देवेंद्र फडणवीस: 'ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं' #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण सरकारसोबत असून सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबाच राहील, मराठा समाजासाठी मी काय केलं हे लोकांना माहिती आहे, पण माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी काहीही मारलं चालतं, असं काहींना वाटतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सह्याद्री अतिथीगृहावरील मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis

एखाद्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करा, असं करण्याची पद्धत आपल्याकडे आहे.

मी असं बोलू नये, पण ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी काहीही मारलं तर चालतं असं काहींना वाटतं, पण मराठा समाजासाठी मी काय केलं, हे त्यांना माहिती आहे.

माझ्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम यशस्वी होणार नाही, असं फडणवीस म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.

2. सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावला आहे - संजय राऊत

केंद्र सरकारने सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारनं बाजारात विक्रीसाठी खूप काही उपलब्ध केलं आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत ते बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

"देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. देशाचा जीडीपी घसरला आहे. आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी वगैले कंपन्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे.

आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे," अशी टीका राऊत यांनी केली.

3. एसटी आता पूर्ण क्षमतेने धावणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इतके दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळून एसटी चालवण्यात येत होती. पण गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे आता महाराष्ट्रातील एसटीसुद्धा पूर्ण क्षमतेने धावणार असून राज्य सरकारने त्याला परवानगी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने बातमी दिली आहे.

पण यासाठी निर्जंतुकीकरण, मास्क वापरणे अशा नियमांचं पालन बंधनकारक असणार आहे.

एसटी
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर 20 ऑगस्टपासून राज्यात एसटी सेवा पुन्हा सुरू झाली होती. पण त्यावेळी फक्त 50 टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र आता 18 सप्टेंबरपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

4. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही - बच्चू कडू

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत अनेकांवर आरोप करताना दिसत आहे. कंगनाच्या भूमिकेवर सोशल मीडियावर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनीही कंगना राणावतवर निशाणा साधला आहे.

बच्चू कडू

फोटो स्रोत, Twitter/Bacchu Kadu

कंगना राणावतमुळे राज्यातील सरकार अस्थित होण्याची गरज नाही. मीडियानेही कंगनाला जास्त महत्त्व देऊ नये, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी ती निवडून येणार नाही, इतकंच नव्हे तर तिचं डिपॉझिटही जप्त होईल, अशा शब्दांत कडू यांनी कंगनाची खिल्ली उडवली. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

5. बॉलीवूडने नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीने मला वाळीत टाकले होते - विक्रम गोखले

बॉलीवूडच्या घराणेशाहीचा आपल्याला कधी त्रास झाला नाही, पण सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीनेच मला वाळीत टाकले होते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. दैनिक लोकमतने याबाबत बातमी दिली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत मला कुणीच कधी घाटी म्हणून संबोधलं नाही. किंवा मराठी म्हणून गैरवागणूक दिली नाही. मी हिंदीत तडजोड म्हणूनही कामं केली नाहीत. काम नाही मिळालं तर घरी राहीन, असा माझा विचार होता.

विक्रम गोखले

फोटो स्रोत, Facebook/Vikram Gokhle

यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीने मला वाळीत टाकलं होतं. मी पंधरा वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर होतो, असं गोखले म्हणाले.

माझ्या काही स्वतःच्या अटी होत्या. त्यावर मी निर्मात्यांची सही घेत होतो. पण निर्माते नंतर कळवतो असं सांगून निघून जात होते, बाहेर जाऊन माझ्याविषयी उलटसुलट चर्चा रंगवल्या जात होत्या, असा आरोप विक्रम गोखले यांनी केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)