अमित शाह : दिल्लीमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग

अमित शहा, दिल्ली हिंसाचार

फोटो स्रोत, Loksabha TV

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्लीत झालेली दंगल हा सुनियोजित कटाचा भाग होता. दिल्ली पोलिसांनी दंगलीचा फटका संपूर्ण शहराला बसू नये याची काळजी घेतली. हिंसाचारात दोषींची गय केली जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारासंदर्भात लोकसभेत बोलताना सांगितलं.

अमित शाह यांनी म्हटलं, "ज्या पद्धतीने या घटनांची मांडणी केली जात आहे, त्यातलं सत्य लोकांसमोर यावं. 25 तारखेच्या रात्री 11 नंतर हिंसाचाराची एकही घटना नाही. पोलिसांना तपासणीसाठी वेळ लागतो. त्यांना वेळ देणं आवश्यक आहे."

"25 फेब्रुवारीला रात्री अकरानंतर हिंसाचाराच्या घटना नाही. दिल्ली पोलिसांनी दंगली चार टक्के भागापुरत्या मर्यादित ठेवल्या. दिल्ली पोलिसांनी दंगलीचा भडका 13 टक्के लोकसंख्येपुरता मर्यादित ठेवला. दिल्ली पोलिसांनी चांगलं काम केलं आहे. दंगलीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर 36 तासात नियंत्रण मिळवण्यात आलं. दंगल ज्या भागात झाली तिथे दिल्लीतली 20 टक्के लोकसंख्या राहते. 12 पोलीस ठाण्यांमध्ये हिंसाचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारतात असताना दिल्लीत दंगल झाली. त्यावेळी अमित शाह यांनी दंगलग्रस्त भागांना भेटही दिली नाही, असा आरोप शाह यांच्यावर करण्यात आला.

या आरोपाला उत्तर देताना अमित शाह यांनी म्हटलं, "ट्रंप यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. माझ्या लोकसभा मतदारसंघात तो कार्यक्रम होता. मी तिथे असणं अपेक्षित होतं. दिल्लीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ट्रंप यांच्यासंदर्भातील कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी झालो नाही. हिंसाचाराचा फटका बसलेल्या परिसरात जाऊन पाहणी करण्याची विनंती अजित डोभाल यांना केली होती. मी तिथे गेलो असतो तर पोलिसांचा ताफाही आला असता. त्यामुळे लोकांना त्रास झाला असता".

'300 हून अधिक लोक उत्तर प्रदेशहून आले'

त्यांनी पुढे म्हटलं, "जिथे दंगली झाल्या तिथली भौगोलिक परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. प्रचंड लोकसंख्येचा असा हा भाग आहे. देशातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागांपैकी हा प्रदेश आहे. छोट्या छोट्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे पोलीस तसंच अॅम्ब्युलन्स पोहोचणंही अवघड आहे. दिल्ली पोलिसांनी 700हून अधिक एफआयआर दाखल केले आहेत. 2647 लोकांना अटक करण्यात आली आहे. फोन कॉल्सचे तपशील मिळवले जात आहेत. दंगलीसंदर्भात जे फुटेज उपलब्ध आहे किंवा व्हीडिओ उपलब्ध आहेत ते लोकांकडून मागवलं जात आहे. 1100हून अधिक लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. तीनशेहून अधिक माणसं उत्तर प्रदेशातून आली होती".

अमित शहा, दिल्ली हिंसाचार

फोटो स्रोत, Loksabha

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

"या दंगली एक मोठं षड्यंत्र होत्या. हे लक्षात येताच आम्ही दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डर सील केली. दिल्लीतल्या दंगली घडवून आणणाऱ्या लोकांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सगळी तपास यंत्रणा शास्त्रोक्त पद्धतीने राबवण्यात येत आहे. पोलिसांनी शंभरहून अधिक शस्त्रं जप्त केली आहेत. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आली आहेत. कोणत्याही दोषींची गय केली जाणार नाही. हे माझं आश्वासन आहे."

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हवालाच्या माध्यमातून दिल्लीत किती पैसा आला याची माहिती घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

"हिंसाचारासाठी पैसा पुरवणाऱ्या तीन लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. सगळ्या बैठकांमध्ये मी स्वत: हजर होतो. प्रत्येक गुन्ह्याची काळजीपूर्वक सत्यासत्यता तपासली जात आहे," असं अमित शाहांनी म्हटलं.

अल्पसंख्याकांची दिशाभूल झाल्यानं हिंसाचार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध पसरवण्यात आलेली माहिती या हिंसाचारासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगत अल्पसंख्यांची दिशाभूल केली जात आहे असं त्यांनी म्हटलं.

दंगलीसाठी वातावरण तयार करण्यात आलं याचा दाखला देताना अमित शाहांनी म्हटलं, "रामलीला मैदानात 14 डिसेंबरला एका पक्षाने रॅली आयोजित केली होती. घरातून बाहेर पडा, असा नारा तिथे देण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे शाहीन बाग इथं आंदोलन सुरू झालं. वारिस पठाण यांनी 15 कोटी भारतीयांसंदर्भातील वक्तव्य केलं. या सगळ्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं. ज्या खात्यातून हिंसाचारासाठी पैसा पुरवण्यात आला अशी 60 बँक खाती शोधण्यात आली आहेत. ज्यांनी ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्यांना अटक केली जात आहे. न्यायालयाच्या उपस्थितीत त्यांच्याकडून वसुली करून घेण्यात येईल. कोणालाही मोकळं सोडू दिलं जाणार नाही".

दिल्ली हिंसाचारासंदर्भात आकडेवारी त्यांनी सदनासमोर मांडली. दिल्लीतील हिंसाचारात 52 जणांचा मृत्यू झाला. 526 जण जखमी झाले. 142 भारतीयांची घरं जाळण्यात आली.

"मंदिर आणि मशीद- दोन्हीही जळणं दुख:दच आहे. अन्य राजकीय पक्षांनीही असाच विचार करणं आवश्यक आहे. मंदिर-मशीद अशी विभागणी करू नये. दिल्ली दंगली हे सुनियोजित कारस्थान होतं. तपासातून आणखी गोष्टी समोर येतील."

दोषींवर काय कारवाई- काँग्रेसचा सवाल

"होळीचा सण झाला पण दिल्लीत झालेली रक्ताची होळी आपण मागे सोडू शकत नाही," असं काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.

"संपूर्ण देश अस्वस्थ आहे. हे नक्की कसं घडलं, सरकार दोषींवर काय कारवाई करत आहे असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत," असं त्यांनी म्हटलं.

अमित शहा, दिल्ली हिंसाचार

फोटो स्रोत, Loksabha

फोटो कॅप्शन, अधीर रंजन चौधरी

"सरकारने प्रयत्न केला असता तर हिंसाचार रोखता आला असता. दिल्ली देशाची राजधानी आहे. तीन दिवस हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत होत्या. बालाकोटमध्ये स्ट्राईक करू शकतात मग दिल्लीतला हिंसाचार का रोखू शकला नाहीत?" असा सवाल चौधरी यांनी केला.

"सरकारकडे NSA, RAW, दिल्ली क्राईम ब्राँच एवढं सगळं आहे. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राजधानी दिल्लीत असताना एवढा हिंसाचार कसा झाला? ही देशाची बदनामी नाही का? पन्नास तास एजन्सी बघत बसल्या होत्या. त्यांना वरून आदेश मिळाला नाही का?" असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं.

अमित शहा, दिल्ली हिंसाचार

फोटो स्रोत, Loksabha

फोटो कॅप्शन, असादुद्दीन ओवेसी

"दिलली हिंसाचार हा जातीय-धार्मिक दंगल नाही. हा सरकारच्या योजनेचा भाग आहे. लोकांनी जीव गमावले त्याबद्दल सरकारला दु:ख नाही. पोलिसांच्या क्रूरतेचे व्हीडिओ समोर आहेत. दिल्ली पोलीस खुलेआम लाच घेताना दिसत आहेत. या दंगलीची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही जीव देण्यास तयार आहोत. हिंदूबांधवांनी देशाला वाचवावं. दिल्ली हिंसाचारात शीख समुदायाने पीडितांनी मदत केली", असं एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)