कोरोना व्हायरस : गिर्यारोहणाकडे वळलेल्या डॉक्टरने पुन्हा घेतला रुग्णसेवेचा वसा

फोटो स्रोत, PArmeshwar munde
बहुदा नियतीनेच माझी निवड केलीये... नाहीतर मी इथे आलोच नसतो… डॉक्टरकी कधीच सोडून दिली होती… पण आता रुग्णसेवेचा वसा घेतलाय... कोरोनाला हरवण्याचं आव्हान स्वीकारलंय. आता मागे हटणार नाही…
130 कोटी भारतीय न दिसणाऱ्या कोरोना या व्हायरसरूपी शत्रूचा सामना करतायत. कोरोनाने अचानक आक्रमण केलं. भारत ठप्प झाला. मात्र, कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपली ढाल बनलेत, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी. जीवाची पर्वा न करता देशवासीयांसाठी रणांगणात आरोग्य कर्मचारी उतरले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाची राजधानी बनतेय आणि केंद्रस्थानी आहे मुंबईचं कस्तुरबा रुग्णालय.
कस्तुरबा रुग्णालयात रुग्णसेवेचं व्रत घेतलेला एक डॉक्टर दिवसरात्र झटतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंतर, या डॉक्टरने डॉक्टरकी सोडून दिली होती. पण आता एका योद्ध्यासारखा लढतोय. 25 वर्षाच्या या डॉक्टरचं नाव, डॉ. परमेश्वर मुंडे.
उंच-उंच डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्या, हिमालयापासून सह्याद्रीचे कडे परमेश्वरला भुरळ घालायचे. गिर्यारोहणासारखा साहसी खेळ त्याचा छंद आणि प्रेम सुद्धा.
आपल्या प्रेमासाठी त्याने 2017मध्ये MBBS झाल्यानंतर डॉक्टरकी सोडली. गिर्यारोहणाचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी. पण जगभरात पसरणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने त्याचं मन हेलावून टाकलं. आपलं प्रेम सोडून, लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याने पुन्हा रुग्णालयाची वाट धरली. त्याने निवडलं, मुंबईचं इन्फेक्शिअस डिसीजचं रुग्णालय कस्तुरबा.
डॉ. परमेश्वर यांची कस्तुरबात निवड झाली आणि, ड्यूटीवर आल्यानंतर 15 दिवसातच त्याची रवानगी कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये करण्यात आली.


परमेश्वर सांगतो, "कोरोना वॉर्डमध्ये येताना खूप भीती वाटली. मित्रांनी जावू नको असं सांगितलं. तर, काही म्हणाले अरे हीच खरी काम करण्याची वेळ. मग धीर मिळाला, नक्की केलं... आता इथेच काम करायचं. सर्वच घाबरले, तर काम कोण करणार. मनाशी निर्घार केला आणि कामाला सुरूवात केली."
"कोविड-19च्या वॉर्डमध्ये भीती वाटतेच. पण, माझ्यासाठी नाही. घरच्यांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी. त्यांना माझ्यामुळे इन्फेक्शन व्हायला नको. संशयित रुग्णाच्या घशाचे नमुने घेताना मनात शंकेची पाल चुकचुकते. मला इन्फेक्शन होणार नाही ना? अंगावर काही पडलं नसेल ना? मनात अनेक विचार येतात," असंही डॉ. परमेश्वर सांगतात.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोना वॉर्डमध्ये काम करणं, मोठं आव्हानात्मक आणि जिकिरीचं. याबाबत विचारलं असता डॉ. परमेश्वर सांगतात, "कोविड-१९ वॉर्डमध्ये काम करणं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण अंग झाकलेलं असतं. खूप घाम येतो, स्ट्रेसही आहेच. आम्ही सर्व खबरदारी घेतो. पण, खूप लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे, सर्व योग्य असेल ना? काही चूक तर झाली नाही? हा मनात विचार येतोच."
कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांना ठेवण्यात आलंय. दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत. रुग्णांबाबत विचारलं असता डॉ. परमेश्वर म्हणतात, "रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला त्याला कोरोना तर झाला नाहीये ना? याची भीती वाटत असते. मनात चलबिचल सुरू असते. कोरोना बरा होतो ना? मला झाला असेल तर? रुग्णालयात नक्कीच होईल? डॉक्टर हे कधी संपणार? औषध नाही, मग मी बरा होणार ना? अशा प्रश्नांची रुग्णांकडून सरबत्ती होते. त्यामुळे रुग्ण आणि संशयितांचं समुपदेशन करावं लागतं. त्यांना समजावून सांगावं लागतं. प्रसंगी त्यांच्या कलांनी घ्यावं लागतं."
कोरोनाच्या भीतीने काही लोकं आपली माहिती लवपतात. पूर्ण माहिती देत नाहीत. त्यांना माझं आवाहन आहे. डॉक्टर तुम्हाला बरं करण्यासाठी आहेत. त्यांना योग्य माहिती दिली नाही तर, नुकसान तुमचंच आहे हे विसरू नका.

फोटो स्रोत, PArmeshwar munde
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 500वर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांचा भार प्रामुख्याने कस्तुरबा रुग्णालयावर पडतोय. पण, अशा परिस्थितीतही डॉक्टर, नर्स, कर्मचारी डगमगून गेले नाहीयेत हे डॉ. परमेश्वर सांगण्यास विसरत नाहीत.
"रुग्णालयातील प्रत्येकाला, डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांपर्यंत आपली जबाबदारी माहितेय. आपण कोणाशी लढतोय याची जाणीव आहे. त्यामुळे सर्वच आपला जीव तोडून रूग्णसेवा करतायत. भीती वाटतेच..पण, आत्मविश्वास आम्हाला डगमगू देत नाही. शत्रूला घाबरून चालणार नाही, त्याचा मुकाबला करायलाच हवा अशी सर्वांची भावना आहे. आणि त्यासाठी आम्ही एक सैनिक म्हणून काम करतोय."
रुग्ण डॉक्टरांकडे आशेच्या नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी आम्ही सर्वस्व आहोत..त्यांच्या विश्वासाला तडाजाऊ द्यायचा नाही, ही सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांची भावना आहे. रुग्ण बरा होऊन घरी निघाला की, अंगात हत्तीचं बळ संचारतं. अंगातला थकवा, टेन्शन सर्व पळून जातं आणि पुन्हा काम करण्यास नवी उर्जा मिळते, असंही डॉ. परमेश्वर आवर्जून सांगतात.
तुम्ही मुंबईत एकटे राहता, पण, घरच्यांना टेन्शन येतं का? यावर डॉ. मुंडे म्हणतात, मी कोरोना वॉर्डमध्ये काम करतो हे कळताच आई प्रचंड घाबरली. तू गावी परत ये..जाऊ दे ड्यूटी..असा तगादा लावला. पण, मी काळजी घेतो, तू नको काळजी करू असं तिला समजावून सांगितलं.
मी डॉक्टरकी सोडली, तेव्हा परत ये..डॉक्टरकी सोडू नको..असं म्हणत मागे लागले. आता, म्हणतात, हे काम सोडून दे..घरी ये. पण, मी माझं ध्येय निश्चित केलंय. आता परतणार नाही. मला प्रकृतीने या कामासाठी निवडलं. आता, मागे वळणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























