कोरोना व्हायरस : मास्क आणि सॅनिटायझर अचानक गायब का झाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुरप्रीत सैनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतात बुधवारपर्यंत कोरोना व्हायरसचे 20 रुग्ण आढळले आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
जसजसं रुग्णांची संख्येत वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत, तसतसं लोक स्वत: च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मेडिकल दुकानावर धाव घेत आहेत. मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
सॅनिटायझरमुळे 99 टक्के विषाणू नष्ट होत असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळे लोकांचा सॅनिटायझर खरेदीकडे ओढा आहे.
तसंच मास्क लावून ऑफिस अथवा शाळेत गेल्यास संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो, असंही लोकांना वाटत आहे.
अचानक मागणीत वाढ
पण, आता अचानक मागणीत वाढ झाल्यामुळे मास्क आणि सॅनिटायरझर मिळण्यात लोकांना अडचण येत आहे. गेल्या 3 दिवसांपासून विक्रीत अचानक वाढ झाल्याचं दुकानदार सांगतात.
आता बऱ्याच मेडिकल दुकानांवर मास्क आणि सॅनिटायरझर मिळत नाहीये, जिथं कुठं मिळत आहेत तिथं त्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. बीबीसीनं नोएडा आणि दिल्लीतल्या अनेक मेडिकल दुकानांवर जाऊन पडताळणी केली तेव्हा लक्षात आलं की अनेक ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर संपुष्टात आले आहेत. जिथं शिल्लक आहेत, तिथं त्यांची किंमत 100 ते 500 रुपयांदरम्यान आहे.
अशोक कुमार नोएडामध्ये राहतात. त्यांच्या मते, नोएडामध्ये कुठेच मास्क मिळत नाहीये.

नोएडातल्या एका मेडिकल दुकानात एन - 95 मास्क मिळाला, पण त्यासाठी 499 रुपये मोजावे लागले. त्यांनी हाच मास्क आदल्या दिवशी 250 रुपयांत खरेदी केला होता.
जनता त्रस्त आहे आणि दुकानदार त्याचाच फायदा घेत आहे, असं कुमार यांना वाटतं.
परंतु मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या अमन यांनी मास्कची मागणी वाढल्यामुळे पुरवठा कमी झाल्याचं सांगितलं आहे. त्यांच्याजवळचा स्टॉक संपला आहे आणि पुरवठादारसुद्धा माल देत नाहीयेच. थोडा माल मिळाला परंतु त्याच्या किंमती वाढल्या.
अशोक कुमार यांनी खरेदी केलेल्या मास्कची किंमत 149 होती परंतु ती वाढून 299 रुपये झाली. आता कंपनीने त्याची किंमत वाढवून 499 केली आहे, असं ते सांगतात.

दिल्लीतल्या मयूरविहार परिसरातील अरोरा केमिस्टमध्ये काम करणाऱ्या एका माणसानं कंपनीतून येतानाच मास्कची किंमत 250 रुपये, 300 रुपये वर गेलेली आहे मग ते किती रुपयांना विकायचे तुम्हीच सांगा.
तर दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळच्या मेडिकल स्टोअरचे दिनेश गुप्ता म्हणतात, "मागणी वाढली की पुरवठा कमी होतोच. त्यामुळे किंमती थोड्य़ा वाढल्या आहेत. पण माल मिळतच नाहीये किंवा विचित्र दरामध्ये मिळतोय असं मात्र काही झालेलं नाही."
त्यांच्याजवळ सॅनिटायझर आणि मास्कचा पुरेसा साठा आहे, असं ते सांगतात.
त्यांच्या दुकानातून अनेक लोक मास्क आणि सॅनिटायझर घेऊन जात आहेत.
एका महिलेने त्यांच्या दुकानातून एकाचवेळेस 10 सॅनिटायझर आणि 10 मास्क खरेदी केले. मास्क आणि सॅनिटायझर कुठेच मिळत नसल्याचे तिनं सांगितलं. इथं मिळाले म्हणून इतके खरेदी केल्याचं तिनं सांगितले.
डॉक्टर काय सांगतात?
लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं मत नोएडामधील मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अनुराग भार्गव सांगतात. लोकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करु नये.
"फक्त लोकांनी सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, अगर जायची वेळ आली तर मास्क लावावा. घरी किंवा ऑफिसात मास्क लावायची गरज नाही. कोरोनाचा प्रसार झालेल्या देशातून आलेल्या लोकांशिवाय इतर देशामधून परतलेल्या लोकांना भेटताना मास्क लावायची गरज नाही."

डॉ. अनुराग म्हणतात, "खूप महागडे मास्क खरेदी करण्याची गरज नाही. ट्रिपल लेअरचे मास्क उपयोगी आहेत. सर्वांनी एन 95 मास्क खरेदी करण्याची गरज नाही. सॅनिटायझरपेक्षा डोळे, नाक, कान यांना स्पर्श करण्याआधी हात नीट धुवावेत."
ट्रिपल लेअर मास्क हे नेहमी वापरले जाणारे सर्जरी मास्क असतात. त्यांची किंमत 10 ते 20 रुपये इतकी असते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























