कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
राज्य सरकारने महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 29 जूनला एका आदेशाद्वारे हे जाहीर केलं.
त्याचबरोबर मुंबई आणि उपनगर परिसरातही काही ठिकाणी पूर्वीसारखाच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
"ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोव्हिड हॉटस्पॉट ठरवून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहे." अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
2 जुलै ते 12 जुलै ठाण्यात संपूर्ण लॉकडाऊन पाळले जाईल असं ठाणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटी 10 लाखांहून अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या 34 हजारांहून अधिक आहे. तर सर्वाधिक रुग्ण कल्याण-डोंबिवलीमध्ये वाढत आहेत.
दररोज 300 ते 400 रुग्ण कल्याण-डोंबिवली शहरात वाढत आहेत. तर ठाणे शहर, कळवा,मुंब्रा,नवी मुंबई या भागातही कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरत आहे.
मुंबईच्या तुलनेत ठाण्याकडे दुर्लक्ष ?
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे आर्थिक राजधानी मुंबईत आहेत. त्यामुळे सरकारकडून सुरुवातीपासूनच मुंबईतल्या उपाययोजनांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले. पण आता ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे.
ठाण्यातील बाळकूम, कोळशेत, मानपाडा, नौपाडा, ढोकाळी असे अनेक भाग कंटेनमेंट झोन बनत चालले आहेत. तर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये एकूण 34 ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. तर अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पत्रकार कपिल राऊत सांगतात, "मुंब्रा, कळवा, दिवा या भागात झोपडपट्टीचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाहीय. तसंच सार्वजनिक शौचालय, छोट्या घरात कुटुंब सदस्य अधिक असल्याने रहिवासी सतत घराबाहेर पडतात. या परिसरात प्रशासनाकडून अपेक्षित असलेले कम्युनिटी ट्रेसिंग होत नाहीय."
मुंबई शहराच्या तुलनेत ठाण्याची लोकसंख्या कमी असली तरी मूळ शहरापासून बाकी सर्व ठिकाणं लांब आहेत. त्यामुळे हॉस्पिटल्स, कोव्हिड टेस्ट, क्वारंटाईन सुविधा या अपुऱ्या आहेत.
"माझ्या नातेवाईकांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डोंबिवलीत बेड उपलब्ध होत नव्हता. त्यासाठी अनेकांना संपर्क करावा लागला. शेवटी बदलापूरला बेड उपलब्ध झाला." असं रुपाली पेठकर सांगतात.
मुंबईला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा फैलाव?
कल्याण आणि डोंबिवलीमध्ये दर 24 तासांत केरोना व्हायरसचे 300 ते 400 नवीन रुग्ण आढळतायत. ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा फैलाव सर्वाधिक वेगाने कल्याण,डोंबिवलीत होतोय.
कल्याण,डोंबिवलीतून मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईत कामाला जातात. सध्या अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वे सुरू करण्यापूर्वी डेंबिवली,कल्याणमधून बसने प्रवास केला जात होता. बसची संख्या आणि बस स्थानकं मोजकी असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.

फोटो स्रोत, Twitter
आता रेल्वे सेवा सुरू केली असली तरी बस, रेल्वे,खासगी वाहने असे विभाजन न झाल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते का? याबाबत शंका आहे. कल्याण-डोंबिवली शहर कव्हर करणारे पत्रकार अनिकेत सांगतात, "डोंबिवलीहून मुंबईला दररोज प्रवास करणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे इकडे संसर्ग वाढत असल्याची शंका सगळ्यांनाच आहे. आता रुग्णसंख्या वाढल्यावर कल्याण,डोंबिवलीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. पण जेव्हा गर्दी होत होती तेव्हा प्रशासनाकडूनही दुर्लक्ष झाले."
जून महिन्यातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी मुंबईला जाणाऱ्या लोकांनी तिकडेच रहावे असे पत्रक काढले. पण टीका झाल्याने हा निर्णय 24 तासांत मागे घ्यावा लागला.
कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा फज्जा उडालाय. मुलभूत आरोग्य सुविधाच नसल्याने आता कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराला तोंड देताना मनुष्यबळही अपुरे पडत आहे. "डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर ,रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये 90 हून अधिक जागा रिक्त आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय नसल्याने रुग्णांच्या उपचारात अडचणी येतायत." असंही अनिकेत यांनी सांगितले.
'बेशिस्त नागरिक'
कल्याण-डोंबिवलीत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीत सकाळी आणि संध्याकाळी बाजारपेठांमध्ये गर्दी असते, असे एका स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयकांचं म्हणणं आहे.
"टाळी एका हाताने वाजत नाही. इथे डोंबिवलीत प्रशासनाकडून अनास्था आहे. माझ्या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला तरी तो राहत असलेला मजला किंवा इमारत सील करण्यात आली नाही. तसंच बाहेर अगदी दुपारी अडीच वाजेपर्यंत लोकांची लगबग असते. अनेकजण मास्क वापरत नाहीत." अशी प्रतिक्रिया डोंबिवलीत राहणाऱ्या आणि वाचा स्वयंसेवी संस्थेत मुख्य समन्वयक म्हणून काम करणाऱ्या रुपाली पेठकर यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण असलेल्या इमारती सील होत नसल्याने इतर रहिवाशांना आपल्या परिसरात कुठे रुग्ण आहेत याची कल्पना येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. "लोक काही ना काही कारण काढत घराबाहेर पडताना दिसतात.
अगदी क्षुल्लक कारणासाठी खरेदी होताना दिसतेय. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसले तरी प्रशासनाचा धाक नसल्याने लॉकडॉऊनचे नियम धाब्यावर बसवले जातायत." असं पत्रकार अनिकेत सांगतात.
अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यानंतर आता ठाण्यातही जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली.
उल्हासनगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदावर बदली करण्यात आली. तर समीर उन्हाळे यांची ठाणे अतिरिक्त आयुक्तपदावरुन उल्हासनगर पालिका आयुक्तपदावर बदली करण्यात आली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























