कोरोना व्हायरस: परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना, 600 जणांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Ani
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना, 600 जणांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही, याबाबत वादविवाद सुरू आहेत.
दरम्यान, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्यामुळे 600 विद्यार्थ्यांच्या पालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, केरळच्या वलियाथुरामध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य(आर्किटेक्चर) आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला उपस्थित एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल बुधवारी(22 जुलै) पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी मंगळवारी (21 जुलै)सुद्धा दोन विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यामुळे केरळ पोलिसांनी थेट परीक्षेला बसलेल्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधातच गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
2. शरद पवारांना जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रं पाठवणार - भाजयुमो
अयोध्येत राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं, अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच केलं होतं.
पवार यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद शमण्याचं नावच घेत नाही. भारतीय जनता पक्षाने तर शरद पवार यांच्या वक्तव्याविरोधात मोठं अभियान सुरू केलं असून या अंतर्गत पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड जय श्रीराम लिहून पाठवावीत, असं आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे.
या अभियानाची सुरूवात करताना पाटील यांनी पनवेलच्या पोस्ट ऑफिसमधून शरद पवार यांच्या पत्त्यावर एक पत्रंही पाठवलं. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
3. चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत असल्याचं भासवून खंडणीची मागणी, गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसंच पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत असल्याचं भासवून पिंपरीतील एका रुग्णालयाला खंडणी मागितल्याला प्रकार ताजा असतानाच पुण्यातही अशाच प्रकारे एकाला पैसे मागण्यात आल्याचे समोर आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आपल्या नावाचा आणि लोकसेवक पदाचा वापर करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाटील यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका तलाठ्याला पाटील यांचे पीए सावंत बोलत असल्याचं भासवत फोन करण्यात आला. यावेळी त्या व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांना फोन देत असल्याचं सांगितलं. दुसऱ्या एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील असल्याचं भासवत त्या तलाठ्याकडे पैशांची मागणी केली.
निगडीतील डॉक्टरांकडेही अशाच प्रकारे पाटील यांचा फोन असल्याचं भासवत 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. संबंधित तलाठी पाटील यांचे कोथरूडमधील कार्यकर्ते डॉ. संदीप बुटाला यांच्या ओळखीचे असल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पाटील यांनी तक्रार दाखल केली. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. ...तर लॉकडाऊन नव्हे कडक संचारबंदी लावण्यात येईल, तुकाराम मुंढेंचा इशारा
नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. आजार लपवतात. त्यामुळे नागपुरात मृत्यूदर वाढत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वेळ आल्यास लॉकडाऊनच नव्हे तर कडक संचारबंदी नागपूरमध्ये लावण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, facebook
नागरिक सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळत नाहीत. आपल्या आजारपणाविषयी माहिती लपवून ठेवतात. यामुळेच मृत्यूदर वाढला आहे. मृत्यूदर कमी करायचा असेल तर आजारी व्यक्तींनी डॉक्टरकडून उपचार करून घेणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन थिथील होत असताना नागरिकांनी काही नियमही पाळावयाचे आहेत. पण तसं होत नसेल तर वेळ आल्यास नागपुरात पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात येईल. ही संचारबंदीच असेल लॉकडाऊन लावण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी लोकांना कळवलं जाईल. 15 दिवसांचं हे लॉकडाऊन असू शकतं, असं मुंढे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, सर्वाधिक वाढ पुण्यात
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी(22 जुलै) राज्यात 10 हजार 576 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. शिवाय पहिल्यांदाच राज्यात पाच आकडी रुग्णसंख्या आढळून आली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 37 हजार 607 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 12 हजार 556 जणांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी असून आतापर्यंत 1 लाख 87 हजार 769 रुग्ण कोव्हिडमधून बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 36 हजार 980 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























