उद्धव ठाकरे सरकारला भाजप पाठिंबा देण्यास तयार: सुधीर मुनगंटीवार #5मोठ्याबातम्या

सुधीर मुनगंटीवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या वर्तमानपत्रातील आणि वेबसाईटवरील प्रमुख बातम्या

1. तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार - भाजप

मुस्लीम आरक्षणावरून महाविकास आघाडीत असलेल्या गोंधळानंतर भाजपनं शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढला तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं भाजप नेते सुधीर मुनटंगीवर यांनी म्हटलंय. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

"उद्धव ठाकरे यांची मुस्लीम आरक्षणांसदर्भातली भूमिका अगदी योग्य आहे. शिवसेना आणि भाजप युतीला विचारसरणीचा आधार होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढला तरी आम्ही या मुद्द्यासाठी सरकारला पाठिंबा देऊ," असे मुनगंटीवार म्हणालेत.

तर दुसरीकडे मध्यप्रदेशातल्या ऑपरेशन लोटसच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनी भाजपची तुलना कोरोना व्हायरसशी केली आहे. "भाजपचं वर्तन हे कोरोना व्हायरसपेक्षाही डेंजर असून त्याची दक्षता घेतलीच पाहिजे," असं चव्हाण यांनी म्हटलंय. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तात असं म्हटलं आहे.

2. 'उद्धव ठाकरेंनी अयोध्याऐवजी मक्केला जावं'

उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला काही साधूंनी विरोध केला आहे. तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव यांना आपण स्वतः डवणार असल्याचं म्हणत त्यांनी अयोध्येऐवजी मक्केला जावं असं त्यांनी म्हटलंय. लोकमतने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत रामभक्तांना धोका दिल्याचा आरोपही महंत परमहंस दास यांनी केला आहे.

याच महंत परमंस दास यांनी श्रीरामाचा जप केला तर कोरोना व्हायरस नष्ट होतो असा सुद्धा दावा केला आहे.

3. उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना चिमटा काढत आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं, असं म्हटलं.

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

लोकसत्तामध्ये आलेल्या वृत्तानुसार, "एक चांगलं झालं तुम्ही आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्षं असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा. आम्हालाही नेमक्या उणिवा काय राहिल्या आहेत हे कळेल," असं यावेळी ठाकरे म्हणाले.

4. दिल्ली हिंसाचारात एकता, बंधुभावाची राखरांगोळी - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीला बुधवारी भेट दिली. हिंसाचारात पेटवलेल्या गेलेल्या शाळेत राहुल गांधी गेले. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

राहूल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहूल गांधी

"इथे एकता आणि बंधुभावाची राखरांगोळी केली गेली," अशी टीका करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. हिंसेच्या राजकारणाने भारत मातेचे नुकसान झालं, असंही त्यांनी म्हटलंय.

5. निर्भयाच्या दोषींचे सर्व पर्याय संपले

निर्भया प्रकरणातील पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. टीव्ही 9 मराठीनं या संदर्भातली बातमी दिली आहे.

निर्भया प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार होती. मात्र पटियाला कोर्टाने 3 मार्च रोजी फाशी देण्यात येणार नसल्याचं 2 मार्च रोजी सांगितलं. याप्रकरणी निर्भयाच्या आईने उद्वीग्न प्रतिक्रिया देत, "त्यांना फाशी तर द्यावीच लागेल. मी हार मानणार नाही," असं म्हटलं होतं.

आता आरोपींसमोर कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय.

पवनव्यतिरिक्त इतर तीन आरोपी मुकेश, अक्षय आणि विनय यांचे न्यायालयीन पर्याय संपले आहेत. या तिघांचीही दया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर राष्ट्रपतींनीही यांची दया याचिका फेटाळून लावली.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)