कोरोना व्हायरस : कॅब, बस, ट्रेनमधून प्रवास टाळला तर संसर्गापासून बचाव होईल?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाचा प्रभाव वाढत असताना ट्रेन, बसेस, मेट्रो, शेअरिंग कॅबसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करायचा का? तिथल्या गर्दीमुळं कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
हे प्रश्न केवळ भारतापुरतेच मर्यादित नाहीयेत. जगभरात कोरोनामुळे 4600 जणांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडेच सार्वजनिक वाहतुकीबद्दल संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळेच बीबीसी जगभरातील तज्ज्ञांशी संवाद साधत या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 90 हून अधिक आहे तर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 26 वर गेल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कॅबमधून प्रवास करणं किती सुरक्षित?
कोरोना व्हायरसवर आतापर्यंत जेवढं संशोधन झालंय त्यातून हा विषाणू नेमका कसा पसरतो हे स्पष्ट झालं नाहीये. मात्र कोरोनासदृश व्हायरसच्या अभ्यासातून ही गोष्ट समजलीये, की विषाणूबाधित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकण्यातून जे कण हवेत पसरतात त्यामुळे व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं.
अनेकदा शिंकण्याचे-खोकल्याचे शिंतोडे कॅबचे हँडल, रेल्वे-बसच्या सीटचा दांडा अशा गोष्टींवर उडू शकतात. जर तुम्ही या गोष्टींना हात लावला, तर तुम्हालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कारण आपण आपल्याही न कळत वारंवार आपल्या चेहऱ्याला हात लावत असतो आणि त्यामुळेच या विषाणूचा प्रादूर्भाव होऊ शकतो.



बीबीसी प्रतिनिधी फर्नान्डो दुआर्ते यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की तज्ज्ञ अजूनही कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनवर संशोधन करत आहेत.
कोरोना व्हायरस एखाद्या ठिकाणी नऊ दिवसांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो, असं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळेच मास्क घालण्याचा तसंच वारंवार हात धोण्याचा सल्ला दिला जातोय. जेणेकरून हात चेहऱ्याला लावल्यामुळे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
ट्रेन किंवा बसमधून प्रवास करणं किती सुरक्षित?
बीबीसी प्रतिनिधी राचेल स्केरर यांनी आपल्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
स्केरर यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की कोरोना व्हायरस ताप पसरविणाऱ्या अन्य विषाणूंप्रमाणे हवेमध्ये रेंगाळत नाहीत. तुम्ही जर एखाद्या विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तर तुम्हालाही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहणं म्हणजे विषाणूबाधित व्यक्तीजवळ दोन मीटर अंतरापर्यंत 15 मिनिटांपर्यंत थांबणं.
त्यामुळे ट्रेन आणि बसमध्ये प्रवास करून कोरोनाचा संसर्ग होईल की नाही हे तुम्ही प्रवास करत असलेली बस आणि ट्रेन किती भरली आहे, यावर अवलंबून असेल.
उदाहरणार्थ लंडनच्या अंडरग्राउंड ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अनेकांना श्वसनासंबंधीच्या तक्रारी अधिक प्रमाणात भेडसावताना दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थशी संबंधित असलेल्या डॉ. लारा गोस्के सांगतात, "जे लोक रोज मेट्रोतून प्रवास करतात, त्यांच्यामध्ये फ्लूसारख्या आजारांची लक्षणं तुलनेनं अधिक प्रमाणात दिसून येतात.
त्यांनी म्हटलं, "ज्या भागांमध्ये कमी ट्रेन पोहोचतात आणि जिथे प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना वारंवार लाइन बदलावी लागते, तिथे फ्लूसारखे आजार वेगानं पसरताना दिसतात. मात्र ज्या भागात एकच थेट ट्रेन जाते, तिथं विषाणूजन्य आजारांचा प्रभाव तुलनेनं कमी होताना दिसतो."
डॉ. गोस्के या विषाणू प्रादूर्भावापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल सांगताना म्हणतात, "ज्या लोकांना विषाणूसंसर्ग झालाय असा संशय असेल त्यांच्यापासून लांब राहणंच चांगलं. त्याचबरोबर ज्या गोष्टींमुळे विषाणू संसर्ग होऊ शकतो, त्यापासूनही लांबच राहायला हवं. प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर गर्दीच्या वेळा टाळणं केव्हाही चांगलं. शिवाय तुम्हाला थेट घरापर्यंत पोहोचवणाऱ्याच बस, ट्रेनलाच प्राधान्य द्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























