कोरोना व्हायरस : मजुरांच्या शेल्टर होममध्ये सापडला कोरोनाबाधित रुग्ण, ही मोठ्या संकटाची सुरुवात?

Nashik District administration

फोटो स्रोत, Nashik District administration

फोटो कॅप्शन, समाजकल्याण वसतीगृगातील मजूर
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, आणि मोठ्या शहरांमध्ये काम करणारे हजारो मजूर, कामगारांचे लोंढे आपापल्या गावाकडे चालत निघाले.

आधुनिक भारताच्या 'इतिहासातलं सगळ्यांत मोठं स्थलांतर' असं वर्णन या स्थलांतरितांच्या लोंढ्यांचं केलं गेलं. अर्थातच त्यांना प्रवासाची परवानगी नव्हती. बसेस, ट्रेन्स सगळं बंद असल्यामुळे शेकडो मजुरांनी अनधिकृतरित्या ट्रक, कंटेनर, खाजगी वाहनं किंवा पायी असा प्रवास केला.

यातल्या अनेकांना ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने अडवलं आणि त्यांची रवानगी शेल्टर होममध्ये केली. या मजुरांच्या लोंढ्यांत एखादा जरी कोरोनो पॉझिटिव्ह असेल किती भयानक परिस्थिती उद्भवेल याची आधी कल्पना केली नसली तरी आता करायला हवी कारण मुंबईहून उत्तरप्रदेशच्या दिशेने निघालेल्या मजुरांना नाशिक इथल्या ज्या शेल्टर होममध्ये ठेवलं होतं, तिथल्याच एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना
लाईन

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही मजूर कंटेनरमध्ये लपून मुंबई-आग्रा हायवेवर प्रवास करत होते, त्यांना नाशिक शहरात गरवारे पॉईंटजवळ पकडण्यात आलं त्यातलेच काहीजण नाशिकच्या समाजकल्याण वसतिगृहात ठेवले होते. त्यातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

शी मिळाली माहिती?

नाशिकमधल्या समाजकल्याण वसतीगृहात राहात असणारा ही व्यक्ती 30 मार्चला मुंबईहून नाशिकमध्ये आली होती. हा नागरिक नवी मुंबईत ट्रक क्लीनर म्हणून काम करत होता. नाशिकमध्ये आल्यावर त्याला समाजकल्याण वसतीगृहात ठेवण्यात आलं.

13 एप्रिलला त्याला डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याची शेल्टर होममध्येच तपासणी केली आणि संशय आल्यामुळे त्याला नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

15 एप्रिलला संध्याकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याबाबतीत अधिक माहिती देताना नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित ज्या बिल्डिंगमध्ये राहात होता तिथे 114 जण राहात आहेत. त्यापैकी कोरोनाबाधिक व्यक्ती आणि आणखी एक जण यांना आधीच हॉस्पिटलला अॅडमिट केलं होतं.

इगतपुरी शेल्टर होममधले मजूर

फोटो स्रोत, Pravin Thakare

फोटो कॅप्शन, इगतपुरी शेल्टर होममधले मजूर

उरलेले 8 जण हायरिस्क गटात होते त्यांनाही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे. उरलेल्या 104 स्क्रीनिंग होत आहे. ही बिल्डिंग सील केली आहे.

समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बीबीसी मराठीच्या प्रवीण ठाकरेंशी बोलताना सांगितलं की इथे पूर्णपणे स्वच्छता केली जात आहे आणि कालच्या घटनेपासून आता बंदोबस्त वाढवला. इथल्या स्वच्छतेचं कंत्राट खाजगी कंपनीला दिलं आहे आणि ते संरक्षक सूट घालून इथे वावरत आहे.

जेवणाची व्यवस्था महानगरपालिकेने केली आहे, आणि बहुतांश वेळा स्वयंसेवी संघटनांनी दिलेले रेडीमेड फुड पॅकेट्स इथे वाटले जात आहेत.

सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार?

स्थलांतरित मजुरांना ज्या शेल्टर होममध्ये ठेवलं आहे तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे का हा खरा प्रश्न आहे.

नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी सांगितलं की, "आम्ही शाळा, मंगल कार्यालयं आणि समाजकल्याण विभागाची वसतीगृहं ताब्यात घेऊन त्यांना तात्पुरते शेल्टर होम बनवले आहेत. या जागा मोठ्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मोजकी माणसं राहातील याची आम्ही काळजी घेतली आहे."

शेल्टर होममध्ये राहाणाऱ्या लोकांसाठी एक मेडिकल टीम तैनात केलेली आहे आणि ती अधूनमधून या लोकांची तपासणी करत असते. "इथल्या शेल्टर होममध्ये एक कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यामुळे मी आता जिल्ह्यातल्या सगळ्या शेल्टर होम्समध्ये नियमितपणे थर्मल स्क्रीनिंग करण्याचे आदेश दिले आहेत," ते सांगतात.

समाजकल्याण विभागाच्या ज्या बिल्डिंगमध्ये कोरोनाबाधित पेशंट सापडला आहे तिथेही एक खोली असेल तर दोन, आणि मोठी खोली असेल तर चार लोक ठेवले आहे. त्यांना जेवण वाढतानाही आखून दिलेल्या चौकोनांचा वापर करावा लागतो. पण तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघड होतंय.

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या एका शेल्टर होमला भेट दिली होती. तिथे जागा जरी जास्त असली तरी तिथे राहाणारे स्थलांतरित कामगार मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत नसल्याचं त्यांना दिसलं.

"मुळात तिथले मजूर भांबावलेले आहेत, दुसरं म्हणजे त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, काही कानडी आहेत, काही उत्तर भारतीय. त्यामुळे ते नेहमी कोंडाळं करून बसतात. महानगरपालिकेचे अधिकारी किंवा डॉक्टर्स त्यांना लांब-लांब बसायला सांगतात, ते तेवढ्यापुरतं लांब होतात आणि पुन्हा कोंडाळं करून बसतात. अशात सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघडच आहे," ते सांगतात.

किती लाख मजूर अडकलेत?

2011 च्या आकडेवारीनुसार देशात 14 कोटी स्थलांतरित मजूर आहेत. 24 तारखेला लॉकडाऊन जाहीर केल्यांनंतर देशातल्या मोठ्या शहरांमध्ये कामासाठी स्थलांतरित झालेल्या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आणि लाखोंनी आपल्या गावाचा रस्ता धरला.

प्रवास करण्याची परवानगी नाही तसंच या व्यक्तींमुळे ग्रामीण भागात कोरोना पोहोचू नये यासाठी सरकारने अशा लोकांना अनेक ठिकाणी अडवलं आणि त्यांची राहाण्याची व्यवस्था ठिकठिकाणच्या शेल्टर होम्समध्ये केली.

सरकारी आकड्यांनुसार आजघडीला देशात 1 कोटीहून अधिक कामगार आणि मजूर शेल्टर होम्समध्ये अडकले आहेत. सरकार, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे.

उद्धव ठाकरेंनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याला संदेश देताना सांगितलं होतं की महाराष्ट्रात सुमारे जवळपास 6 लाख स्थलांतरित मजूर अडकले आहेत. त्यांना रोज दोन वेळेचं जेवण, नाश्ता आणि आरोग्यविषयक सुविधा दिल्या जात आहेत.

राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की शेल्टर होममध्ये ठेवलेल्या मजुरांची काळजी घेण्याचे आणि त्यासंबंधी निर्णय घेण्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आणि स्थानिक प्रशासन योग्य ती खबरदारी घेतंय.

पण दुसरीकडे शेल्टर होममध्ये मजुरांचे हाल होत असल्याचं चित्र आहे. 2 वेळेच्या जेवणासाठी लांबच लांब रांगा असल्याचे, जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. मध्यंतरी इगतपुरी इथल्या शेल्टर होममध्ये अडकलेल्या मजुरांनी आपल्याला दोन वेळेचं जेवणंही मिळत नसल्याचं म्हटलं होतं. त्यातल्या अनेकांनी पळून जायचाही प्रयत्न केला.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्थलांतर करणाऱ्या मजुरांना अडवून, त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना क्वारंटिन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. पण स्क्रीनिंगमध्ये कोणतीही लक्षणं न दिसणारे बाधित पेशंट्स आता समोर येत आहेत. सगळ्या स्थलांतरितांचं नक्की स्क्रीनिंग झालं का? हा ही एक मोठा प्रश्न आहे.

स्थानिकांचा होता विरोध

दुसरीकडे ज्या गावांमध्ये या मजुरांची राहण्याची व्यवस्था केलीये तिथल्या ग्रामस्थांचा या शेल्टर होम्सला विरोध होता. इगतपुरीतल्या या स्थलांतरित मजुरांना ठेवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना इथून हलवावं यासंबंधी तहसीलदारांना निवेदनही दिलं होतं.

तहसिलदारांना निवेदन देताना इगतपुरीचे स्थानिक

फोटो स्रोत, PrAVIN THAKARE

फोटो कॅप्शन, तहसिलदारांना निवेदन देताना इगतपुरीचे स्थानिक

"मुळात ही माणसं इथे यायलाच नको होती. त्यांनी ठाणे जिल्ह्याची सीमा कशी काय पार केली. आता ही माणसं इथे आहेत, आमचे सगळे डॉक्टर्स यांच्या मदतीला, पोलीस इथे... म्हणजे आसपासची सगळी गावं वाऱ्यावर सोडली आहेत. यांच्यात एखादा जरी कोरोनाबाधित असेल तर त्याचा संपूर्ण गावाला धोका असेल. आम्ही का हा धोका पत्कारावा," एका स्थानिक व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितलं.

काही दिवसांपुर्वी असणारी तणावाची परिस्थिती आता निवळल्याचं इथले स्थानिक पत्रकार शैलेश पुरोहित म्हणतात. "आज इतके दिवस होऊन गेलेत पण तरीही या हायवेवरून जाणारे लोंढे थांबले नाहीयेत," ते नमूद करतात.

स्थलांतरित मजुरांची वाढती अस्वस्थता

लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढल्यामुळे दिवसांनी वाढल्यामुळे स्थलांतरित कामगारांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातच शेल्टर होममध्ये पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्यामुळे त्यांच्या चिंतेचं वातावरण आहे. काहीही करा पण आम्हाला घरी जाऊ द्या अशी त्यांची मागणी आहे. याची उदाहरण वांद्रे, सुरत आणि चेन्नई प्रकरणातून ठळकपणे समोर येत आहेत.

नाशिकमधल्या शेल्टर होम्समधूनही अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी मांढरे म्हणतात, "जवळपास 1800 लोक नाशिक जिल्ह्यात आहेत आणि त्यांची पूर्ण काळजी घेतली जातेय. पण गेल्या अनेक दिवसांपासून हे मजूर आपल्या घरांपासून दूर आहेत आणि त्यांची घरी जायची इच्छा दिवसागणिक तीव्र होतेय. यामुळे अनेकदा ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात आणि येनकेन प्रकारे घरी निसटायचा प्रयत्न करतात."

दुसरीकडे या मजुरांना आपल्या राज्यात परत घेण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालसारख्या राज्यांनी नकार दिलाय. आम्ही शेल्टर होममधल्या काही मजुरांशी बोललो, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की जीव गेला तरी बेहत्तर पण आम्हाला परत जाऊ द्या.

'आहे तिथेच थांबा' आणि 'कोरोना परवडला पण आम्हाला घरी जाऊ द्या' या दोन टोकाच्या मध्ये कुठेतरी भारताचं पुढचं भविष्य अडकलेलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)