संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे तीन अर्थ

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे.

शनिवारी (27 सप्टेंबर) मुंबईतल्या एका खासगी पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने चर्चांना सुरूवात झाली आहे.

ही चर्चा होण्याला आणखी एक कारण म्हणजे केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकावरून काँग्रेस आणि इतर विरोधकांनी भाजपला धारेवर धरले असताना भाजपचा मुख्य विरोधक असूनही शिवसेनेने विधेयकाला स्पष्ट विरोध केला नाही.

जवळपास वर्षभरानंतर शिवसेना आणि भाजपचे दोन महत्त्वाचे नेते सार्वजनिकरीत्या भेटले आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचा अर्थ काय?

संजय राऊत म्हणाले, "ही भेट गुप्त नव्हती. सामनासाठी मुलाखत घ्यायची होती. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत. ही काय भूमिगत भेट नव्हती. आम्ही बंकरमध्ये भेटलो का ?"

या भेटीला मुलाखतीचे निमित्त दिले जात असले तरी त्याचा अर्थ तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या भेटीचे नेमके काय अर्थ असू शकतात ? याचा कयास लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. "मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो हे खरे आहे. आमच्यात मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही" अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सुसंवादाला सुरूवात

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे तंतोतंत लागू होते.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीपूर्वी भाजपचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही संजय राऊत यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर 2019 रोजी लागला. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना अनुक्रमे मताधिक्य मिळाले. पण निवडणुकीत युती करून लढलेल्या शिवसेना-भाजपमध्ये सत्तावाटपावरून वाद सुरू झाले आणि अखेर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने फारकत घेतली.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

नोव्हेंबर 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. या घडामोडींना जवळपास वर्ष होत आले. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एकदाही जाहीर भेट झाली नाही.

याऊलट गेल्या 9 महिन्यांपासून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

'आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन लढलो नसतो तर जास्त जागा मिळवल्या असत्या' असे विधान नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तर आम्ही कधीच संभ्रमात नव्हतो. NDA मध्ये होतो तेव्हाही स्पष्ट भूमिका मांडायचो, अशा अनेक तिखट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यापूर्वी दिल्या आहेत.

गेल्या काही काळात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले.

भाजप-शिवसेनेत प्रचंड कटूता आहे असे चित्र निर्माण झाले असताना संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांत आजही सुसंवाद आहे असा संदेश सर्वत्र देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत कोणतीही माहिती किंवा कोणताही संदेश पोहचवण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस पार पाडत असतात. संजय राऊत हीच भूमिका शिवसेनेत बजावतात. म्हणूनच या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची आहे.

'चेकमेट - हाऊ दी बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितले, "महाराष्ट्राचे राजकारणाचे अनेक पैलू आहेत. इथे 2+2 कधीच 4 होत नसतात. या भेटीचे कारण वेगळे दिले जात असले तरी त्या निमित्ताने दोन्ही पक्षांत चर्चेला सुरुवात झाली हे अधोरेखीत होते. कालपर्यंत एकमेकांवर जाहीरपणे जहरी टीका करणारे दोन नेते एवढा वेळ चर्चा करतात हे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे आहे."

"दोघांमध्ये झालेली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचते. त्यातूनच काही गोष्टी साध्य केल्या जातात. पण तातडीने राज्याच्या राजकारणात काही मोठं होईल असे नाही. तशी काही राजकीय रणनीती असल्यास बराच काळ जाऊ द्यावा लागेल." असंही सुधीर सुर्यवंशी म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रात भाजपचे सरकार आहे. कोणत्याही सत्ताधारी पक्षाला राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी केंद्रासोबत योग्य समन्वय साधणे आवश्यक असते.

महाराष्ट्रात सध्या कोरोना आरोग्य संकट, ड्रग्जप्रकरणी सुरू असलेली चौकशी, मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती, कोलमडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे सांगतात, "राज्य सरकारसमोर मोठी आव्हानं असताना तुम्हाला विरोधकांशीही जुळवून घ्यावे लागते. केंद्रात कुणाचेही सरकार असो तिथे तुमचे चांगले संबंध असले तर बरेच प्रश्न सहज सुटतात."

शिवसेना आणि भाजपचे दबावतंत्र?

कृषी विधेयकावरून सध्या भाजप बॅकफूटवर गेली आहे. काँग्रेस प्रचंड टीका करत असताना महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी भाजप नेत्यांवर आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा झाली. तसेच भाजपचे काही आमदार फुटणार असल्याच्याही बातम्या येत होत्या.

शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या या भेटीमुळे अशा अनेक हालचालींना ब्रेक लागला आहे.

सुधीर सुर्यवंशी असे सांगतात, "भाजप पक्षांतर्गत एक चित्र निर्माण करू पाहत आहे. भाजप आणि शिवसेनेचा संवाद सुरू झाला हा संदेश बाहेर दिला की अस्वस्थ असलेले आमदार पुन्हा बॅकफूटवर येतात."

तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधी भाजपला मदत करत असल्याचे चित्र निर्माण केले जाते तर कधी विरोध करणारे. कृषी विधेयक राज्यसभेत आले तेव्हा शरद पवार अनुपस्थित राहिले होते. पण विरोधक खासदारांना निलंबित केल्यानंतर शरद पवार यांनी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार

फोटो स्रोत, PTI

सुशांत सिंह प्रकरणावरून आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याकडून शिवसेनेवर घणाघाती टीका केली जात होती. "महाराष्ट्रात शिवसेनेची प्रतिमा डागाळत असेल तर त्याचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे." असं शुभांगी खापरे सांगतात.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी प्रत्यक्षात कारभार शरद पवार पाहतात अशी टीका सातत्याने झाली. "राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व महाराष्ट्रात वाढले तर शिवसेना आणि भाजप दोघांनाही धोक्याचे ठरू शकते. शिवसेना आणि भाजपने भेटीगाठींना सुरुवात केल्याने दबावतंत्र वापरता येते." असंही शुभांगी खापरे म्हणाल्या.

'माझे फोन मातोश्रीवर घेतले जात नाहीत.' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

"आजही फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद बंद आहे. त्यासाठी शिवसेनेकडून एक वातावरण निर्मिती केली जात आहे. कुठेतरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी पुन्हा संवाद सुरू करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो."

शिवसेनेच्या मुलाखतींमधून नेमके काय साध्य होते ?

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी दोन्ही नेते भेटल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

"ही मुलाखत घेण्याबाबत माझ्या काही अटी होत्या. यासाठी मी संजय राऊत यांना भेटलो. ही मुलाखत अनएडिटेड असावी असे मला वाटते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही." असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत अशी राजकीय मुलाखत घेत आहेत. तर गेल्या महिन्यांमध्ये त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.

विशेष म्हणजे अद्याप संजय राऊत यांनी सहकारी पक्ष काँग्रेसच्या एकाही नेत्याची मुलाखत घेतलेली नाही.

कोरोना संकट काळात एका बाजूला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे.

कधी हॉस्पिटलचा पंचनामा तर कधी मृतदेहांच्या हाताळणीवरून आरोप अशा एक ना अनेक मुद्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत होते.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK

या परिस्थितीत शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. या संपूर्ण मुलाखतीत त्यांनी कोरोना काळातले अनुभव, जनतेचा त्यांच्यावर कसा विश्वास आहे, मुख्यमंत्री म्हणून आरोग्य संकटात सरकारने कसे काम केले, जनतेशी संपर्क कसा साधला अशा प्रश्नांची उत्तरे दिली.

केवळ सामनाला ही मुलाखत दिल्याने यावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते.

यानंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असलेले शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका केली जात होती.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही अशा मुलाखती सामनामध्ये येत होत्या. एकप्रकारे राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे आणि मित्र पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाखतींमधून केला जात असे.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, " अशा मुलाखतींमुळे शिवसेना प्रसिद्धीझोतात राहते. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील माध्यमही दखल घेतात. यामुळे अनेक गोष्टी साध्य होत असतात."

2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतरही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला जात होता. सामनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारवरही अनेकदा तीव्र टीका करण्यात आली आहे.

"वैयक्तिक संबंधांमध्ये जी कटूता निर्माण झाली ती दूर करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो." असंही हेमंत देसाई म्हणाले.

ही मुलाखत देवेंद्र फडणवीस यांच्या अटीवर घेतली जाणार असल्यानेही याला महत्त्व आहे. भाजपलाही त्यांची भूमिका आणि मुद्दे स्पष्ट करण्याची संधी या माध्यमातून मिळेल. या मुलाखतीत बिहार निवडणूक, सत्तास्थापना, युती, अयोध्या राम मंदिर, सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)