कोरोना व्हायरस: '...तर पुन्हा निर्बंध टाकावे लागतील' - उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images
राज्यातल्या राज्यात अडकलेली माणसं घरी जाऊ शकतील, यासाठी येणाऱ्या दिवसांत सोय करू, असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मात्र, झुंबड उडाली तर पुन्हा निर्बंध टाकावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जनतेशी संवाद साधण्याआधी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. लॉकडाऊन संपायलाही दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर या संवादाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
दुसरीकडे, राज्यातील अनिश्चितता संपुष्टात आणण्यासाठी काही गाइडलाइन्स आखून देऊन विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज विधानपरिषद निवडणूक घेण्यास परवानगी दिली. याबाबत उद्धव ठाकरे स्पष्टपणे काही बोलले नाहीत. मात्र, त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
'कुणी दगा दिला तर....' - उद्धव ठाकरे
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला. "कुणी प्रेमाने वागलं तर महाराष्ट्र प्रेम करतो. कुणी दगा दिला तर काय करायचं हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वावरून सध्या घडामोडी वेगवान झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला महत्त्व आलं आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :
- महाराष्ट्र लढवय्यांचा आहे. त्यामुळे आपण कोरोनाविरुद्ध लढू आणि जिंकू.
- लॉकडाऊन हे गतिरोधक आहे. हे केलं नसतं तर विषाणूचा गुणाकार झाला असता.
- लॉकडाऊन असूनही आकडे वाढतात. कारण आधी जे आजारी होते, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आजार होत आहे.
- ज्यांची ऑक्सिजनची पातळी कमी आहे आणि ज्यांना इतर आजार आहेत, अशा लोकांना तपासणी करून वेगळं करण्याय येतंय. त्यांची कोव्हिडची चाचणी घेण्यात येतेय.
- मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीच्या महापौर परिचारिका म्हणून काम सुरू करत आहेत.
- खासगी हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी अजून दोन पावलं पुढे यायला हवं.
- वेळेत हॉस्पिटलमध्ये आलात तर जीव वाचवायला सोपं जातं. लक्षणं दिसली तर अंगावर काढू नका.
- संपत्ती जातेय, पण खरी संपत्ती तर जनता असते. जनता वाचली तर रुतलेला आर्थिक गाडा पुढे ढकलता येईल.
- रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोनमध्ये ज्वालामुखी पेटेल असं वाटत नाही. पण एक पेशंट आला तर वात लागेल.
- रेड झोनमध्ये मुंबई व परिसर, पुणे व परिसर, नागपूर, औरंगाबाद - तिथे आकडे वाढत आहेत. तिथे काहीही करणं आपल्या हिताचं नाही.
- हळुहळू इतर राज्यांतल्या लोकांना पाठवणार आहोत. बाहेर अडकलेली मराठी माणसं आणणार आहोत.
- राज्यातल्या राज्यात अडकलेली माणसं घरी जाऊ शकतील, यासाठी येणाऱ्या दिवसांत सोय करू.
- शेतीला अडचण येऊ देणार नाही. माल वाहतुक सुरू आहे.
- झुंबड उडाली तर पुन्हा निर्बंध टाकावे लागतील
- मंत्रालयात काही पॉझिटिव्ह केसेस साडपल्या म्हणून मंत्रालय बंद करावं लागलं.
- आयुर्वेदिक आणि होमिओपथी डॉक्टरांची फीवर क्लिनिकसाठी मदत घेत आहोत.
- 3 तारखेनंतर अधिक मोकळीक असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















