देवेंद्र फडणवीस : युती केली हेच चुकलं, नाहीतर 150 जागा जिंकल्या असत्या #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. युती केली हेच चुकलं, नाहीतर 150 जागा जिंकल्या असत्या - फडणवीस

गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक शिवसेनेसोबत युती केली हेच चुकलं, नाहीतर भारतीय जनता पक्षाने 150 पेक्षाही जास्त जागा जिंकल्या असत्या, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे यामध्ये प्रमुख वक्ते होते. त्यांनी केलेल्या राजकीय भाकितांचा आधार घेऊन फडणवीस यांनी वरील वक्तव्य केलं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis

"भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 272 जागा मिळतील, 2019 मध्ये 300 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असं भाकित भाऊ तोरसेकरांनी व्यक्त केलं होता. ते खरं ठरलं.

"त्याचप्रमाणे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास 150 पेक्षा जास्त किंवा युती करून लढल्यास 200 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असा अंदाज भाऊ तोरसेकर यांनी वर्तवला होता. त्यामध्ये आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर आपण राज्यात दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली," असं फडणवीस म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. ठाकरे, पवार नव्हे तर जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड - उदयनराजे भोसले

"ठाकरे किंवा पवार यांच्यापैकी कुणीही महाराष्ट्राचा ब्रँड नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला केंद्रबिंदू समजूनच स्वराज्य उभारलं होतं.

त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हीच महाराष्ट्राचा ब्रँड आहे," असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, Twitter/Chhatrapati Udayanraje Bhonsle

ठाकरे आणि पवार हेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहेत, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये मांडलं होतं. यावरून वाद निर्माण होऊन विविध राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या वादात उदयनराजे यांनी उडी घेतली आहे.

"स्वराज्य उभारताना शिवाजी महाराजांनी ब्रँड वगैरे गोष्टी बोलल्या असत्या तर हे स्वराज्य उभं राहिलं असतं का? रयतेचा राजा बनूनच शिवाजी महाराजांनी राज्य केलं," असं उदयनराजे म्हणाले.

3. शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला - राहुल गांधी

आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली आहेत.

राहुल गांधी

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून राजकीय घमासान सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर पुन्हा एकदा ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. याबाबतची बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. कारण सुरूवातीपासून मोदीजींच्या बोलण्यात आणि कृतीत फरक राहिला आहे.

नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेलवरती प्रचंड कर. सजग शेतकऱ्याला माहिती आहे की, कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्यांच्या रोजी-रोटीवर हल्ला करणार आहे," अशा शब्दात गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

4. पुण्यात जनता कर्फ्यू लावता येईल, पण उद्योगधंद्यांवर परिणाम झालेलं चालणार नाही - अजित पवार

"पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसंच ग्रामीण भागात जनता कर्फ्यू लावायचा असेल, तर संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा, त्याला माझी सहमती असेल. पण या जनता कर्फ्यूचा उद्योगधंद्यावर परिणाम झालेला मला चालणार नाही," अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मुंबईत गुरुवारी कलम 144 लागू करण्यात आलं. त्यामुले पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter/Ajit Pawar

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

नागरिकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायचा असेल तर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय घ्या. माझी त्याला सहमती असेल, असं पवार म्हणाले. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

5. मी भांडण सुरू करत नाही, तर संपवते - कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावत सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या एकामागून एक ट्वीट्सची मालिका सुरूच आहे.

मात्र आपण कधीही वाद सुरू करत नाही, तर तो वाद मी संपवते, असं वक्तव्य कंगना राणावतने केलं आहे.

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

"मला भांडखोर मुलगी समजलं जातं, पण ते खरे नाही. मी आतापर्यंत स्वत: कधीही भांडण सुरु केलेले नाही. जर तसं कुणी सिद्ध केले तर मी ट्विटर वापरणं बंद करेन. मी भांडण सुरु करत नाही, तर नेहमी ते संपवण्याचा प्रयत्न करत असते.

जर कुणी तुम्हाला लढण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्यांना नाही म्हणू नका, असं कृष्णानेच सांगितले आहे," असं कंगना राणावतने म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)