फारूख अब्दुल्लाः काश्मिरी लोक स्वतःला भारतीय मानत नाहीत, त्यांना चीनची राजवट हवीय #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, AFP
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. काश्मिरी लोक स्वतःला भारतीय मानत नाहीत, त्यांना चीनची राजवट हवीय - फारूख अब्दुल्ला
काश्मीरचे नागरिक स्वतःला भारतीय मानत नाहीत. स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही, त्यांना चीनची राजवट हवी आहे, असं वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कलम 370 पुन्हा लागू करावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

फोटो स्रोत, PTI
"काश्मीरमध्ये कुणी स्वतःला भारतीय म्हणून घेणारा व्यक्ती भेटला तर मला आश्चर्य वाटेल. ते स्वतःला पाकिस्तानीही म्हणणार नाहीत.
कलम 370 हटवलं हा त्यांच्यावरचा शेवटचा आघात होता. आता त्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. विभाजनावेळी त्यांनी गांधींचा भारत निवडला होता. आता त्यांना मोदींच्या भारतात राहावं लागत आहे.
"चीन दुसऱ्या बाजूने आत येत आहे. चीनने मुस्लिमांसोबत काय केलं हे त्यांना माहिती आहे. पण तरी त्यांना चीन भारतात यावा, असं वाटतं," असं अब्दुल्ला म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
2. आधी हात जोडत होतो, आता दिल्ली हादरवू - हरसिमरत कौर
कृषी विधेयकावरून राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पंजाबमधील अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
"आधी आम्ही हात जोडत होतो, आता दिल्ली हादरवू." अशा शब्दांत हरसिमरत कौर यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

फोटो स्रोत, NARINDER NANU
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांमध्ये कृषी विधेयकाविरोधात नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर दमदमा साहिब येथे हरसिमरत कौर बादल यांची सभा झाली. शेतकऱ्यांच्या लढ्यात अकाली दल त्यांच्यासोबत आहे, असं त्या म्हणाल्या. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
दरम्यान, कृषि विधेयकाच्या विरोधात 25 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे. याच दिवशी दीपिका पादुकोन हिला ड्रग्ससेवनप्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
सरकारविरोधी रोष दाबण्यासाठीच नार्कोटिक्स कंट्रोल विभागाने दिपिकाला या दिवशी चौकशीला बोलावलं अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत टीव्ही 9 मराठीने बातमी दिली आहे.
3. ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ - रावसाहेब दानवे
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणं, हे राज्य सरकारचं अपयश आहे. उद्धव ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ आली, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडू सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली, त्यावेळी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भक्कमपणे बाजू मांडण्याची गरज होती.
योग्यप्रकारे बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
4. 'गरिबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच मोदींचं शासन'
कृषी विधेयकावरून देशभरात गदारोळ सुरू असतानाच आता कामगार सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे.

फोटो स्रोत, REUTERS/ALTAF HUSSAIN
कामगार सुधारणाविषयक तीन प्रमुख विधेयक संसदेने मंजूर केले. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होती. तसंच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवागनीशिवाय नोकरीवरून काढता येणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
"शेतकऱ्यांनंतर आता मजुरांवर हल्ला, गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच मोदींचं शासन," अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ही बातमी लोकमतने दिली आहे.
5. महिलांची छेड काढणाऱ्यांचे चौकाचौकात पोस्टर्स
उत्तर प्रदेशात महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महिलांची छेड काढण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आल्यास शहरात त्यांचे फोटो लावावेत, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत.
योगी सरकारने यापूर्वीची अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. मार्च महिन्यात राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून आंदोलन सुरू असताना काही ठिकाणी हे आंदोलन हिंसक झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी सरकारी संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांचे फोटो चौकात लावा, असा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला होता.
आता मिशन दुराचारी मोहिमेअंतर्गत महिलांची छेड काढणाऱ्यांचे फोटो चौकात लावण्यात येतील. महिला पोलीस अधिकारी शहरात गस्त घालत छेड काढणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























