संजय राऊत : 'कंगना राणावतने हाथरसवर बोलावं, तिला हाथरसचं तिकीट काढून देऊ'

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला आहे. "हाथरसमध्ये झालेल्या घटनेप्रकरणी नटीने बोलायला हवे. तिचे यावर काय मत आहे?" असा प्रश्न संजय राऊत यांनी कंगना राणावतचे नाव न घेता उपस्थित केला.
"त्या नटीने हाथरसवर बोलायला हवं, हाथरसच तिकीट काढून द्या असं मी आमच्या लोकांना सांगणार आहे, तिथं0 कसं जायचं याची सर्व छापिल माहिती या सर्व संस्था-संघटनांना पाठवणार आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कट कारस्थान आता उघडं पडलं असून ठाकरे 'ब्रँड'ला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्सकडून सादर करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टविषयी ते बोलत होते.
मुंबई पोलिसांच्या चौकशीवर एम्सनेही शिक्कामोर्तब केलं आहे. एम्स शिवसेनेचा कार्यकर्ता नाही असा खोचक टोलाही राऊतांनी मारला.
संजय राऊत म्हणाले, "मुंबई पोलीस ही एक उत्तम तपास यंत्रणा आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असताना मुंबई पोलिसांकडेही सगळी माहिती होती. पण नैतिकतेच्यादृष्टीने मृत व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबीयाची बदनामी व्हायला नको. सीबीआयकडे प्रकरण जाताच तो गांजा आणि ड्रग्ज घेत होता ही माहिती जाहीर होऊ लागली."
ठाकरे कुटुंबाचे नाव यात गोवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी स्वत:चा खड्डा खोदला आहे, असंही राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशात राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना धक्काबुक्की झाली. हीच उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बिहार निवडणुकीत शिवसेना 25-30 उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी संजय राऊत लवकरच बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे सरकारला आव्हान देणारे बिहारचे माजी पोलीस संचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार उभा करू शकते.
महाराष्ट्रात मंदिरं खुली का केली जात नाहीत यावर बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रात टप्प्याटप्याने अनलॉक सुरू आहे. हॉटेल्स सुरू केली कारण त्यावर 50 टक्के ग्राहक अशी मर्यादा आणणे शक्य आहे. मंदिरांच्या बाबतीत असे होऊ शकत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























