कोरोना व्हायरस : लॉकडाऊनमध्ये 24x7 सोबत राहिल्याने आपलेच परके वाटू लागतात तेव्हा...

प्रतीकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

शिवांगी IT सेल्समध्ये काम करते. तिला दोन वर्षांची एक मुलगीही आहे. घरात नवरा-बायको-मुलगी.

आतापर्यंत त्यांचं नॉर्मल चालणारं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. कारण - कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेला लॉकडाऊन.

कोरोना व्हायरसमुळे सगळं बंद होणार, हे लक्षात आल्यावर ते आपल्या सासू-सासऱ्यांच्या घरी गेले. तिथे आधीच 6 जणं. त्यामुळे आता सगळ्या कुटुंबाला एकत्र राहाण्याशिवाय पर्याय नाही.

"एकत्र कुटुंबपद्धती कितीही छान वाटली तरी आताच्या काळात 24 तास सतत एकमेकांसोबत राहणं शक्य नाही. भांड्याला भांडी लागून नुस्ती वाजतच नाहीत तर दणादणा आपटतात," ती सांगते.

"घरात मी, माझी मोठी जाऊ, नवरा, दीर सगळ्यांचं 'वर्क फ्रॉम होम' आहे. बरं सगळ्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या, वायफाय पुरत नाही. एक जण काम करत असतो, तेव्हा दुसरा नेटफ्लिक्स पाहात असतो. नेट स्लो होतं, त्यावरून वाद होतात. मला कॉल्स घ्यायचे असतात, पण भोवती आमची मुलं आरडाओरडा करत असतात.

"त्यात घरात कामाला बायका येत नाही, म्हणजे ऑफिसचं काम करून पुन्हा घरातली सगळी कामं करा. सासू-सासरच्यांच्या दृष्टीने मुलाचं काम काम असतं, सुनेने मात्र घरातलं सगळं करायचं. आणि आता सतत घरात असल्यामुळे कधीही कुठलंही काम उपटतं. याचा राग नवऱ्यावर निघतो. श्वास कोंडल्यासारखं होतं. त्यामुळे फट् म्हणता कोणीही फुटतं. खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे," तिच्या आवाजात तणाव जाणवतो.

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं

ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण प्रकरणं संपूर्ण बरे झालेले मृत्यू
महाराष्ट्र 1351153 1049947 35751
आंध्र प्रदेश 681161 612300 5745
तामिळनाडू 586397 530708 9383
कर्नाटक 582458 469750 8641
उत्तराखंड 390875 331270 5652
गोवा 273098 240703 5272
पश्चिम बंगाल 250580 219844 4837
ओडिशा 212609 177585 866
तेलंगणा 189283 158690 1116
बिहार 180032 166188 892
केरळ 179923 121264 698
आसाम 173629 142297 667
हरियाणा 134623 114576 3431
राजस्थान 130971 109472 1456
हिमाचल प्रदेश 125412 108411 1331
मध्य प्रदेश 124166 100012 2242
पंजाब 111375 90345 3284
छत्तीसगड 108458 74537 877
झारखंड 81417 68603 688
उत्तर प्रदेश 47502 36646 580
गुजरात 32396 27072 407
पुडुच्चेरी 26685 21156 515
जम्मू आणि काश्मीर 14457 10607 175
चंदीगड 11678 9325 153
मणिपूर 10477 7982 64
लडाख 4152 3064 58
अंदमान निकोबार 3803 3582 53
दिल्ली 3015 2836 2
मिझोरम 1958 1459 0

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 30 IST ला शेवटचं अपडेट

फायनान्स कंपनीत मॅनेजर असणारे मनोज नाईक घरात सध्या स्ट्रेस आल्याचं मान्य करतात.

"पूर्वी कसं होतं, की बाहेरचे तणाव बाहेर ठेवून घरात मोकळे व्हायचे. तो आपला कम्फर्ट झोन असतो, पण तो कम्फर्ट झोन तेव्हाच ठरतो जेव्हा बाहेर जायला जागा असते. हे म्हणजे दुसरं कोणी आलं तरच पहिला येणारा पहिला ठरतो ना, तसं आहे.

"पण आता सगळा काळ घरातच. त्यात वेगवेगळ्या वयोगटाची माणसं. प्रत्येकाचा स्ट्रेस वेगळा आणि हाताळायची पद्धतही. कुकरची शिट्टी वाजून प्रेशर बाहेर पडायला जागाच नाही," ते सांगतात.

कोरोना
लाईन

वरची दोन उदाहरण प्रातिनिधिक असली तरी अशी परिस्थिती ओढवलेले हे दोघंच नाहीत. लहान-मोठे सगळेच कमीअधिक प्रमाणात या तणावाचा सामना करत आहेत.

आजकालच्या जगात आपण जगण्यासाठी म्हणून अनेक इन्स्टिट्यूशन्सवर अवलंबून असतो - मुलांच्या शाळा, मोठ्यांचे ऑफिसेस, सिनिअर सिटिझन्स क्लब, पाळणाघरं वगैरे वगैरे... या सगळ्याच गोष्टी आपल्याला गुंतवून ठेवतात आणि त्यामुळे जो वेळ आपण घरच्यांसोबत घालवतो तो हवाहवासा वाटतो. या वेळात जर काही वादाचे प्रसंग ओढावले तर या इतर जागा स्ट्रेसबस्टरचं, मनातील ताण मोकळा करण्याचं काम करतात, आणि ते उलटही होतं.

घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, घरगुती हिंसाचार

आपण हा लॉकडाऊनचा काळ कधी विसणार नाही, पण हा काळ संपल्यानंतर आपण आपल्या जवळच्यांशी बोलत तरी असू ना, की 24 तास सतत सोबत राहिल्याने आपण एकमेकांना परके होऊन जाऊ?

लंडनमधल्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये रिलेशनशिप्स रिसर्चर असणाऱ्या प्रा. जॅक्वाय क्वीब सांगतात की एरवी घरातली मंडळी, खासकरून नोकरी करणारे नवरा-बायको एकमेकांसोबत 3-4 तास घालवतात. त्यातही आपापली घरातली कामं असतात. पण आता कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये आपण दिवसातले 14-15 तास एकमेकांसोबत असतो, रात्री झोपतो तेवढाच एकमेकांपासून ब्रेक मिळतो. अशात चिडचड होणं, एकमेकांना वैतागणं, या गोष्टी साहजिक आहेत.

"आधीच स्ट्रेस वाढायला कमी कारणं नाहीत. भविष्याची अनिश्चितता आहे, जीवाचं बरंवाईट तर होणार नाही ना, ही भीती आहे. जगलोच तर नोकरी टिकेल, याची शाश्वती नाही. आणि त्यात एकमेकांबरोबर सतत अडकून असणं, याचा नात्यांवर वाईट परिणाम होतो आहे," क्वीब मान्य करतात.

याचाच परिणाम म्हणून लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. पण याचाही परिणाम वाईट होऊ शकतो, असा इशारा क्वीब देतात.

"तुम्ही सोशल मीडियावर लोकांना त्याच्या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात काहीतरी मस्स्त अन्न शिजवताना पाहाता, पण तुमच्याकडे संध्याकाळी वाढायचं काय, हा प्रश्न असतो. घरात कधी सामान नसतं, कधी पैसै नसतात. अशात सोशल मीडिया अजून नकारात्मता वाढवतं," असं निरीक्षण त्या मांडतात.

प्रतीकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. सतत एकमेकांसमोर असलो की आपली ती स्पेस गेली, स्वातंत्र्य राहिलं नाही, आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही, असं वाटणं साहाजिक आहे.

अगदी मॉर्निग वॉकला जाऊन समवयस्कांशी गप्पा मारणाऱ्या ज्येष्ठांनाही असं वाटू शकतं. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती 'दुसरी कुणीतरी आहे' असं मानून आपल्या आयुष्यात लुडबूड करतेय, असं वाटू लागतं. त्यात 24 तास सगळ्यांना घरात सामावून घेण्याइतकी अनेकांची घरं मोठी नसतात, त्यामुळे तणाव अजून वाढतो.

पण हा तणाव असाच राहिला तर एकमेकांविषयी नकारात्मक भावना तयार होते. आपल्या रोजच्या आयुष्यातला कंट्रोल गेल्याची भावना मनात घर करते आणि त्याचा राग इतरांवर निघतो.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

असं घडू नये म्हणून काय करावं?

मुक्ता पुणतांबेकर पुण्यात व्यसनमुक्तीसाठी काम करतात. त्यांना या काळात व्यसनाबद्दल काऊन्सिलिंगचे अनेक फोन आलेत, पण त्याबरोबर घरातल्या भांडणांवर काय करावं याच्या काऊन्सिलिंगसाठीही फोन येत आहेत.

"स्वतःचं एक रुटीन ठरवायला हवं. अमुक एक वाजता उठणार, अमुक एक वाजता झोपणार, दिवसभरात या गोष्टी करणार म्हणजे करणारच. त्याने आपला आयुष्यावरचा सगळा कंट्रोल गेलाय, ही भावना कमी होते आणि असुरक्षितताही," त्या सांगतात.

दिवसभरात लहान लहान गोष्टींचं उदिष्ट ठेवा. त्या गोष्टी पूर्ण झाल्या तर होणारी चिडचिड कमी होईल, असा सल्लाही त्या देतात. स्वतःची चिडचिड कमी झाली तर इतरांसोबत राहाण्याचा त्रास होणार नाही, त्या म्हणतात.

प्रतीकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

"कधी नव्हे ती आता दुसऱ्या माणसाची स्पेस जपायला हवी, कारण सतत घरात राहिल्याने सगळ्यांनाच असुरक्षित वाटतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्ती एकटं बसायचं असेल, वेगळं काही करायचं असेल किंवा कुणाशीच बोलायचं नसेल तर त्याचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा त्या गोष्टींची गरज असेल तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला स्पेस देईल."

लॉकॉडाऊन सुसह्य होण्यासाठी घरातली कामं वाटून घेण्याचा सल्ला अनेक जण देतात, पण दुसरा काम करत असताना त्यात चुकूनही ढवळाढवळ न करण्याचा सल्ला मुक्ता देतात.

"ठरवून टाका की एक व्यक्ती काम करत असताना दुसरा तिकडे जाणार नाही, म्हणजे एकमेकांच्या पायात पायात येणं कमी होईल. मुलं असतील तर त्यांचीही जबाबदारी वाटून घ्या. मुख्य म्हणजे दिवसभरात एक सकारात्मक गोष्ट सगळे मिळून करा - म्हणजे एकमेकांसोबत राहाण्याच्या फक्त नकारात्मक नाही तर सकारात्मक गोष्टीही तुम्हाला आठवतील आणि ताण कमी होईल," त्या म्हणतात.

एक खरं की ही आधी कधीही न अनुभवलेली परिस्थिती आहे, त्यामुळे यासाठी कुणाकडेच कोणतेही रेडीमेड उत्तर नाही. पण यातून बाहेर पडायला जवळच्यांचीच साथ लागणार.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)