचण्यांची संख्या वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे रुग्णवाढीच्या प्रमाणात थोडी घट पाहायला मिळू शकते.

भारतात लॉकडाऊन 25 मार्च रोजी लावण्यात आलं. त्यावेळी देशात 562 रुग्ण तर 9 मृत्यू अशी आकडेवारी होती. पण सलग 68 दिवसांच्या लॉकडाऊननंतर 1 जूनपर्यंत देशात 1 लाख 90 हजार 535 जणांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, 1 जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यास सुरुवात झाली होती.

त्यानंतर रुग्णांची संख्या पाच-पट जास्त वेगाने वाढल्याचं दिसून आलं.

भारताच्या शेजारी देशांनी भारताप्रमाणेच मार्च महिन्यात किंवा आसपास लॉकडाऊन केला होता. पण भारताच्या तुलनेत त्यांच्या देशातील रुग्णांची संख्या कमी आहे.

नेपाळने 24 मार्च रोजी लॉकडाऊन केला. त्यावेळी त्यांच्या देशात फक्त 2 रुग्ण होते. श्रीलंकेने रुग्णसंख्या 78 असताना लॉकडाऊन केलं होतं.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

पेरू आणि न्यूझीलंड या देशांनीसुद्धा लवकरच लॉकडाऊन केलं. पेरूने 16 मार्चला 71 रुग्ण असताना लॉकडाऊन केलं. तिथं जूनपर्यंत लॉकडाऊन कायम होतं. लॅटीन अमेरिकन देशांमध्ये पेरूतील लॉकडाऊन सर्वाधिक काळ होतं.

न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन काळातही रुग्ण वाढताना दिसले. पण त्यांची चाचण्यांची संख्या जास्त होती.

दावा क्रमांक - 2

भारतात प्रतिदशलक्ष 83 मृत्यू असं प्रमाण आहे. इतर देशांच्या तुलनेत हे अत्यंत कमी आहे. अमेरिका, ब्राझील, ब्रिटन आणि स्पेनसारख्या देशांमध्ये प्रतिदशलक्ष 600 मृत्यू असा दर आहे.

निष्कर्ष - भारतातील मृत्यूदर हा तुलनेने कमी असल्याची गोष्ट खरी आहे. पण भारतात कोरोनामुळे झालेल्या अनेक मृत्यूंची नोंदच झाली नसल्याची शक्यता तज्ज्ञांनी नोंदवली आहे.

भारतातील कोरोना व्हायरस रुग्णांचं प्रतिदशलक्ष 83 मृत्यू हे प्रमाण आहे. अमेरिकेत इतक्याच रुग्णांमागे 665 मृत्यू, युकेमध्ये 644, ब्राझीलमध्ये 725 तर स्पेनमध्ये 727 मृत्यूंची नोंद झाली.

कोरोना
लाईन

भारतात मृत्यूदर अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. देशात तरूणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही आकडेवारी असेल, असं म्हणता येईल.

पण, भारतात कोरोना मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही, हासुद्धा एक मुद्दा आहे.

प्रत्येक देशाची कोरोना मृत्यू नोंदवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ही तुलना करणं अवघड असणार आहे.

दावा क्रमांक - 3

भारतातील रुग्णसंख्येचं प्रमाण प्रतिदशलक्ष 5 हजार 500, अमेरिका, ब्राझीलमध्ये हे प्रमाण 25 हजार.

निष्कर्ष - उपलब्ध आकडेवारीनुसार, हा दावा खरा मानता येईल. पण चाचणी योग्य प्रमाणात केल्यानंतरच रुग्णांची योग्य संख्या कळू शकते.

भारतात प्रतिदशलक्ष रुग्णांची संख्या अमेरिका, ब्राझील किंवा इतर देशांपेक्षा कमी आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

पण आपण जास्त चाचण्या केल्या तरच रुग्णांची संख्या योग्य प्रकारे कळू शकते. म्हणजे चाचण्या वाढवल्यास रुग्णसंख्या वाढूही शकते.

भारताचं चाचणी करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

भारतात 1 हजार व्यक्तींमागे फक्त 69 चाचण्या होत आहेत. पण युकेमध्ये हे प्रमाण 377 तर अमेरिकेत 407 इतकं आहे.

दावा क्रमांक - 4

भारत रॅपिड अँटीजेन टेस्ट पहिल्यांदा सुरू करणाऱ्या देशांपैकी एक.

निष्कर्ष - भारतापूर्वी अनेक देशांनी कोरोना व्हायरस चाचणीसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केल्या होत्या. पण या चाचणीच्या अचूकतेबाबत अनेक शंका आहेत.

भारताने रॅपिड अँटीजेन चाचणीला 14 जून रोजी मंजुरी दिली होती. 18 जूनपासून ही चाचणी वापरण्यास सुरु केलं.

इतर देशांनीही आधी ही चाचणी वापरली होती. सर्वप्रथम बेल्जियम देशाने कोरोनासाठी या चाचणीचा वापर केला.

पण सध्या ही बेल्जियममध्ये अँटीजेन चाचणीची पद्धत वापरली जात नाही. या चाचणीच्या अचूकतेबाबत काही मुद्द्यांमुळे याचा वापर ता केला जात नाही.

अमेरिकेत 9 मे रोजी अँटीजेन चाचणीला मंजुरी मिळाली. तर जपानमध्ये 13 मे रोजी या चाचणीला मंजुरी दिली.

भारताने बेल्जियम, बेल्जियम, तैवान आणि स्वदेशी दोन किट्सचा वापर करण्यास मंजुरी दिली होती.

पण बेल्जियममध्ये वापरली जाणारीच चाचणी बंद झाली. साऊथ कोरियानेही त्यांच्या देशात या चाचणीचा वापर बंद केला. तिथं फक्त पीसीआर चाचणी करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)