पालघर हत्याकांड : साधूंची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी : #5मोठ्याबातम्या

पालघर

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. साधूंची बाजू मांडणाऱ्या वकीलांचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

पालघरमध्ये स्थानिकांकडून मारल्या गेलेल्या साधूंची बाजू कोर्टात मांडणारे वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा अपघाती मृत्यू झालाय. सुनावणीसाठी ते कोर्टात जात असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात ते जागीच ठार झालेत.

या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. न्यूज 18 लोकमतने याविषयी बातमी प्रसिद्ध केली आहे.

हा अपघात म्हणजे निव्वळ योगायोग होता का, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत केला आहे. तर महाराष्ट्राने ही केस CBIकडे सोपवावी अशी मागणी भाजपने केली आहे.

कोरोना
लाईन

2. आषाढी वारी संदर्भात चोपदारांच्या सूचना

यावर्षी आषाढी वारीचा पायी सोहळा मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांना घेऊन करावा अशी सूचना राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी आळंदी देवस्थान आणि सरकारला दिली आहे. सकाळ वृत्तपत्राने याविषयीची बातमी छापली आहे.

आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर पहिले सात दिवस पालखी आळंदीतच राहील आणि त्यानंतर पायी वारी सोहळा सुरू करण्यात यावा, यानंतर दहा दिवसांत दररोज 25 किलोमीटरचा टप्पा पार करावा. यामुळे मर्यादित दिवसांत सोहळा येईल आणि यंत्रणेवर ताण येणार नसल्याचं चोपदारांनी सुचवलं आहे.

3. एस.टी. कर्मचाऱ्यांना मिळणार एप्रिल महिन्याचा पगार

कर्मचाऱ्यांचे पगार देता यावेत यासाठी राज्य सरकारकडून एस.टी. महामंडळाला 250 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. यामुळे लवकरच एस.टी. कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार मिळू शकेल.

आजच्या लोकमतमध्ये याविषयीची बातमी आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा यासाठी निधी मिळावा म्हणून विविध संघटना प्रयत्न करत होत्या. पण सरकारकडून देण्यात आलेल्या 250 कोटींच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा फक्त एका महिन्यापुरताच सुटणार आहे.

4. कोव्हिड रुग्णांसाठी मुंबईत 22,000 बेड्सची तजवीज

पुढचा आठवडा किंवा त्या आसपासच्या काळात मुंबईत सुमारे 20,000 रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज लागण्याचा अंदाज राज्य सरकारने कोव्हिड-19 संदर्भात नेमलेल्या टास्क फोर्सने व्यक्त केला आहे. यामुळेच आता मुंबईतली खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण 22,000 बेड्सची तजवीज करण्यात आलेली आहे.

आजच्या मुंबई मिररमध्ये याविषयीची बातमी आहे.

शहरातल्या हॉस्पिटल्समधले 80% बेड्स आता कोव्हिडच्या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता प्रसुतीविभाग, कॅन्सर उपचार, डायलिसीस, ट्रॉमा केअर वगळता हॉस्पिटल्समधले इतर सगळे विभाग बंद असतील.

5. राज्य सरकार स्थापणार कामगार ब्यूरो

राज्यातल्या उद्योगांमध्ये कामगारांचा तुटवडा जाणवू नये म्हणून उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभाग कामगार ब्यूरो सुरू करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याविषयीची माहिती दिली. महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची दिली आहे.

अनेक परप्रांतीय कामगार परत निघून गेल्याने स्थानिकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. कामगार ब्यूरोमध्ये कामगारांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. आणि नंतर 7 दिवस प्रशिक्षण देऊन उद्योगांमध्ये या कामगारांना नोकऱ्या देण्यात येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)