काँग्रेसचे 11 आमदार नाराज, ठाकरे सरकार निधी देत नसल्याचा आरोप #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) ठाकरे सरकारवर काँग्रेसचे 11 आमदार नाराज
महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं आणखी एक उदाहरण आता समोर येत आहे. समन्वयाचा अभाव असल्याची टीका सातत्याने होत असताना आता काँग्रेस आमदारांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
नगर विकास खात्याकडून निधी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे 11 आमदार नाराज असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook
ते म्हणाले, "नगर विकास खात्याकडे वारंवार निधीसाठी मागणी करूनही निधी दिला जात नाही. मी आमदार असून मला एक रुपयाही निधी दिला गेला नाही. मात्र, आम्ही ज्यांना निवडणुकीत पाडलं त्या विरोधकांना निधी मिळतोय. जालना नगरपालिकेचे काम नगर विकास खात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे."
या सर्व प्रकाराचा निषेध करत काँग्रेसचे 11 आमदार वेळप्रसंगी उपोषणाला बसतील, असा इशाराही गोरंट्याल यांनी दिला आहे. नगरविकास खाते शिवसेनेकडे असून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री आहेत.
2) रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही - रामदास आठवले
महाराष्ट्राच्या राजकारणात आता रिपब्लिकन पक्षाला उज्ज्वल भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रिपब्लिक ऐक्य हा विषय मागे पडत चालला असून कार्यकर्ते इतर पक्षात जाऊ लागले आहेत, अशी कबुलीही त्यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रिपब्लिकन पक्षाला आता एकाकी लढता येणार नसून मोठ्या पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागेल, अशी मांडणी आठवले यांनी केलीय. पक्षात गटबाजी वाढल्याने पक्षाला भवितव्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत पराभाव झाल्यावर नेत्यांनी एकत्र यावे असा जनतेतून दबाव यायचा. आता तसा दबाव नसतो. याउलट कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात. रिपब्लिकन ऐक्य हा विषय मागे पडत चालला असला तरी माझी ऐक्यासाठी तयारी असते. पण प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्याला अर्थ प्राप्त होत नाही, असं म्हणत आठवलेंनी ऐक्याची तयारी दाखवली आहे.
3) पार्थविषयी मी बोलणार नाही, त्याविषयी बोलून काय फायदा? - अजित पवार
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या वक्तव्यांवरुन चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पुण्यात असताना त्यांनी पार्थ पवार यांच्यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण पार्थ विषयी मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा ? असा प्रतिप्रश्न करत अजित पवार निघून गेले. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
अयोध्या राम मंदिर विषयी त्यांनी पत्र काढलं होतं. तर देशभरात सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, पवार कुटुंबात दोन दिवस बैठकांचे सत्रही पहायला मिळाले. पार्थ पवार घेत असलेल्या भूमिकांना अजित पवारांचा पाठिंबा आहे का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
4)CBI लवकरच रिया चक्रवर्तीची चौकशी करणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आता सीबीआयने मुंबईत चौकशी सत्र सुरू केले आहे. रविवारी सीबीआयने पुन्हा एकदा सुशांतच्या घरी जाऊन तपास केला.
आता याप्रकरणी लवकरच रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिलीय.

सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या घरी जाऊन तीन जणांची चौकशी केल्याचे समजते. यात सुशांतचा कूक नीरज, हाऊस मॅनेजर दीपेश सावंत आणि त्याचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचा समावेश आहे. सीबीआय 13 आणि 14 जूनला नेमकं सुशांतच्या घरात काय घडलं याची माहिती घेत आहे.
5) दिल्लीत मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा
दिल्लीची लाईफलाईन समजली जाणारी मेट्रो सेवा लॉकडॉऊन लागू झाल्यापासून बंद आहे. पण आता मेट्रो सुरू करण्याची तयारी असल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा असल्याचंही DMRC कडून सांगण्यात आलं आहे. फर्स्ट पोस्टनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
टप्प्याटप्याने मेट्रो सुरू करण्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं सांगत त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर मेट्रो सुरू करायला हवी असं मत मांडलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























