IPL 2020: रोहित-पोलार्ड-हार्दिकची मुक्त फटकेबाजी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

व्यासायिक संघबांधणी कशी करतात याचा उत्तम वस्तुपाठ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला.

मुंबईने 191 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. त्यांनी 143 रन्स केल्या. मुंबईने 48 रन्सच्या फरकाने विजय मिळवला.

मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल जोडीने या मॅचमध्येही 38 रन्सची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत करत मयांकला माघारी धाडलं. लेगस्टंप उघडा करून अॅक्रॉस खेळण्याचा मोह राहुलला नडला. राहुल चहरने त्याला आऊट केलं. त्याने 17 रन्स केल्या.

करुण नायरला भोपळाही फोडता आला नाही. निकोलस पूरनने ग्लेन मॅक्सवेलला हाताशी घेत चौथ्या विकेटसाठी 41 रन्सची भागीदारी केली. निकोलस धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच जेम्स पॅटिन्सनने त्याला आऊट केलं. पूरनने 27 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांसह 44 रन्सची खेळी केली. तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध ग्लेन मॅक्सवेलला राहुल चहरने फसवलं.

मॅक्सवेल आऊट झाल्यानंतर पुढच्या बॅट्समननी औपचारिकता म्हणून खेळ केला. जेमी नीशाम आणि सर्फराझ खान यांनी जराही संघर्ष केला नाही.

मुंबईतर्फे जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

धोकादायक ठरू शकणाऱ्या क्विंटन डी कॉकला शेल्डॉन कॉट्रेलला झटपट आऊट केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. चोरटी रन घेण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादवच्या अंगलट आला. तो दहा रन करून आऊट झाला.

रोहित आणि इशान किशन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 62 रन्सची भागीदारी केली. गौतमने इशानची खेळी संपुष्टात आणली. त्याने 28 रन्स केल्या. रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत 5000 रन्सचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारा तो केवळ तिसरा बॅट्समन आहे. रोहितने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं.

चौकार-षटकारांची लयलूट करत रोहितने 45 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांसह 70 रन्सची खेळी केली. पोलार्ड-हार्दिक पंड्या जोडीने 23 बॉलमध्ये नाबाद 67 रन्सची भागीदारी केली. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये मुंबईने 89 रन्स कुटल्या. पोलार्डने 20 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह 47 रन्स केल्या. हार्दिकने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 11 बॉलमध्ये 30 रन्स चोपल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)