कोरोना व्हायरस : मी विनय दुबेला ओळखत नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, MAHARASHTRA DGIPR
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मी विनय दुबेला ओळखत नाही - गृहमंत्री अनिल देखमुख
लॉकडाऊनच्या काळात वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात गर्दी जमवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनय दुबेला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
गेल्याच आठवड्यात विनय दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून 25 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता सुपूर्द केला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (15 एप्रिल) अनिल देशमुख यांनी ट्वीट करून यासंदर्भात खुलासा केला.
या ट्वीटमध्ये देशमुख यांनी म्हटलं आहे, "विनय दुबे याला मी ओळखत नाही. आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता. मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्यामुळे त्याने माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा 25 हजार रुपयांचा चेक सुपूर्द केला. त्यावेळी त्याच्यासोबत जो व्यक्ती होता, तो बहुदा विनय दुबे होता."
"14 एप्रिलपासून ट्रेन नेहमीप्रमाणे धावतील, अशी चुकीची माहिती 11 मार्गांनी पसरवली गेली. त्याची माहिती व ज्या समाजमाध्यमांचा गैरवापर केला गेला त्या अकाऊंट्सचीही माहिती पोलिसांना मिळाली असून लवकरच कायदेशीर कारवाई सुरु होईल," असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

2. तबलीगी जमातच्या प्रमुख मौलानावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी मौलाना साद यांच्यासह एकूण 17 जणांनी तपासणीसाठी समोर यावं म्हणून नोटीस बजावली आहे. यापैकी 11 जणांनी होम क्वारंटाइन असल्याची सबब दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मौलाना साद यांनीही आपण क्वारंटाइन आहोत असं सांगितलं होतं. आता त्यांचा आयोसोलेशनचा कालावधी संपला की पोलीस त्यांना अटकही करु शकतात.
दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात देशभरातून अनेक लोक गेले होते. त्यानंतर या सगळ्यांचं करोना कनेक्शनही समोर आलं.
3. कोरोनामुळे 73 लाख जणांच्या नोकरीवर गदा
लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीतल्या जवळपास 73 लाख जणांच्या नोकरीवर गदा यायची शक्यता आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनामुळे जितके मृत्यू झाले, त्यापैकी 65 टक्के जण मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या 6 शहरांतील आहे. या राज्यातील रेस्टॉरंट्स कधी सुरू होतील, याचा काहीएक अंदाज अद्याप नाही.
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर मदत जाहीर करावी किंवा नियमांमध्ये शिथिलता आणावी, अशी आशा 5 लाख रेस्टॉरंट्स चालकांना आहे.
4. देशातील 400 जिल्हे करोनामुक्त, व्हायरस पोहोचू देणार नाहीः आरोग्यमंत्री
देशातील 718 पैकी 400 जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. तिथे एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना करोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे 2 ते 3 आठवडे हे देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले.
कोरोना संसर्गाची बातमी येताच भारतानं पटापट पावलं उचलली. कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्ये 7 जानेवारीला आढळून आला होता. यानंतर आपण 8 जानेवारीपासून तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. यानंतर 17 जानेवारीला केंद्र सरकारने आरोग्यासंबंधीच्या सूचना प्रसिद्ध केल्याचं त्यांनी सांगितलं.
5.जून ते सप्टेंबर महिन्यात 96 ते 100% पाऊस : हवामान विभाग
यंदा मान्सून सामान्य असेल. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत बुधवारी (15 एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाने मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.
यंदा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे, तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे.
मान्सूनचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून वर्दी देईल अशी आशा आहे, तर चेन्नईत 4 जून, पणजीमध्ये 7 जून, हैदराबादमध्ये 8 जून, पुण्यात 10 आणि मुंबईत 11 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























