कोरोना : गणपतींकरता चाकरमान्यांसाठी कोकणात जायला ट्रेन्स?- #5मोठ्याबातम्या
गेल्या 24 तासात देशातील वृत्तपत्र आणि न्यूज वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत 5 मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, ANI
1. कोकणात जायला ट्रेन सुटणार?
गणपतीसाठी कोकणात जायला चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरू केल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिली आहे.
या बातमीनुसार, राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या मागणीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राला रेल्वेकडून होकार मिळाला असून येत्या दोन दिवसांत विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
या गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तुमचं रेल्वेचं तिकीट हेच ई-पास मानलं जाईल. तसंच कोरोना काळात अपेक्षित सर्व स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आधीच सुमारे तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात 22 प्रवाशांना ग्रुप बुकिंगचा पर्यायही ठेवण्यात आला आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी आधीच कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. वाचा संपूर्ण बातमी इथे
2. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास क्वारंटाईन'
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करायले मुंबईत आलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना एअरपोर्टवरूनच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरूनही मोठा वाद निर्माण झाला.
आता या वादात प्रथमच बोलताना तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "महाराष्ट्र सरकारने मला नव्हे तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपासच क्वारंटाइन केला आहे," असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणाच्या तपासावर महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे विपरीत परिणाम झाला, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईनमधून सोडल्यानंतर ते शुक्रवारी पाटण्याला परतले, त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
3. राहुल गांधींचा अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला
कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. देशात 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख रुग्णसंख्या ओलांडली जाईल, असा अंदाज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला होता. तो अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला आहे.
शुक्रवारी अर्थात 7 ऑगस्ट रोजीच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दोन दशलक्षच्या पार गेला आहे. तेव्हा राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटलं, "20 लाख का आँकड़ा पार, ग़ायब है मोदी सरकार।"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
17 जुलैला ट्वीट गांधींनी केलं होतं की या गतीने कोरोनाचा प्रसार होत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील. सरकारने हे संकट रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
4. शेतीमालासाठी विशेष 'किसान रेल' सुरू
देशातली पहिली किसान रेल्वे देवळाली कॅम्पवरून बिहारच्या दानापूरला शुक्रवारी रवाना झाली. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हीडिओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखवला.
2020-21च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी या विशेष किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल.
नाशिकजवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. या दोन स्टेशनमधलं 1, 519 किमीचं अंतर 32 तासांमध्ये पूर्ण केलं जाईल. NDTVने ही बातमी दिली आहे.
5. अविनाश जाधव यांना जामीन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे, अशी बातमी TV9 मराठीने दिली आहे.
वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरमी त्यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने त्यांना 31 जुलै रोजी अटक केली होती.
नंतर ठाणे दिवाणी न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सात दिवसांनंतर जामीन मंजूर केला आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
जाधवांना पुढच्या दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Alamy
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























