'मराठा आरक्षणानंतरच काकासाहेब शिंदेंच्या आत्म्याला शांती मिळेल'

फोटो स्रोत, FACEBOOK/KAKASAHEBSHINDE
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलनं करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला आणि राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं.
मराठा क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू ही मराठा आरक्षणाच्या लढ्यात कुणी जीव गमावण्याची पहिलीच घटना घडली.
ज्या शिंदे कुटुंबीयांनी आपला तरुण मुलगा गमावला त्या कुटुंबीयांना आता या संपूर्ण विषयावर काय वाटतं, याविषयी जाणून घ्यायचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केला..
काकासाहेब यांच्या आई मिराबाई शिंदे सांगतात की, "आमचा मुलगा काकासाहेब यांनी आई-वडिलांचा आणि स्वतःचा विचार न करता समाजासाठी आपला जीव गमावला,. मात्र आजही मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याने आम्ही दुःखी आणि असमाधानी आहोत. आरक्षण हीच काकासाहेब शिंदे यांना खरी श्रद्धांजली असेल."

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांना शहीद ही पदवी बहाल करण्यात यावी, त्याचबरोबर कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत व्हावी आणि काकासाहेब शिंदेंचें स्मारक बांधण्यात यावं, अशी मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली होती.
मात्र आज काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे हे एका शिक्षण संस्थेत नोकरीवर आहेत. काकासाहेब शिंदे यांचे कुठलेही स्मारक सरकारनं बांधलेले नसून कायगाव टोका या पुलाला मराठा संघटनांनी हुतात्मा काकासाहेब शिंदे उड्डाणपूल असं नाव दिलं आहे.

काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे सांगतात, "आज मराठा समाजातील तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. काकासाहेब शिंदे हे एक बेरोजगारीचा सामना केलेले तरूण होते. आपल्या आर्थिक विवंचनेतून समाजाला आरक्षण मिळाल्यास फायदाच होईल, अशी त्यांची नेहमीच भूमिका होती. यातूनच ते मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सक्रिय झाले आणि समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाचे बलिदानही दिले.
"काकासाहेबांसारख्या अनेक तरुणांची आरक्षणासाठीची भूमिका ही तळमळीची असून आज आरक्षण ही समाजाची गरज आहे. येणाऱ्या काळात असे काकासाहेब घडू नये, यासाठी तरी सरकारने आरक्षणासंदर्भात आपली भूमिका न्यायालयासमोर बळकट करावी. आरक्षण हीच काकासाहेब शिंदे आणि त्यांच्यासारख्या आंदोलनात जीव गमावलेल्या मराठा तरुणांसाठी श्रद्धांजली असेल."

दोन वर्षांपूर्वी कोपर्डी इथं घडलेल्या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाला मराठवाड्यातून सुरुवात झाली होती. तर पहिला मराठा क्रांती मोर्चा हा औरंगाबादेतून निघाला होता.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याच मराठवाड्यातल्या तुळजापूर इथे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा साखळी आंदोलन सुरू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर प्रकाश पडत आहे.

फोटो स्रोत, VIDEO GRAB
घटना काय?
औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी 2018साली मराठा क्रांती मोर्चा कडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होती.
यादरम्यान जिल्ह्याच्या गंगापुर तालुक्यातील तहसीलदारांना स्थानिक मराठा तरुणांनी जलसमाधी आंदोलनाचे निवेदन दिलं आणि त्यानंतर 23 जुलै 2018 रोजी औरंगाबाद नगर महामार्गावर असलेल्या कायगाव टोका या गोदावरी नदीवरील पुलावरून काकासाहेब दत्तात्रय शिंदे या 28 वर्षीय तरुणाने गोदापात्रात उडी मारली.
त्यांना वाचवण्यात प्रशासनाला अपयश आलं आणि दुर्दैवानं 28 वर्षीय काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांनी आपला जीव गमावला.

फोटो स्रोत, BBC/AMEYA PATHAK
यानंतर सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, घटनेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. ज्या ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी आपला जीव गमावला, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमाव हिंसक झाला आणि पाहता पाहता राज्यभरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या.
त्यानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या दिशेनं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजावरती आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























