कोरोना व्हायरस: WHOने मास्क वापरण्यासंबंधी या नवीन सूचना केल्या आहेत

फोटो स्रोत, NITIN KANOTRA/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES
6 एप्रिल रोजी WHOने मास्क संदर्भात नव्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. जशी आमच्या हाती नवी माहिती येईल तशा सूचना आम्ही देऊ, असंही WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं आहे.
काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की मास्क वापराच. चेक रिपब्लिक या देशाने तर घराबाहेर पडण्यासाठी मास्क सक्तीचं केलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की मास्क वापरावं की नाही. जर मास्क वापरायचं असेल तर कोणत्या प्रकारचं हवं.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने सांगितलं आहे की प्रत्येकानेच मास्क वापरणं आवश्यक नाही.
ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरस आहेत त्या यव्यक्तीच्या खोकल्या-शिंकल्याने बाहेर पडणाऱ्या तुषांरामधून कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. पण व्हायरसची लागण झाल्यानंतर आजाराची लक्षणं दिसण्यासाठी 2 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.
WHOच्या नव्या सूचना
जागतिक आरोग्य संघटनेनी 6 एप्रिलला नव्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलं आहे की कोरोना व्हायरसच्या प्रसाराची दोन माध्यमं आहेत. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून तसेच ड्रॉपलेट्स एखाद्या पृष्ठभागावर असले आणि त्याला निरोगी व्यक्तीचा स्पर्श झाला तर कोरोना होऊ शकतो.
ही गोष्ट समजून घेऊन मास्कचा वापर करावा, असं WHO सांगतं.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

मास्क वापरायचा असेल तर या गोष्टी विचारात घ्याव्यात असं WHO सांगतं...
1. उद्देश - तुम्ही मास्क का वापरत आहात, हे तुम्हाला ठाऊक पाहिजे. जसं की तुमच्याकडून इतरांना लागण होऊ नये म्हणून तुम्ही मास्क वापरत आहात की दुसऱ्याकडून तुम्हाला लागण होऊ नये म्हणून तुम्ही मास्क वापरत आहात.
2. रिस्क ऑफ एक्सपोजर: तुम्ही कॅशियर किंवा मेडिकल प्रोफेशनल असाल तर अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण येण्याचा धोका असतो त्यामुळे तुम्ही मास्क वापरावा.
3. आरोग्याच्या इतर तक्रारी असतील तर - जर तुमचं वय जास्त असेल, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा तक्रारी असतील तर मास्क वापरावा.
4. वातावरण - गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल, बस-मेट्रोचा वापर करणार असाल तर मास्क वापरावा.
5. उपलब्धता - सध्या जगभरात मास्कचा तुटवडा पडत आहे. जर प्रत्येकानेच मास्क वापरला तर मेडिकल प्रोफेशनल आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला मास्क उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे हा पण घटक लक्षात घ्यावा.
6. मास्कचा प्रकार - मेडिकल मास्क आणि नॉन-मेडिकल मास्क

फोटो स्रोत, Getty Images
मास्क वापरायचा असेल तर सर्जिकल मास्क किंवा मेडिकल मास्कचा वापर करण्यात यावा. सर्जिकल मास्क म्हणजे ऑपरेशन करताना डॉक्टर लोक जो मास्क वापरतात तो. यामध्ये एक तार असते ती नाकावर दाबली की नाकाच्या आकाराप्रमाणे ते मास्क अॅडजस्ट होतं.
नॉन मेडिकल मास्क म्हणजेच रुमाल स्वच्छ धुऊन किंवा कॉटनचा मास्क यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते की नाही याबाबत अभ्यास झाला नाही, असंही WHO ने सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'निरोगी व्यक्तीने मास्क वापरण्याचे हे आहेत धोके'
निरोगी व्यक्तींनी मास्क वापरण्याचे काही फायदे आहेत. जसं की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणं नसतात. अशा व्यक्तीपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं पण मास्क वापरण्याचे काही धोकेही WHOने सांगितले आहेत.
1. मास्कमुळे फाजील आत्मविश्वास तयार होऊ शकतो आणि तुम्ही योग्य काळजी न घेण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या काळात सर्वांत महत्त्वाचं सोशल डिस्टंन्सिंग आहे. ते पाळणं आवश्यक आहे.
2. एकच मास्क पुन्हा पुन्हा वापरणेही अयोग्य आहे.
3. त्या मास्कला तुम्ही स्वतःचा कंटॅमिनेट करू शकता. म्हणजे तुमचे हात स्वच्छ नाहीत आणि तुम्ही मास्कला स्पर्श केला तर आजाराचा धोका तयार होऊ शकतो.
4. आपण मास्क वापरत आहोत त्यामुळे हॅंड हायजिनकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
मास्क वापरण्यासाठी किंवा न वापरण्यासाठी या गोष्टींचा योग्य विचार करून तुम्ही निर्णय घ्यावा असं WHO सांगतं.
घरी बनवण्यात आलेल्या मास्कचा काही फायदा होऊ शकतो का?
मास्कचा तुटवडा निर्माण झाला म्हणून अमेरिकेत सांगण्यात आलं की घरीच मास्क तयार करा.
हाँगकाँगमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि डिजाईनच्या मास्कची फॅशन आली आहे. थायलॅंडचे पंतप्रधान प्रयुथ चॅन ओचा यांनी त्यांच्या सूटला मॅचिंग असलेला मास्क वापरला होता.

फोटो स्रोत, EPA
भारताच्या केंद्रीय आरोग्य खात्याने घरी बनवलेले मास्क कसे वापरावेत याचा व्हीडिओ तयार केला आहे. पण आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे की हे तुमच्या पर्सनल हायजिनसाठी आहे वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी तसेच कोव्हिड -19 आजाराची लक्षणं दिसणाऱ्यांनी सर्जिकल मास्क किंवा N95 मास्क वापरावेत असं सांगितलं आहे.
चेक रिपब्लिक या देशात प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरावाच असा आदेश काढला आहे.
या देशात सर्जिकल मास्कचा तुटवडा पडल्यामुळे घरातच नॉन-सर्जिकल मास्क तयार करण्यात येत आहेत, असं गार्डियन या वृत्तपत्राने म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
जागतिक आरोग्य संघटनेनी मास्क वापरणं हे सक्तीचं नाही असं सांगूनही तुम्ही मास्कची सक्ती का करत आहात असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रश्नाला उत्तर म्हणून चेक रिपब्लिकमधील लेखक आणि प्रोकॅस्टिनेशन डॉट कॉम या कंपनीचे संस्थापक पीटर लुडविग यांच्या युट्युब चॅनेलवर एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. चेक रिपब्लिकमधील संशोधकांचा असा दावा आहे की होम मेड मास्क वापरले तरी तुमचं 90-95 टक्के संरक्षण होतं.
नॉन सर्जिकल मास्कचा उपयोग होतो का? आणि जर करायचाच असेल तर कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत असं WHO ला वाटतं ते आपण पाहूत.
घरगुती मास्क वापरण्याचे निकष?
1. त्या मास्कला किती लेयर्स असाव्यात, फार पातळ मास्क नसावा. फार पातळ मास्क असल्यास व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो.
2. मास्क लावल्यानंतर श्वास घेण्यास तर काही त्रास होत नाही ना.
3. हे मास्क वॉटर रिपेलंट हवेत म्हणजे ड्रॉपलेट्सशी प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता हवी.
4. मास्कचा आकार आणि तो चेहऱ्यावर फिट बसतो की नाही
या सर्व गोष्टी विचारात घ्याव्यात असं WHO ने नव्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
मास्क संबंधी भारत सरकारच्या काय सूचना आहेत?
भारत सरकारनेही जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणेच म्हटलं आहे की फक्त तीनच स्थितीमध्ये तुम्हाला मास्क लावण्याची आवश्यकता आहे.
1. जर तुम्हाला सर्दी खोकल्याची लक्षणं असली आणि श्वसनाचा त्रास होत असेल तर ( श्वसनाच्या त्रासासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं मास्क वापरावं. )
2. जर तुम्ही कोव्हिड -19 च्या पेशंटची देखभाल करत असाल तर
3. जर तुम्ही आरोग्य सेवेत असाल तर
मास्क वापरण्यासंबंधी भारत सरकारने आठ सूचना दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Reuters
1. मास्कला दुमडून ठेऊ नका. मास्क काढून ठेवल्यावर मास्कच्या घड्या वर असाव्यात.
2. मास्क व्यवस्थितरीत्या नाक आणि हनुवटीला झाकत आहे की नाही हे तपासून घ्या. कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्या.
3. एकदा मास्क लावल्यावर त्याला स्पर्श करू नका.
4. चेहऱ्यावरून काढून मास्क गळ्यावर लटकता ठेऊ नका.
5. दर सहा तासांनी मास्क बदला
6. डिस्पोजेबल मास्क परत वापरू नका. डिसइंफेक्ट करूनच त्याला डस्टबिनमध्ये टाका.
7. मास्क काढतेवेळी मास्कच्या कापडाला स्पर्श करू नका. एखादेवेळी व्हायरस त्यावर डिपॉजिट झालेला असू शकतो आणि त्याचा तुमच्या हातांना स्पर्श होऊ शकतो.
8. मास्क काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायजर वापरा.
तर या सर्व सूचना WHO आणि भारत सरकारने दिल्या आहेत. मास्क वापरण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. WHO एक गोष्ट वारंवार सांगत आहे. ती म्हणजे जर तुम्हाला कोरोनाशी लढायचं असेल तर हॅंड हायजिन म्हणजेच हात स्वच्छ धुवावेच लागतील. तसेच सोशल डिस्टन्सिंग हा पण एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























