शरद पवार: 'उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, देवेंद्र फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष द्यावं' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, देवेंद्र फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष द्यावं - शरद पवार
"कोरोना संकटाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय उत्तम काम करत आहेत. पण विरोधी पक्षनेते त्यांच्या विषयी राजकारण करत आहेत. फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष घालून कोरोना दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार विविध शहरांना भेटी देत आहेत. या दरम्यान नाशिक दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
"या दौऱ्यावर येण्याची उद्धव ठाकरे यांचीही इच्छा होती, पण ते येऊ शकले नाहीत. ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आम्ही आमचं निरीक्षण त्यांना कळवणार आहोत," असं पवार म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या, त्यांच्यावरील उपचार पद्धती, मृत्यूंचे आकडे, चाचण्या वाढवणे या मुद्द्यांवर अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
"कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या काळात देवेंद्र फडणवीस राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या कालावधीत राजकारण करण्यापेक्षा कोरोनावरच्या कामावर लक्ष द्यावं, सहकार्याच्या भावनेने काम करावं," अशी टीका पवार यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. ...आधी 60 वर्षांपुढील राजकारण्यांनी राजीनामे द्यावे - विक्रम गोखले
कोरोना व्हायरस लॉकडाऊनदरम्यान चार महिने घालवल्यानंतर विविध क्षेत्रांतील कामांना आता हळूहळू शिथीलता देण्यात आहे. पण यात काही अटी व शर्थींचे पालन नागरिकांना करावं लागणार आहे.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांचं चित्रीकरण सुरू करण्याबाबतही काही अटी घालून राज्य सरकारने अनलॉकची परवानगी दिली होती. पण यातील अटींबाबत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही विरोध केला आहे. 65 वर्षांपुढील कलाकार काळजी घेऊन काम करतील, सरकारने त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गोखले यांनी केली आहे.
राज्य सरकार याबाबत कायदा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ते चुकीचं आहे. अशा प्रकारचा कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकारांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे असा कोणताही कायदा आणण्याआधी 60 वर्षांवरील राजकारणी नेत्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा, असं मतही गोखले यांनी नोंदवलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
3. यंदा वर्गणी नाही, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचा निर्णय
कोरोना व्हायरसचा फटका देशातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बसलेला आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी इतर सणांप्रमाणेच गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय यापूर्वीच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
यानुसार, गणेशोत्सव साधेपणाने करत असताना कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी घेण्यात येणार नाही, असा निर्णयही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.
लोकांकडून वर्गणी गोळा करण्यापेक्षा कोरोना साथीबाबत जनजागृती, हातावर पोट असलेल्या लोकांना मदत, आरोग्य शिबिरं, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, असं मंडळांनी कळवलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.
4. नैतिकता, सहानुभूती संपली का? - रतन टाटा
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा आर्थिक बसल्याचं कारण देत विविध कंपन्यांमध्ये नोकरकपात करण्यात येत आहे. अशा प्रकारे संकटकाळात नोकरकपात करणाऱ्या कंपन्यांवर उद्योजक रतन टाटा यांनी जोरदार टीका केली आहे. कंपन्यांची नैतिकता आणि सहानुभूती संपली का, असा सवाल रतन टाटा यांनी कंपन्यांना विचारला आहे.
Your Story या न्यूज वेबसाईटने लीडरशीप टॉक उपक्रमाअंतर्गत घेतलेल्या मुलाखतीत रतन टाटा बोलत होते.

फोटो स्रोत, Twitter / RNTata2000
लोकांना नोकरीवरून कमी करण्यात येत आहे. त्यांनी आपलं करिअर कंपनीसाठी दिलं होतं. अशा लोकांना संकटकाळात पाठिंबा देणं गरजेचं होतं. अशा स्थितीत तुम्ही त्यांना बेरोजगार करत आहात, तुमच्या संवेदना संपल्या आहेत का, असा प्रश्न रतन टाटा यांनी नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांना विचारला.
5. दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठीच्या नियमांमध्ये परिवहन मंत्रालयाकडून बदल
रस्ते सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन दुचाकी गाडीवर मागच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. देशाच्या रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या नियमावलीनुसार, दुचाकी चालकाच्या सीटमागे दोन्ही बाजूंना हँड होल्ड असावेत. जेणेकरून, मागे बसणारा व्यक्ती ते पकडून बसू शकतो तसंच मागे बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंना फूट रेस्ट देण्यात यावं.
मागे बसणाऱ्यांचे कपडे मागच्या चाकात अडकू नयेत, यासाठी मागील चाकाच्या डाव्या बाजूला गार्ड लावण्यात यावा. गाडीला डिक्की लावताना त्याचा आकार मर्यादित असावा, असं नियमावलीत म्हटलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























