कोरोना व्हायरसः मुंबईकरांचा डबाही बंद होणार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"डबेवाल्यांना तर लोकलशिवाय पर्यायच नाही. कोरोनामुळे लोकलमधून फिरताना मला फार भीती वाटायची. मात्र मजबूरी असल्यामुळे आम्हाला हे काम करावंच लागतं. एक जरी ग्राहक कमी झाला तरी आमचं 1000 रुपयांचं नुकसान होतं." अनेक मुंबईकरांना जेवणाचा डबा पोहोचवणारे रोहिदास सावंत बोलत होते.
24 तास धावणाऱ्या मुंबईत मुंबईकरांना घरचं जेवण पोहोचवणारा मुंबईचा डबेवाल्यानेही कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. सरकारच्या आदेशानुसार आधीच सर्व शाळा-महाविद्यालयं बंद आहेत.
अनेक लोकांनी घरून काम करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय डबेवाल्यांच्या आरोग्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून डबेवाल्यांच्या युनियननेही 31 मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या सेवेवर काय परिणाम होणार याविषयी बीबीसी मराठीने मुंबईच्या काही डबेवाल्यांशी संवाद साधला.
पुण्यातील राजगुरू नगर इथे राहणारे रोहिदास सावंत हे मुंबईत 15 वर्षांपासून डबेवाल्याचं काम करतात. वयाच्या 16 व्या वर्षी ते मुंबईत रोजगारासाठी आले होते. त्यांचे काही मित्र मुंबईत डबेवाल्याचं काम करतात. त्यांच्याबरोबर रोहिदासही डबेवाल्याचं काम करू लागले.
त्यांच्या कामाचं वर्णन करताना रोहिदास सांगतात, "मी चर्चगेट ते अंधेरी या मार्गावर डबे पोहोचवण्याचं काम करतो. आमचा 30 डबेवाल्यांचा ग्रुप आहे. आमचा ग्रुप दररोज जवळपास 5000 डबे पोहोचवतो. माझा दिवस सकाळी 8.30 ला सुरू होतो आणि संध्याकाळी 5.30 ला संपतो. यातून महिन्याला मला 14-15 हजार पगार मिळतो."

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

पुण्याच्या खेड तालुक्यात राहणारा शंकर सावंत हा तरुणसुधद्धा मागील 7 वर्षांपासून डबे पोहोचवण्याचं काम करतो. शंकरने त्याच्या 6 मित्रांसोबत घाटकोपरला रहायला भाड्याने खोली घेतली आहे. त्याला दररोज घाटकोपर ते लोअर परेल असा लोकलने प्रवास करावा लागतो.
शंकर सांगतो, "आम्ही लोअर परेलला आम्ही सर्व जण जमतो आणि तिथे आपापले डबे घेऊन निघून जातो. कोणी दादरला जातं, कोणी चर्चगेटला जातं तर कोणी अंधेरीला जातं. माझ्याकडे साधारण 15-30 डबे असतात."
याबद्दल शंकर म्हणला की, "कोरोनामुळे आता लोकलने फिरताना भीती वाटायला लागली. लोकलमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे कोणाला काय आजार असेल याचं काही सांगता येत नाही. मात्र आमचं काम आम्ही बंद ठेवू शकत नाही. सर्वच ऑफिसेस बंद झाली तरच आम्ही आमचं काम बंद करू शकतो."
कोरोना मुंबईत पसरतोय त्यामुळे सरकारने तसेच आरोग्य विभागाने अनेक बचावात्मक उपाय सांगितले आहेत. मात्र डबेवाल्यांना ते पाळणं शक्य होतं का? याबद्दल सावंत सांगतात, "ज्यावेळी आम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये जातो, किंवा गर्दीत जातो तेव्हा तोंडाला रुमाल लावून जातो. आम्ही ग्राहकांच्या घरी डबा घ्यायला जाताना आम्ही पाण्याने हात साफ करतो. मात्र साबणाने हात धुण्याचा काही विषयच नाही, कारण आमचं कामच असं आहे. साबण सतत सोबत ठेवणं जमत नाही. आम्ही सायकलवर फिरत असल्याने जास्त काळजी घेणं काही शक्य होत नाही."

याबद्दल शंकर सांगतो की, "आम्ही जेव्हा प्रत्येक सोसायटीमध्ये जातो तेव्हा तिथे आम्हाला हात साबणाने धुवूनच आत प्रवेश दिला जातो. शिवाय आम्ही नेहमी मास्क वापरतो. सरकारने जेवढे खबरदारीचे उपाय सांगितलेत ते सर्व आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो. फक्त तेवढी गर्दी मात्र टाळता येत नाही."
एकीकडे खबरदारीचा उपाय म्हणून ही सेवा बंद ठेवण्यात जरी आली तरी त्यांच्या रोजच्या जेवणाचं काय हा प्रश्न डबेवाल्यांसमोर उभा राहिलाय.
रोहित याबद्दल सांगतात, "आता काम बंद झालंय. आम्हाला आता घरातच रहावं लागणार. कारण शिक्षण अर्ध्यातच सोडल्याने आम्ही दुसरं काही करूही शकत नाही आणि गावालासुद्धा जाऊ शकत नाही. तिकडे जावं म्हटलं तर मग पहिले दवाखान्यात जा, तपासणी करा असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. तसंच सरपंचाकडे सर्व माहिती द्यावी लागते. त्यामुळे आम्ही इथेच राहतोय."
याबद्दल शंकर सांगतो, "आमची युनियन आहे. आमची युनियन जो निर्णय घईल तो आम्हाला मान्य आहे. आणि पगाराबद्दल बोलायचं झालं तर, कोणी आम्हाला पैसे देतं, तर कोणी नाही देत. सगळे काही सारखे नसतात. काही लोक अजूनही कामावर जातात. पण त्यांना आम्ही सांगितलंय की, आमची सेवा 31 तारखेपर्यंत बंद आहे. आता काम बंद आहे तर आमच्यातील अनेक जण गावाला जाणार आहे. आता हे दहा दिवस फक्त आराम करायचाय"
या बंदविषयी आम्ही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्याशी संवाद साधला. तळेकर म्हणाले, "मुंबईच्या चर्चगेट ते विरार, सीएसएमटी ते कल्याण व वाशी या मार्गावर दररोज साधारण साडेचार ते पाच हजार डबेवाले डबे पोहोचवण्याचं काम करतात. ते दररोज साधारण दोन लाख डबे पोहोचवतात.
कोरोना व्हायरसचा परिणाम मुंबईत आधीच झाला आहे. त्यामुळे शाळा आधीच बंद झाल्या होत्या. तसेच काही कार्यालयही बंद होती तर काही कार्यालयही घरुन काम करा असं सांगताहेत. त्यामुळे त्यांचे डबे असेही बंद होते. तरीही डबेवाला मास्क लावून आवश्यक ती काळजी घेऊन काम करत होता. मात्र सरकारने आवाहन केलं आहे की, गर्दीची ठिकाणं टाळा, त्यामुळे डबेवाल्यांच्या आरोग्याची काळजी पाहता आम्ही 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवत आहे."
कोव्हिड-19 आजारामुळे सर्व देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात स्वच्छ करा, गर्दी टाळा, अनावश्यक प्रवास करू नका असा सल्ला सरकार आणि आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























