कोरोना व्हायरस : कोव्हिड-19च्या मृतांवर अंत्यसंस्कार कसे करावेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असतानाच मुंबई महापालिकेने कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असेल तर दफन (मृतदेह पुरणं) न करता दहन (म्हणजे अग्नी देणं) करावं, असं परिपत्रक काढलं होतं.
त्यामुळे कोरोनाच्या संकटाला धार्मिक वादाचं वळण मिळालं. त्यानंतर लगोलग हे परिपत्रक मागे घेण्यात आलं आणि एक सुधारित परिपत्रक काढण्यात आलं.
या सर्व घडामोंडीमुळे कोव्हिड-19ने एखादी व्यक्ती दगावली तर त्यावर अंत्यसंस्कार नेमके कसे करावे? मृतदेहाला दफन केल्यामुळे हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे का? किंवा दहन केल्यामुळेच हा व्हायरस पुर्णपणे नष्ट होतो का? इतर देशांत कोरोनाग्रस्त मृतांवर कसे अंत्यसंस्कार केले जात आहेत? किंवा त्याची कोणती मार्गदर्शक तत्त्वं आहेत तसंच याबाबत जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) ने काही नियम दिले आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.
मूळ वादाचं कारण काय?
कोव्हिड-19 मुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्यावरील अंत्यसंस्कारासाठी सोमवारी मुंबई महापालिकेनं कठोर नियमावली तयार केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढलेल्या परिपत्रकात पुढील मुद्द्यांचा समावेश होता.
- मृतहेद कोणत्याही धर्माचा असेल तरी तो दफन (मृतदेह पुरणे) न करता दहन (म्हणजे अग्नी देण्यात यावा) करण्यात यावा. जर मृताच्या नातेवाईकाने दफन करण्याची मागणी केली तर त्याला मुंबई शहराच्या बाहेर जाऊन कोव्हिड-19 च्या नियमांचं पालन करावं लागेल.
- अंत्यसंस्कारावेळी 5 पेक्षा अधिक लोक जण उपस्थित राहू शकणार नाहीत.
या परिपत्रकानंतर मुंबई महापालिकेवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या नियमावलीवर आक्षेप घेतला.
परिपत्रकावरून निर्माण झालेल्या वादानंतर लगेचच मुंबई महापालिकेने हे परिपत्रक मागे घेऊन सुधारित परिपत्रक जारी केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या सुधारित परिपत्रकातून मृतदेह फक्त दहन करण्याचा नियम काढण्यात आला, त्याऐवजी कोरोनाग्रस्त मृतदेहाचं दफन आकाराने मोठ्या असलेल्या स्मशानभूमीत करावं जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आजूबाजूच्या परिसरात होणार नाही.
'कोणीही याबाबत स्वत:ची नियमावली बनवू नये'
परिपत्रकाच्या वादाबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सध्या संपूर्ण जग हे जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO)च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतंय. त्यांनी कोरोनाग्रस्त मृतांचं फक्त दहन करा, असं कुठेही म्हटलेलं नाही.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

"मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढलेल्या परिपत्रकाबाबत मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी हे अनावधनाने घडलं असून हे परिपत्रक मागे घेत असल्याचं सांगितलं. संपूर्ण जगात कोरोनाग्रस्त मृतांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे कोणीही याबाबत स्वत:ची नियमावली बनवू नये जेणेकरून लोकांमध्ये भीती पसरेल."
या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळताच या बातमीत अपडेट केली जाईल.
WHOची नियमावली काय सांगते?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तयार केलेल्या नियमावलीमध्ये कोरोनाग्रस्त मृतदेहांना दहन करावं किंवा दफन करू नये असं कुठेही म्हटलेले नाही. जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाग्रस्त मृतांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना खालील मुद्दे नमूद केले आहेत
- अंत्यसंस्कारावेळी लोकांनी गर्दी करू नये.
- कोरोनाग्रस्त मृतदेहावर शक्य तितक्या लवकर अंत्यसंस्कार करावेत.
- मृतदेह कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या धर्मानुसार दहन किंवा दफन करावा.
- मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना रुग्णालयातील स्वयंसेवकांची मदत घ्यावी.
- रूग्णालयात कोरोनाग्रस्त मृतदेहावर नातेवाईक किंवा मित्रांकडून दावा केला गेला नाही तर तो मृतदेह दहन करण्यात यावा.
- दहन करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. इलेक्ट्रिक दहन करणं सोईचे आहे.
मृतदेहाचं दफन केल्याने व्हायरस पसरतो का?
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे सांगतात, "दफन केल्यामुळे हा व्हायरस पसरत असल्याची नोंद वैद्यकीयदृष्टया अजूनतरी कुठेही दिसत नाही, पण मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संस्थेबरोबरच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत. त्याचं सर्व ठिकाणी पालन केलं जात आहे."

फोटो स्रोत, Reuters
केंद्र सरकारच्या सूचना काय आहेत?
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा व्हायरस कितीवेळ शरीरात राहतो याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त मृतदेह हा एका बॉडी बॅगमध्ये म्हणजे एका विशिष्ट कव्हरमध्ये गुंडाळलेला असावा. केंद्र सरकारच्या इतर सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
- नातेवाईकांनी त्या मृतदेहाला पाहताना लांबून पाहावं. त्या मृतदेहाला मिठी मारू नये किंवा त्याच्या फार जवळ जाऊ नये.
- मृतदेहाचं शवविच्छेदन करणं शक्यतो टाळावं. जर शवविच्छेदन करणं गरजेचं असल्यास कठोर प्रतिबंधक पध्दतीचा अवलंब करायला हवा.
- विशिष्ट धर्माच्या पध्दतीनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येतील, पण शरीराला स्पर्श होईल उदा. मृतदेहावर पवित्र पाणी शिंपडणं, आंघोळ घालणं असे अनावश्यक विधी करू नयेत.
याशिवाय शवगृहातील कर्मचार्यांनीही विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं या नियमावलीत सांगण्यात आलं आहे.
इतर देशात काय परिस्थिती आहे?
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसबाबत आपात्कालीन विधेयक मंजूर होऊन सरकारला विशेष अधिकार मिळालेत. ब्रिटिश प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या काही बातम्यांमध्ये सरकारकडून मृतदेहाची विल्हेवाट कोणत्या पध्दतीने करावी, याबाबत शक्य तितक्या वैयक्तिक निवडीचा आदर केला जाईल असा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र जिथे पर्याय नाही तिथे शरीर दहन किंवा दफन केले जाईल. हे निर्देशित करण्यासाठी सरकार विशेष अधिकार वापरू शकेल. या एकूणच प्रकाराबाबत ब्रिटनमधील मुस्लीम आणि ज्यू धर्माचे लोक चिंतेत आहेत.
यावर ब्रिटनच्या ज्यू संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे व्हॅन डर झिल यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना धार्मिक भावनांचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
तसंच ब्रिटन मुस्लीम काऊंसिलने सरकार यावर धार्मिक भावना लक्षात घेऊन योग्य पर्याय काढेल अशी आशा व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, JILLA DASTMALCHI
European Centre for Disease Prevention and Control ने ही यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार स्थानिक संस्कृती, धर्म या गोष्टी लक्षात घेण्यात याव्यात. तसंच तिथल्या सामाजिक नेत्यांशी चर्चा करावी. मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं. तसंच या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासन आणि सामाजिक नेत्यांमध्ये सलोखा असावा.
कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जगभरात कोव्हिड-19चे 7.5 लाखांहून अधिक रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 37600 मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. भारतात आतापर्यंत 1200 हून अधिक कोरोना रूग्ण आहेत. तर यामध्ये 32 जणांचा मृत्यू झालाय. यापैकी महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा 10 वर पोहोचला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























