'अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. 'अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल'
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सुरू होणारा सेल सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते यांनी दोन्ही कंपन्यांच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली.
"बंगळुरूस्थित दोन्ही अॅपनी दक्षिण भारतातील इतर भाषांना प्राधान्य दिलं, पण मराठीत अॅप सुरू केलं नाही. त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास त्यांनी अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय द्यावा, अन्यथा दोन्ही कंपन्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल. याप्रकरणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
2. बॉलीवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
बॉलीवूडला संपवण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

फोटो स्रोत, Twitter
राज्यात कोरोना व्हायरस साथीमुळे बंद असलेले सिनेमागृह लवकरच सुरू करण्यात येतील, असं आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चित्रपटसृष्टी निर्माण करणार असल्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबाबत ठाकरे यांनी भाष्य केलं.
"मुंबईतील बॉलीवूडमध्ये हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बनतात. या चित्रपटांचे चाहते जगभरात सर्वत्र आहेत. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे," असं ठाकरे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
3. काश्मिरींच्या हक्कांसाठी अब्दुल्ला, मुफ्ती यांच्याकडून सहा पक्षांच्या महाआघाडीची स्थापना
जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात तेथील सहा पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली आहे.
राजकारणात आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुफ्ती आणि अब्दुल्ला हे कलम 370 हटवण्याच्या विरोधात एकत्र आले असून त्यांनी सहा पक्षांच्या संयुक्त आघाडीची स्थापना केली आहे.

फोटो स्रोत, Twitter/@OmarAbdullah
'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन' असं नाव या महाआघाडीला देण्यात आलं आहे. या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, सीपीआय-एम, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट, पीपल्स कॉन्फरन्स आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नुकतीच नजरकैदेतून सुटका झाली. त्यानंतर गुरुवारी या सर्व पक्षांची बैठक झाली. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. हा निर्णय मागे घेऊन काश्मीर खोऱ्यात पूर्वीचीच स्थिती निर्माण करावी, अशी मागणी पीपल्स अलायन्सने केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. जलयुक्त शिवार योजनेत सहभागी जनतेची चौकशी करणार का? - चंद्रकांत पाटील
विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राज्यात राबवण्यात आली होती. या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
"हा निर्णय चुकीचा असून सरकार योजनेत सहभागी जनतेची चौकशी करणार का," असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Chandrakant Patil
"जलयुक्त शिवार योजनेतून चांगली कामे झाली याचा सरकारला विसर पडता कामा नये. या योजनेमुळे जमिनीतील पाण्याचा साठा वाढून त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक दुबार-तिबार घेण्याचा आनंद शेतकऱ्यांनी अनुभवला आहे," असं पाटील म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
5. कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न - पृथ्वीराज चव्हाण
गेल्या सहा वर्षांत भाजप सरकारने कृषीव्यवस्थेचं वाटोळं केलं आहे. कृषी व्यवस्था घाईगडबडीत भांडवलदार मित्रांकडे बहाल करण्याचा डाव मांडण्यात येत आहे. कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारने नवं कृषी विधेयक नुकतंच मंजूर केलं. याविरोधात आयोजित एका व्हर्चुअल सभेत चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
"गेल्या अनेक वर्षांत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताची कृषी यंत्रणा उभी केली होती. ती संपूर्ण यंत्रणा मागच्या सहा वर्षांत मोदी सरकारने मोडीत काढली. सर्व क्षेत्रात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे," असं चव्हाण म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























