कोरोना व्हायरस: 'देवालयं बंद, न्यायालयं बंद... आता माणसाला आधार माणसाचा, तोही लांबूनच' -ब्लॉग

अमरधाम
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नाशिकहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"देवालयं बंद, न्यायालयं बंद... आता माणसाला आधार माणसाचा, तोही लांबूनच..." गंगाघाटावर उभे होते, तेव्हा एका पोलीस दादांनी म्हटलेलं हे वाक्य.

सगळी मंदिरं बंद आहेत, दिसतच होतं. त्याच्याआधी मेहेर सिग्नलला वळताना न्यायालय बंद, हे याची देही याची डोळा पाहूनच पुढे निघाले होते.

कपालेश्वराच्या पायऱ्या रिकाम्या होत्या, रामकुंडाच्या अलीकडे असणारी दिवे, धूप, गंडे आणि मूर्ती विकणारी दुकानं बंद होती. रामकुंडावर नेहमीसारखी गर्दी नव्हती, ना दहाव्याची ना बाराव्याची.

आपण बरे आणि आपला देव बरा, असा एकंदर स्वभाव असल्याने मंदिरात वगैरे जाऊन 'पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन' करण्याचा योग कधी आलाच नाही. पण रिकामा घाट बघण्याची सवय कधीच नव्हती.

गोदाघाट म्हटलं की शेंदूर फासलेल्या देवांसमोर नैवेद्य असतो आणि गर्दी असते... आज एक रिकामा ब्रेडचा पुडा फडफडत होता फक्त.

कोरोना
लाईन

दुपारच्या उन्हात पूर्ण परिसर रिकामा पडला होता. समोरच्या म्हशी कुंडात (कुंड कसलं! गटारच झालीये ती) काही पोरं मासे पकडायचा प्रयत्न करत होती. त्यांना ना क्वारंटाईनची भीती होती ना संसर्गाची. पोटाची खळगी भरायला धपाधप गटारीत उड्या मारत होती. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण सुरक्षित अंतर ठेवून. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याइतकी मी प्रिव्हिलेज्ड (सजग नाही) होते, त्यांना अर्थात वेळ नव्हता.

बंदोबस्त

एकाने सांगितलं, घाट ओस पडलाय, त्यांना भीक द्यायला कोणी नाही, उरलं सुरलं अन्न द्यायला कोणी नाही आणि पूर्वजांच्या नावाने जेऊ घालणारही कोणी नाही. मग काय करणार. ही पोरं तिथेच राहातात, रस्त्यावर. काही आसपासच्या झोपड्यांमध्ये. घाटावर अनेक बेघर लोक राहातात. तिथेच खातात, तिथेच झोपतात. त्यांना ना कुठलं गाव ना कुठलं घर.

शहरांमध्ये स्वतःला आयसोलेट करून बसलेले आणि गावाकडल्या घराकडे जायचं म्हणून 1,000 किलोमीटरचं अंतर चालत निघालेल्या दोघांच्या मध्ये हे कोणतंही घर नसलेले काय करत असतील? घाट रिकामा दिसला, सकाळीच पत्रकार मित्राने बातमी टाकली होती, गोदाघाटावरच्या सगळ्या बेघरांना महानगरपालिकेने गाडगेबाबा धर्मशाळेत हलवलं म्हणून.

बाकी कुठे लोक असो नसो, दोन ठिकाणी असणार म्हणजे असणार - एक सिव्हिलचा मॅटर्निटी वॉर्ड आणि दुसरं अमरधामचं स्मशान. म्हणून तिथे बाहेर बंदोबस्तही होता. अमरधामच्या पुलावर बॅरिकेड्स टाकले होते. दोन स्मशानं आहेत तिथे. प्रेताला घेऊन जाताना नदी ओलांडायची नसते म्हणून. या पल्याड मेला तर इथे अग्नी, त्या पल्याड मेला तर तिथे. एक स्मशान लॉकडाऊन आहे आता.

"आता कसले नियम आणि कसलं काय, कोणीही मेलं तरी इथेच आणतात," बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी सांगितलं.

सचिन रिपोटे आणि सहकारी

फोटो स्रोत, BBC/Anagha Pathak

फोटो कॅप्शन, सचिन रिपोटे आणि सहकारी

चार पाच जण असतील तिथे बंदोबस्ताला. 2-3 पोलीस आणि 1-2 दोन स्वयंसेवक. तिथेच भेटले सचिन रिपोटे. ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहेत ते. गेले दोन दिवस त्यांची अमरधामच्या बाहेर ड्युटी आहे. लोक पाळतात का लॉकडाउन आता तरी, विचारल्यावर ते म्हणे, "हो लोकांना आता थोडाफार सिरीयसनेस आलाय."

एका साईडला माझ्याशी बोलताना त्यांचं काम सतत चाललं होतं, याला पास विचार, त्याला बंद आहे सांग, येणाऱ्या प्रत्येकाला सांग... अरे बाबा मास्क घाल, घरी जा. बाहेर पडू नको. तुम्हाला टेन्शन नाही येत काहो? मी विचारलं. "काहीही झालं तरी आम्ही पोलीसच फ्रंटवर असतो. गणपती, नवरात्रीपासून, दंगली, निवडणुका, कोरोनो... We are the first line of civil defence."

यावेळेस आपला शत्रू कुठे दबा धरून बसलाय हे अजिबात माहीत नसल्याचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कसा असतो तुमचा दिवस? मी विचारलं.

"आता 12 तासांच्या ऐवजी 8 तासांची ड्युटी आहे. शक्य तेवढी काळजी घेतो, पण मनात भीती आहेच. घरी गेल्यावर हात स्वच्छ धुतो, आंघोळ करतो. मुलं नाराज आहेत माझी सध्या. पपा आमच्याशी खेळत का नाही विचारतात. त्यांना जवळ घेत नाही मी आजकाल फारसं, इन्फेक्शनची भीती आहे. त्यांना कसं समजावून सांगू?" तिशीच्या आतबाहेर वय असेलेल रिपोटे विचारतात.

सोशल मीडियावर तुम्हीही पाहिले असतील ते व्हीडिओ... कर्फ्यू मोडणाऱ्यांना पोलीस काठ्यांनी मारत आहेत इथपासून ते रस्त्यावरच्या तहानलेल्या लोकांना पाणी आणि भुकेलेल्यांना घासातला घास काढून देणारे पोलीस.

त्या दोन्हींच्या अधलंमधलं, आपल्या अवतीभोवतीचं वास्तव आहे हे. अनेक पोरांचे मायबाप रस्त्यावर आहेत. अनेकांच्या मायबापांच्या आणि पोरांच्या संरक्षणासाठी.

घाटावर तुरळक भाजीवाल्या होत्या. त्यातल्याच एक रेखा पवार.

चार दिवसांपासून त्यांनी आणलेला माल पडून आहे. रोज येऊन बसतात, पण आता गिऱ्हाईक नाही म्हणतात. त्या विधवा आहेत. घरात आई आणि मनोरुग्ण भाऊ.

रेखा पवार

"आता सरकारकडून थोडी मदत मिळणार आहे असं म्हणतात, पण काय माहिती," त्या सांगतात. तेवढ्यात समोर येऊन एक चिमुरडी थाळी पसरते. आपल्याच टोपलीतली चारदोन वांगी, दोडकी त्या तिच्या थाळीत टाकतात.

मागे उभे असलेले बंदोबस्ताचे पोलीस दोघींना सांगतात, "ए ताई, तू बांध ना तोंडाला काहीतरी. उन्हाची नको फिरू बाहेर."

नंतर कोणीच काही बोलत नाही. फक्त वाऱ्याचा आवाज येत राहातो. तेवढ्यात मला कळतं की हायवेवर अनेक माणसं आहेत. मी तिथे पोहोचते. मुंबई-आग्रा हायवेवर लोकांचे जत्थे सामानसुमान डोक्यावर लादून चालत जात असतात.

गावाकडे निघालेले मजूर

फोटो स्रोत, Pravin Thakare

फोटो कॅप्शन, गावाकडे निघालेले मजूर

अत्यावश्यक सेवांसाठी एक रेल्वे मुंबईहून दिल्लीला जाणारी ट्रेन इगतपुरीपाशी थांबवलेली असते. त्यातून प्रवास करणारे काही शेतमजूर निघतात. इगतपुरी स्थानकावर त्यांना उतरवलं जातं. मुंबईला परत पाठवण्याचे आदेश निघतात, पण ते लोक मात्र आग्रा हायवे पकडून चालायला सुरुवात करतात.

माझे सहकारी प्रवीण ठाकरे त्यांच्याशी बोलले. सगळ्यांची एकच कहाणी. 'मुंबईत रोजंदारीवर काम करतो, आता शेठ फोन उचलत नाही, खायला काही नाही, खिशात पैसा नाही. अशा परिस्थितीत कुठे जाणार?'

ओस पडलेले रस्ते

आग्रा हायवे मोकळाच असतो. लांबवरून लोक चालत चालत जाताना दिसतात. तिथपर्यंत गेल्यानंतर गायब झालेले असतात, एखादा ट्रक आला असेल आणि त्यानी लिफ्ट दिलेली असेल कदाचित.

ती माणसं जिथे उभी होती, तिथे फक्त पाण्याच्या दोन भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसतात. त्या पूर्ण भरलेल्या बाटल्यांचं रहस्य मला समजत नाही. कोणाला जड झाल्या असाव्यात या दोन बाटल्या? की पुढे 1,000 किलोमीटरच्या प्रवासात तहान लागणार नाही वाटलं? की मागून येणाऱ्या तहानलेल्यांना मिळावं म्हणून ठेवल्या? मला तिसराच पर्याय खरा मानावासा वाटतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)