भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी आहे- राष्ट्रवादी काँग्रेस #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज सकाळी विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी - राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहेत, अशी टीका जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत महाराष्ट्रात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे.
अघोषित आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. फडणवीस यांच्या या पत्राचा उल्लेख करत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. फडणवीस यांनी जे पत्र दिले आहे त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असाच सूर निघत असल्याचा दावा पाटील यांनी केला.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

2. लोभ सोडा, मिळेल त्या किंमतीत घरे विकून मोकळे व्हा, नितीन गडकरी यांचा बिल्डरांना सल्ला
बांधकाम व्यवसाय अडचणीत आलेला असतानाही घरांच्या किंमती कमी होत नाहीत. मुंबईत प्रति चौरस फूट 30 ते 40 हजार रुपये दर मिळेल, या आशेवर अनेक बिल्डर असतात. पण त्यांनी जास्त लोभ बाळगू नये. मिळेल त्या किंमतीत प्रसंगी ना नफा ना तोटा तत्वावर घरं विकावित, असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बिल्डरांना दिला आहे.

फोटो स्रोत, facebook
बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या 'नरेडको'ने बुधवारी आयोजित वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. बांधकाम व्यवसायावरील संकटाचा उल्लेख करून नितीन गडकरी यांनी बिल्डरांना मार्गदर्शन केलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
3. कॉलेजचं नवं सत्र 1 ऑगस्टपासून - विद्यापीठ अनुदान आयोग
विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी आणि यंदाच्या परीक्षांसंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार 2020-21 हे नवं शैक्षणिक वर्ष जुन्या विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्ट 2020 रोजी तर नव्या विद्यार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर 2020 रोजी सुरू होईल. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विद्यापीठं उन्हाळी सुट्ट्यांचं आयोजन 30 दिवसांच्या कालावधीत करू शकतील. हा कालावधी 1 जून ते 30 जून 2020 पर्यंत असेल, असंही यूजीसीने जाहीर केलं आहे. जर उन्हाळी सुट्ट्या द्यायच्या असतील तर विद्यार्थी 15 मे 2020 पर्यंत ऑनलाइन आदी विविध मार्गाद्वारे शिक्षण घेतली. 16 ते 31 मे 2020 या कालावधीत सबमीशन आणि अन्य कामे पूर्ण करतील.
4. पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु
महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेडझोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय सरकारने दिला. त्यामुळे राज्यातील आर्थिक चाके फिरु लागली आहेत. अटीशर्तींसह उद्योगांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुणे जिल्ह्यात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी महानगरपालिकांची हद्द वगळता अन्य जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 516 उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये अत्यावश्यक सेवेतील 460 आणि अन्य क्षेत्रातील 56 उद्योगांचा समावेश आहे. कुरकुंभ, जेजुरी, इंदापूर आणि पाटस याभागातील एमआयडीसीत हे उद्योग सुरु करण्यात आले आहेत. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. नविद अंतुले यांचे निधन
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
नविद यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. पण त्यांनी काँग्रेसऐवजी शिवसेनेची निवड केली होती. पण गेले काही दिवस ते राजकारणापासून अलिप्त होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























