कोरोना व्हायरस : खासगी लॅबमधील मोफत चाचणीबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं बदलला - #5मोठ्याबातम्या

A scientist examines test samples

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा

1. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांसाठी खासगी लॅबमध्ये मोफत चाचणी नाही

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन त्याचं संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर देशातील खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी मोफत करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश बदलला असून खासगी लॅबमध्ये सरसकट मोफत तपासणी होणार नाही. लोकमतनं ही बातमी दिलीये.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित नियमानुसार आता भारत सरकारच्या 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी पात्र असलेल्यांचीच मोफत कोरोना चाचणी होईल. तसंच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांची चाचणीही खासगी लॅबमध्ये मोफत होईल.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी शुल्क मोजावे लागेल. कोरोना चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये साडेचार हजार रुपये शुल्क घेतलं जातं.

2. मुंबई महिन्याभरात रुळावर येईल- पालिका आयुक्त प्रवीण परदेशी

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने वेगाने पावलं उचलल्याने एक महिन्यातच सकारात्मक चित्र दिसत असून, आणखी एक महिन्यात मुंबईत पुन्हा रुळावर येईल, असा विश्वास मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केला. 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई

"मुंबईतील करोनाची साथ नियंत्रणात आहे. महापालिकेने खूप आधी रुग्णांचा शोध सुरू केल्याने त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे ८० टक्के रुग्ण आधीच शोधता आले. रशिया, चीन या देशांना त्यांच्याकडील साथ नियंत्रणात आणण्यासाठी तीन ते चार महिने लागले," असं परदेशी यांनी म्हटलं.

पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी खासगी रुग्णालयं आणि प्रयोगशाळांचीही मदत घेण्यात येणार असल्याचंही परदेशी यांनी सांगितलं.

"वरळीपाठोपाठ भायखळा, धारावीसह उपनगरातील काही ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिकेने या भागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. धारावीत नागरिकांनी चांगलं सहकार्य दिले असून, नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू आणून देण्याचं काम पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस करीत आहेत," अशी माहिती परदेशी यांनी दिली.

कोरोना
लाईन

3. 'लॉकडाऊनचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई'

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत काही जण महिलांवर अत्याचार करत आहेत. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.

राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये 24 तास काम करत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कुणी महिलांना त्रास देत असले, त्यांच्यावर अत्याचार आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं.

आपल्या राज्यातील महिलांना सुरक्षित वाटलेच पाहिजे, असं देशमुख यांनी म्हटलं.

4. मार्च-एप्रिलचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ

महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वतः घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचं वीजबिल प्राप्त होईल.

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं

ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण प्रकरणं संपूर्ण बरे झालेले मृत्यू
महाराष्ट्र 1351153 1049947 35751
आंध्र प्रदेश 681161 612300 5745
तामिळनाडू 586397 530708 9383
कर्नाटक 582458 469750 8641
उत्तराखंड 390875 331270 5652
गोवा 273098 240703 5272
पश्चिम बंगाल 250580 219844 4837
ओडिशा 212609 177585 866
तेलंगणा 189283 158690 1116
बिहार 180032 166188 892
केरळ 179923 121264 698
आसाम 173629 142297 667
हरियाणा 134623 114576 3431
राजस्थान 130971 109472 1456
हिमाचल प्रदेश 125412 108411 1331
मध्य प्रदेश 124166 100012 2242
पंजाब 111375 90345 3284
छत्तीसगड 108458 74537 877
झारखंड 81417 68603 688
उत्तर प्रदेश 47502 36646 580
गुजरात 32396 27072 407
पुडुच्चेरी 26685 21156 515
जम्मू आणि काश्मीर 14457 10607 175
चंदीगड 11678 9325 153
मणिपूर 10477 7982 64
लडाख 4152 3064 58
अंदमान निकोबार 3803 3582 53
दिल्ली 3015 2836 2
मिझोरम 1958 1459 0

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 30 IST ला शेवटचं अपडेट

नितीन राऊत यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणने मार्च महिन्याचं बिल भरण्यास 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ही अंतिम तारीख दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणं बंद करण्यात आलं आहे. सोबतच वीजबिलांची छपाई आणि वितरण देखील बंद करण्यात आलं आहे.

5. गुजरातमध्ये काम करणारे 114 खलाशी पालघरमध्ये उतरले

गुजरातमधील वेरावळ भागात काम करणारे 114 खलाशी हे पालघर जिल्ह्यातील झाई समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (12 एप्रिल) उतरल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

गुजरातच्या वेरावळ आणि पोरबंदर भागात मासेमारीसाठी गेलेल्या राज्यातील सुमारे अडीच ते साडे तीन हजार खलाशांपैकी 114 खलाशी एका बोटीतून 20 तासांहून अधिक प्रवास करून रविवारी पालघरच्या झाई समुद्रकिनाऱ्यावर उतरले.

गोवा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोवा

या खलाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांचे जवळच्या आश्रमशाळेत अलगीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तशा अधिसूचना असून पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात वाहन वा बोट वाहतुकीवर बंदी आहे. अशा स्थितीत गुजरातमधील मासेमारी बोटीने 114 मच्छीमार खलाशांना आणल्याने जिल्हाधिकाऱ्यां आदेशाचे उल्लंघन झालं आहे. त्यामुळे घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच पद्धतीने 22 ते 24 बोटी कच्छ परिसरातून महाराष्ट्राकडे निघाल्या आहेत. राज्य सरकारकडून त्यांना उतारण्यासाठीची परवानगी मिळविण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)